विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल मलिक. - हा प्रख्यात अरबी वैद्य झुर याचा मुलगा होता. याला यूरोपियन लोक अव्हेंझूर (इब्र झूरचा अपभ्रंश) असें म्हणत असत. अबदुल मलिक याचें पूर्ण नांव 'अबू माखान अबदुल मलिक इब्र झुर' असें होतें. हा अकराव्या शतकाच्या अखेरीस आणि बाराव्या शतकाच्या प्रारंभीं उदयास आला. हा कुलीन घराण्यांत जन्मला होता. याचा जन्म अंडलूशियाची राजधानी सेव्हिल येथें झाला; व तेथें त्यानें उत्कृष्ट रीतीनें आपला धंदा चालविला. त्याचे वडील व आजा हे दोघेहि उत्तम वैद्य होते. त्यानें वैद्यकीचा धंदा विसाव्या वर्षी करण्यास सुरवात केली असें म्हणतात. त्याची प्रकृति शेवटपर्यंत उत्कृष्ट राहिल्यानें सर्वांपेक्षां त्यानें अधिक वर्षें वैद्यकीचा धंदा केला. तो १३५ वर्षांचा होऊन मेला असें म्हणतात. त्याचा मुलगा इब्र सूर यानेहि वैद्यकीचा धंदा केला. हा मोरोक्कोचा बाहशहा अल् मनसुर याच्या फार मर्जीतला होता. यानेंहि वैद्यकशास्त्रावर पुष्कळ ग्रंथ लिहिले. अव्हेंझूरनें 'तयस्सूर फिल मुदावात वत तद्बीर' या नांवाचा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. याचें १२८० मध्यें हिब्रूंत भाषांतर झालें आणि पर्व्हिशियसनें त्याचें लॅटिनमध्यें भाषांतर केलें. या लॅटिन भाषांतराच्या पुष्कळ आवृत्त्या निघाल्या. या ग्रंथाला अबदुल मलिकनें जामि अथवा संग्रह या नांवाखालीं एक पुरवणी जोडली. याशिवाय त्यानें 'फिल अद्वियत वल अघजियत' नांवाचा औषधिशास्त्र व अन्न या संबंधीं ग्रंथ लिहिला. या ग्रंथांत औषधींचे व अन्नाचे गुणधर्म त्यानें सांगितलेले आहेत. इब्रझूर हा इब्ररशीद (अव्हरोज) याचा समकालीन होता. अव्हरोजनें इब्रझूरची एके ठिकाणीं फारच स्तुति केली आहे. त्यानें त्याला गेलेनपासून आपल्या काळापर्यंतचा प्रख्यात वैद्य व ज्ञानसागर असें म्हटलेलें आहे. [बीलचा कोश]