विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल मजिद (१) (१८२३-१८६१)- तुर्कस्तानचा सुलतान. इजिप्तमधील मुख्य अधिकारी जो महमद अली त्यानें अबदुल मजिदच्या बापाच्यां मरणाच्या वेळीं तुर्कीचा नेझीब येथें पूर्ण पराभव करून तुर्की आरमारहि आपल्याकडे सामील करून घेतलें. त्यावेळीं यूरोपियन राष्ट्रें मध्यें पडलीं म्हणूनच अबदुल मजिद हा सुलतान झाला. त्यानें १८३९ मध्यें इट-इ-शेरिफ नांवाचें आज्ञापत्र प्रसिद्ध केलें. त्याअन्वयें सुलतानच्या सर्व प्रजेस जीव व जिंदगीच्या सुरक्षितपणाचे सर्वांत सारखे अधिकार प्राप्त झाले. सर्वांवर सारखे कर ठेविले व न्याय मिळण्याची व्यवस्था चांगली केली. त्यानें लष्करी व शिक्षण खात्याची पुनर्घटना केली, गुलामांचा व्यापार बंद केला व व्यापाराची सुधारणा केली. हा १८६१ मध्यें मरण पावला. यानेंच परकीय राष्ट्रांकडून कर्ज घेण्याची पद्धत प्रथम सुरू केली. क्रिमियाचें युद्ध याच्या अमदानींत झालें.
(२).- हा फारसां पंडित शहाजहानच्या काळीं उदयास आला. यानें ''शहाजहाननामा'' नांवाचा शहाजहानाचा इतिहास लिहिला आहे. [बीलचा कोश]