विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल्ला कुतुब शहा (१६११-१६५८).- दक्षिण हैदराबादमधील गोवळकोंड्याच्या प्राचीन कुतुबशाही घराण्यामधील सहावा सुलतान. हा महंमद कुतुबशहाचा पुत्र असून त्याच्या नंतर तो गादीवर बसला. शहाजहानानें अहंमदनगरचें राज्य बुडवून विजापूरच्या राजापासून खंडणी घेण्याचा ठराव केला. तेव्हां यानेंहि खंडणी देण्याचें कबूल केल्यामुळें (१६३६) शहाजहानाशीं त्याचा स्नेह कायम राहिला. पण १६५६ मध्यें त्यानें शहाजहान बादशहाला दुखविल्यामुळें त्यावर आपत्ति आली. अबदुल्लाचा मुख्य वजीर मीर जुम्ला हा होता. एकदां मीर जुम्ला तैलंगणांत गेला असतां मीर जुम्लाचा दुर्वतनी पुत्र महंमद अमीन यानें कुतुबशहास राग येण्याजोगें कृत्य केल्यामुळें कुतुबशहानें त्यास पकडून कैदेंत टाकिलें. मीर जुम्लानें परत आल्यावर आपल्या मुलास सोडविण्याविषयीं पुष्कळ खटपट केली. पण ती व्यर्थ गेल्यामुळें मीर जुम्ला अवरंगजेबास जाऊन मिळाला. अवरंगजेबास दक्षिणेंतील राज्यांत हात घालण्यास कांहीं तरी सबब पाहिजेच होती. त्यानें आपल्या बापाकडून महंमद अमीन यास मुक्त करण्याविषयींचा हुकूम आणून तो कुतुबशहाकडे पाठविला. या गोष्टीनें आपल्या स्वातंत्र्यावर घाला आला असें पाहून कुतुबशहास अधिकच क्रोध आला व त्यानें महंमद अमीनाची कैद अधिकच सक्त करून मीर जुम्लाची सर्व संपत्ति जप्त केली. तेव्हां शहजहानानें सक्तीनें अबदुल्ला यास वठणीस आणण्याविषयीं आपला मुलगा अवरंगजेब दक्षिणेंत होता त्यास आज्ञा केली. वडिलांची आज्ञा हातीं पडतांच अवरंजेबानें आपला भाऊ शहाजादा सुजा बंगालचा सुभेदार होता त्याच्या मुलीशीं आपला मुलगा सुलताना महंमद याचें लग्न करण्याचें मिष करून त्यास बरोबर इतमाम देऊन रवाना केलें. मार्गांत सुलतान महंमदाचा मुक्काम हैदराबाद नजीक पडला तेव्हां अबदुल्ला आपणांस मेजवानी देण्याच्या, गडबडींत आहे असें पाहून महंमद एकाएकीं हैदराबादवर चालून गेला. अबदुल्ला गैरसावध असल्यामुळें त्यास आपला बचाव करतां आला नाहीं. तो कसा बसा गोवहकोंड्याच्या किल्ल्यांत पळून गेला. इकडे हैदराबाद मोंगलांच्या हातीं पडून लष्कर शरण जाईपर्यंत तें अर्धें अधिक लुटलें गेलें. मागाहून अवरंगजेब आणखी फौज जमा करून आपल्या मुलाच्या मदतीस आला. अबदुल्लानें गोवळकोंड्याच्या किल्ल्यांत जाण्यापूर्वींच महंमद अमीन यास मुक्त करून मीर जुम्ला याचा जप्त केलेला ऐवज परत केला होता. परंतु अवरंगजेबाचें तेवढ्यानें समाधान होण्यासारखें नव्हतें. अबदुल्ला यानें विजापूरकरांची मदत मागून पाहिली; पण तिकडून कुमक येण्याची आशा दिसेना. तेव्हा त्यानें अवरंगजेबाच्या सर्व अटी मान्य करून त्याशीं तह केला. त्यानें मोंगलांस मागील बाकी फेडून दरसाल एक कोट रुपये खंडणी देण्याचे कबूल केलें. इतकेंच नव्हे तर सुलतान महंमदास आपली मुलगी देऊन काहीं मुलूख व द्रव्यहि आंदण म्हणून दिलें. यापैकीं पैक्यासंबंधीं जे करार होते त्यांत पुढें पुष्कळ सूट मिळाली. अबदुल्ला हा १६५८ सालीं मरण पावला. याच्या मागून याचा जावई अबू हसन कुतुबशहा यास गादी मिळाली.
[सं द र्भ ग्रं थ.- मोडककृत दक्षिणेंतील मुसुलमानी राज्याचा इतिहास; बीलचा कोश. मुसुलमानी रियासत; काफीखान; इ.]