विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल-जलिल (१) (मीर किंवा सय्यद).- हा अयोध्येंतील बिलग्रामचा राहणारा. हा मोठा पंडित व प्रतिभाशाली कवि होता, त्याची कविता 'वासिटी' या टोपणनांवाखाली आहे. इ. स. १६९९ त औरंगजेबचा तळ विजापुरास असतांना मिर्झा अलि बेग नांवाच्या बादशाहीबातमीदारानें त्याला बादशहाकडे नेलें; तेव्हां बादशहानें त्याला मनसब व जहागीर देऊन, बक्षी (पगार देणारा) व गुजराथचा वृत्तलेखक या संयुक्त हुद्यावर नेमिले. तेथून त्याची सिंधला बदली केली. दरबारच्या कांहीं कारस्थानामुळें फरुखशियरच्या कारकीर्दीत इ. स. १७१४ त त्याला सिंधहून परत बोलविण्यांत आलें; पण सर्व उलगडा झाल्यानंतर त्याचा मोठा बडेजाव करून, प्रतिनिधिद्वारें काम पाहण्याची त्याला सवलत दिली. १७२१ पर्यंत तो दिल्लीस राहिल्यावर त्यानें आपला मुलगा मीर सय्यद महमद याच्या नांवानें अधिकार करून दिला.
(२) बिलग्रामच्या सय्यद अहमदचा मुलगा. याचा जन्म २ जून १६६१; व मृत्यु २८ डिसेंबर १७२४ या दिवशीं झाला. बिलग्राम येथें याची कबर याच्या बापाच्या कबरीशेजारी आहे. यानें अनेक ग्रंथ लिहिले असून, त्यांत पर्शियन भाषेंत लिहिलेलीं पत्रें आहेत. याच्या ग्रंथाचें नाव ''आदब-उल-मुर्सिलीन'' असें आहे. [बीलचा कोश]