विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल रहमानखान (१) (१८४४-१९०१).- अफगाणिस्तानचा अमीर. दोस्त महंमदखानानें बरकझइ घराण्याची सत्ता अफगाणिस्तानांत स्थापिली. त्या घराण्यांतील अबदुल रहमानखान हा तिसरा पुरुष होय. दोस्त महंमदानें अजिमखान व अफजुलखान या दोघां मुलांस वगळून आपला तिसरा मुलगा शेरअली यास अमीर केलें. तेव्हां शेरअली व अबदुल रहमानचा बाप अफजुलखान यांमध्यें तंटे उत्पन्न झाले. हें युद्ध सुमारें पांच वर्षे चालू होतें. यांत अबदुल रहमानच्या आंगचा धाडसीपणा व कर्तुत्व हे गुण दृष्टोत्पत्तीस आले. लवकरच दोघां भावांमध्यें तडजोड झाली, पण अबदुलरहमानच्या वर्तनाचा शेरअलीस संशय आला, म्हणून त्यानें त्याच्या बापास कैदेंत टाकलें. बापास सोडविण्याकरितां अबदुलरहमान व त्याचा चुलता अजिमखान यांनी बंड उभारून, काबूल शहर घेतलें. तेथें शेरअलीची व त्यांची मोठी लढाई होऊन, शेरअलीच्या पक्षाचा पूर्ण पराभव झाला. नंतर अबदुलरहमाननें आपल्या बापास कैदेंतून सोडवून अफगाणिस्तानच्या गादीवर अमीर म्हणून बसविलें. पण १८६९ या सालीं शेरअलीनें पुन्हा परत येऊन त्या बापलेकांचा तीनहाखान येथें पराभव केला, व त्यामुळें त्यांना इराणच्या शहाच्या आश्रयास जावें लागलें. तेथून पुढे तो समरकंद येथें रशियन सरकारच्या आश्रयास गेला. अजिम इराणमध्यें १८६९ सालीं आक्टोबर महिन्यांत मरण पावला.
अबदुलरहमानानें अज्ञातवासांत ११ वर्षें काढलीं पण पुढें १८७९ मध्यें शेरअली मरण पावला. तेव्हां ताशकंद येथील रशियन सेनापतीनें अबदुलरहमानास बोलावणें पाठवून पुन्हां एकदा अफगाणिस्तानची गादी मिळविण्याचा प्रयत्न करण्याविषयीं आग्रह चालविला. कारण शेरअली मरण्यापूर्वीच इंग्रजांचें सैन्य अफगाणिस्तानांत शिरलें असून तें आल्याचें ऐकून शेरअली काबुल सोडून पळाला होता. १८८० च्या मार्च महिन्यांत अबदुल रहमान अफगाणिस्तानांत परत आला असल्याची बातमी हिंदुस्तानांत कळली. तेव्हां हिंदुस्थानचे व्हाइसराय लॉर्ड लिटन यांनीं त्याच्याशीं बोलणें लावून असें ठरविलें कीं, हिंदुस्थानसरकारनें त्यास गादी मिळवून देण्याकरितां पैशाची व लढाईच्या सामुग्रीची मदत करावी. अबदुल रहमान यास कंदाहार व त्यासभोंवतीचा कांहीं मुलूख खेरीज करून अफगाणिस्तानचा अमीर कबूल करावें, व शेरअलीशीं लढण्याकरितां काबुल येथें पाठविलेलें सैन्य परत बोलवावें. उलटपक्षीं अमीरानेंहि परराष्ट्रीय राजकारणांत इंग्रजांच्या सल्ल्यानें चालावें. या सर्व अटी अबदुल रहमान यानें मान्य केल्या. तेव्हां इंग्रजी सैन्य अफगाणिस्तान सोडून गेलें व पुढें १८८१ मध्यें त्यांनीं कंदाहारहि अमीराच्या स्वाधीन केलें. पण इंग्रजी सैन्य परत गेलें नाहीं तोंच शेरअलीच्या अयुबखान नामक मुलानें हिरातहून कंदाहारवर चाल करून अबदुल रहमानच्या लोकांचा पराभव केला. या पराभवानें न डगमगतां, अबदुल रहमाननें काबुलाहून शेरअलीच्या मुलावर स्वारी केली व त्याचा पूर्ण मोड करून स्वत: अमीर झाला (सन १८८१). अबदुल रहमाननें पुढील पांच सहा वर्षें स्थानिक बंडें मोडून आपली सत्ता दृढ करण्यांत घालविलीं. १८९५ सालीं महाराणी व्हिक्टोरिया हिनें त्यास आपल्या भेटीस विलायतेस बोलाविलें. पण त्यास प्रकृतीच्या अस्वास्थामुळें जातां आलें नाहीं. त्यास ''स्टार ऑफ इंडिया'' ही सर्वांत बहुमानाची पदवी देण्यांत आली होती. हा १९०१ सालीं मरण पावला. याचीं पहिलीं २० वर्षें लढण्यांत गेलीं. त्यांत याच्या अंगचा धाडसीपणा संकटांवर तोड काढण्याचें चातुर्य व त्यांस तोंड देण्याची हिंमत, प्रतिस्पर्ध्यांची कारस्थानें निष्फळ करण्यास लागणारी चिकाटी वगैरे गुण दिसून आले. बंडें मोडतांना क्वचित् प्रसंगीं त्यास अतिशय कडक उपाय अंमलांत आणावे लागले. रशियाची सरहद्द ठरवितांना, त्याच्याशीं वितुष्ट न येऊं देण्यांत तर अबदुल रहमानच्या चातुर्याची कमालच झाली. अबदुल रहमानानें ब्रिटिश सरकारचा किंवा रशियाचा हात अफगाणिस्तानच्या राज्यकारभारांत केव्हांच शिरूं दिला नाहीं यानेंच प्रथम अफगाणिस्तानांतील बंडाळी मोडून जिकडे तिकडे शांतता केली.
याची उंची मध्यम होती. तोंडावरून याच्या हुशारीची कल्पना करता येत होती. याची वागणूक फार सभ्यपणाची असून याच्या दूरदर्शीपणाबद्दल व आकलनशक्तीबद्दल, सर लेवेल ग्रिफिन व सरहेनरी ड्यरांड यांनीं फारच तारिफ केली आहे.
(२) झज्जरचा नबाब १८५७ च्या बंडांत दोषी ठरून त्यास दिल्ली येथें २३ डिसेंबर रोजीं फांशी दिलें. हा नजाबत अलीखान याचा वंशज असून सर जार्ज बार्लो यानें १८०६ मध्यें त्याला झज्जर, बदली, करौंद इत्यादि १२॥ लाखांची जहागीर दिली. याशिवाय ४०० घोडेस्वार ठेवण्याकरितां म्हणून वडवान आणि दद्रि हे गांव देण्यात आले. १८५७ च्या मे पर्यंत तो ब्रिटिशांचा कट्टा दोस्त समजला जात असे. पण बंड उपस्थित होतांच त्यानें मागील दोस्ती तोडून बंडवाल्याची बाजू घेतली.