विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबिंग्डन.- अबिंग्डन ही बाजारी पेठ इंग्लंडच्या बर्कशायरमधील म्युनिसिपल बरो आहे व रॅड्लेहून येणार्या ग्रेट वेस्टर्न रेल्वेच्या शाखेचें स्टेशन असून आक्सफोर्ड येथून दक्षिणेस ६ मैलावर आहे. लोकसंख्या सुमारें सात हजार आहे. ज्या ठिकाणीं ऑक नांवाची लहानशी नदी थेम्सला मिळते, त्या ठिकाणीं पश्चिम तीरावर थेम्सच्या सपाट खोर्यांत हें शहर आहे. नदीजवळ सेंट हेलेन्सचें प्रार्थनामंदिर असून याचा पुरातन इंग्लिश मनोरा पाहण्यालायक आहे. थेम्सवरील अरुंद कमानीचा पूल इ. स. १४१६ पासूनचा आहे. ग्रामरस्कूल, ख्राइस्ट दवाखाना, नगरभवन वगैरे इतर इमारती आहेत. कापड व सत्रंज्या बनविणें व शेतकी हे येथील धंदे आहेत. हा बरो एक मेयर, चार आल्डरमेन व बारा सभासद यांच्या देखरेखीखालीं आहे.