विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल हमिद.- (१) (१७२५-८९) हा १७७३ सालीं तुर्कस्तानचा सुलतान झाला. हा स्वभावानें फार शांत व देवभीरु होता. १७७४ त त्याला रशियाशीं लढाई करणें भाग पडलें त्यांत त्याचा पराभव होऊन तह करावा लागला. त्या तहाचे परिणाम तुर्क लोकांस फार घातक झाले. याच्यावेळीं तुर्कस्तानची सांपत्तिक स्थिति फार वाईट होती. १७८७ मध्यें रशियाशीं पुन्हा युद्ध सुरू झालें त्यावेळीं आस्ट्रिया रशियाला मिळाला. या युद्धांत पुन्हां रशिया विजयी होण्याचें चिन्ह दिसूं लागलें तोंच इकडे सुलतानचा वृद्धापकालामुळें अंत झाला.
(२).- सुलतान अबदुल मजिदचा पुत्र जन्म १८४२ अबदुल हमिद हा १८७६ रांत तुर्कस्तानचा सुलतान झाला. गादीवर बसतांना पार्लमेंटप्रमाणें राज्यव्यवस्था करण्याचें अश्वासन दिल्यामुळें लोकांनां तो उदारमतवादी आहे असें वाटत असे. तो सुलतान झाला त्या वेळीं तुर्कस्तानची स्थिति फार खालावलेली होती. सरकारी खजिन्यांत शिल्लक नव्हती; जिकडे तिकडे बंडाळी माजली होती. यूरोपियन राष्ट्रांशीं तुर्कांचें बरे नव्हतें कारण त्यांनीं कळविलेल्या सुधारणा त्यानें करण्याचें नाकारिलें. रशियाबरोबरच्या युद्धांत त्यास तह करणें भाग पडलें. व इंग्रजांनीं इजिप्त देशांत आपली सत्ता दृढ केली म्हणून त्यानें ब्रिटिश सरकारास सोडून जर्मनीची मैत्री संपादिली व सैन्यांत सुधारणा केली. जर्मनीला बगदाद रेल्वे करण्याकरितां सवलती मिळवावयाच्या होत्या. त्यानें सर्व सत्ता प्रधानांच्या हातांतून आपल्याकडे घेतली. बंडें मोडण्याकरितां त्यानें फार लोकांची कत्तल केली मॅसिडोनियाच्या प्रकरणांत तुर्कस्तानचा झालेला पाणउतारा व सैन्यांतील असंतोष, या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन ''तरुण तुर्क सभेचे'' पुढारी निओझी बे व एनव्हर बे यांनीं राज्यक्रांति केली (१९०८) आणि सुलतानास पदच्युत करून त्याच्या भावास म्हणजे रशिद एफेंडि (पांचवा महंमद) यास गादीवर बसविलें (१९०९).