विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबाझइ.- हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील पेशावर जिल्ह्यांतील चारसद तहशिलींत अबाझइ नांवाचा किल्ला व त्याच नांवाचें खेडेगाव आहे. स्वात नदीच्या उमगस्थानापासून सुमारें एक मैलावर त्या नदीच्या पश्चिम तीरावर हा गांव वसलेला असून, पेशावर शहरापासून तो २४ मैल आहे. अबाझइचा किल्ला इ. स. १८५२ मध्यें बांधण्यात आला व तेव्हांपासून ब्रिटिश मुलुखाचा उटमान व मोहमंड लोकांच्या स्वार्यांपासून बचाव झाला आहे. ह्या ठिकाणीं तीस शिपाई ठेवण्यांत आले आहेत. सध्यां याचें महत्त्व म्हणजे स्वात नदीच्या कालव्याच्या कामाचें जें मुख्य ठिकाण आहे त्याला हें गांव अगदीं नजीक आहे.