विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल रहमान (१) पंहिला (७५६-७८८)- स्पेन देशांत कारडोव्हा येथें अबदुल रहमान या नांवाचे उमईद घराण्यांतले पांच राजे होऊन गेले; त्यांपैकीं दोघें तर फारच कर्तृत्ववान होते.
या घराण्याचा मूळपुरुष अबदुल रहमान हा होता. यानेंच कारडोव्हा येथें राज्याची स्थापना केली आणि स्वत: खलीफ ही पदवी धारण केली. उमईदांचा जेव्हां आबासि घराण्यांतील पुरुषांनीं पूर्ण पराभव केला, तेव्हां यास आपला जीव बचावण्याकरिता बेदुइन अरबांचा आश्रय घ्यावा लागला. वाटेंत याचा भाऊ मारला गेला. तो प्रथम आपल्या अनुयायांबरोबर सिरियांत व नंतर इजिप्त देशांत गेला व तेथेहि जेव्हां त्यास आपल्या जिवास धोका आहे असें समजलें तेव्हां तो सरते शेवटीं स्पेन देशांत गेला. त्या वेळीं एल व्हीरा म्हणजे सध्याचा ग्रेनेडा येथे यूसफ नांवाचा एक कमकुवत व नालायक राजा होता, त्यामुळें त्याच्या राज्यांत दुफळ्या माजल्या होत्या. यूसफनें याच्या उमईद सरदाराचा फार अपमान केला, तेव्हां तडजोड बाजूला राहून दोन्ही पक्ष लढाईस तयार झाले. त्यांत यूसफचा पराभव झाला, व अबदुल रहमानास त्याचें राज्य मिळालें. या लढाईचे वेळीं अबदुल रहमानाच्या सैन्याची इतकी निकृष्टावस्था होती कीं, निशाण तयार करण्याकरतां त्यानें डोकीचें पागोटें फाडलें व तें भाल्यास बांधलें. यामुळें भाला व पागोटें स्पेनमध्ये मुसुलमानांचें ध्वजचिन्ह होऊन बसलें. याचें सर्व आयुष्य बंडखोर बर्बर व अरबी सरदारांस आपल्या अमलाखालीं आणण्यांत गेलें. म्हातारपणीं यास फार दु:ख झालें व हा फार क्रूर होता. यानें स्थापिलेली राजसत्ता सुमारें तीन शतकें टिकली.
(२).- हा लोकप्रिय कवि पेशावरचा राहणारा होता. त्याची कविता फार जोरदार व ओजस्वी आहे. त्यामुळें वीरवृत्तीच्या लोकांनां ती फार आवडते. पण ओजाबरोबरच सहजताहि भरलेली असल्यामुळें काव्यलोलुपांनांहि ही फार आवडते. पेशावर पासून जवळच हजारखान नांवाच्या त्याच्या जन्मस्थानाच्या रस्त्यावर त्याचें थडगें बांधलेलें आहे.