विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल हक्क (शेख). - हा दिल्लीचा राहणारा. सादुल्ला तुर्कचा पुत्र सैफ-उद्दीन अबदुलचा पिता. तैमुरलंगाचा एक अनुयायी तैमुरबरोबर परत न जातां दिल्लीसच राहिला. अबदुल हा त्याचा वंशज होय. यानें इ. स. १५९६ मध्यें ''तारीख इ-हक्की'' किंवा ''तारीख-इ-अबदुल हक्क'' नांवाचा ग्रंथ लिहिला. यात्रेकरितां मक्का व मदिना येथें जाऊन तो फार दिवस राहिला. तेथें त्यानें प्रवास, धर्म, इतिहास वगैरे निरनिराळ्या विषयांवर शंभरांवर ग्रंथ लिहिले. यांपैकीं अतिप्रख्यात म्हणजे ''मदीना सकीना'', ''मल्ल उल-अनवार'', ''मदरिज-उन-त्रुबुवत'' ''जइब-उल-कुलूब'', ''अखबार-उल-अख्यार'' हे ग्रंथ होत. हा ग्रंथकार १५५१ च्या जानेवारी महिन्यांत जन्मला. वयाच्या नव्वदाच्या वर्षींहि त्याची प्रतिभा कमी झाली नाहीं. इ. स. १६४२ त अबदुल मरण पावला. दिल्लीस हौझ शम्सीच्या तीरावर त्याची कबर आहे. हिंदुस्थानांतील साधुपुरुषांत याची गणना होते. याच्या शेखनूर-उल-हक्क नांवाच्या मुलानें ''झुबदुत-उत-तवारीख'' नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. [बीलचा कोश].