विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल्लाखान सय्यद.- हा बार्ह येथे येऊन राहिलेल्या महंमद पैगंबराच्या एका वंशजांच्या कुलांत जन्मला असून त्याचा बाप सय्यद अबदुल्लाखान उर्फ सय्यद मिया हा अवरंगजेबाच्या कारकीर्दीत कांहीं दिवस विजापूर व पुढें अजमीर या प्रांतांचा सुभेदार होता. अबदुल्लाखानास पुष्कळ पुत्र होते, पण हसन अली व हुसेन अली हे दोघेच कायते सय्यद बंधू म्हणून प्रसिद्धिस आले. यांपैकीं पहिला हसन अली हा अबदुल्लाखान कुतुब-उल्मुल्क या नांवानें प्रसिद्ध आहे. याचें वय १७१२ सालीं सुमारें ४६ वर्षाचें होतें. ते १६९७-९८ मध्यें खानदेश, बागलाण, औरंगाबाद इत्यादिं ठिकाणीं फौजदारीवर होता.
इ. स. १७२१ मध्यें बहादुरशहानें यास अलाहाबादची सुभेदारी दिली. या सय्यदांच्याच साहाय्यानें फर्रुख सेयर हा १७१३ मध्यें दिल्लीच्या गादीवर बसला. राज्यारोहण प्रसंगीं यानें अबदुल्लाखानाला आपला प्रधान नेमलें व त्याला कुतुबउलमुल्क ही पदवी अर्पण केली. या दोघां भावांनीं पुढील सातवर्षें बादशहांनां केवळ बाहुलीं बनवून दिल्ली येथें अत्यंत अरेरावीनें कारभार केला. शेवटीं १७२० सालीं महंमदशहा बादशहाच्या चिथावणीवरून याचा भाऊ हुसेन अली याचा खून होऊन याचें आणि बादशहाचें खूप वाकडें झालें आणि १४ नोव्हेंबर १७२० रोजी यमुनेकाठीं हसनपूर येथें बादशहाच्या सैन्याशीं याची लढाई होऊन हा कैद झाला. पुढें दोन वर्षांनीं ता. ११ आक्टोबर १७२२ रोजीं [३० जिल्हेज ११३५-बील] अबदुल्लाचा खून झाला. सय्यद बंधूंच्या दिल्ली येथील कारभाराची विशेष हकीकत सय्यद बंधू या सदराखालीं दिली आहे. [संदर्भग्रंथ; मराठी रियासत मध्यविभाग; बीलचाकोश, डौसन].