विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबिडॉस (१) - इजिप्तमधील अति प्राचीन शहरांपैकीं हें असून नाईल नदीच्या पश्चिमेस सुमारें सात मैलांवर २६० १०' उत्तर अक्षांशांत वसलेलें होते. याचें इजिप्शियन नांव अव्डु 'अवशेषाचा डोंगर' असें असून, हा नांवांत दिग्दर्शित केलेला अवशेष ऑसिरिसच्या पवित्र शीर्षाचा होता. ग्रीक लोकांनीं याला अबिडॉस हें नांव दिलें. याचें सध्याचें अरबी नांव 'आरबेट एल मडफुन्हें' असें आहे. या शहराच्या इतिहासाला इतिहासपूर्वकालाच्या उत्तारार्धांत सुरुवात होते. मेनाईटच्या आधींच्या राजांनीं याची स्थापना केलेली दिसते. कारण त्यांचें देऊळ व थडगीं सांपडलीं आहेत. पहिल्या व दुसर्या घराण्यांतील काहीं राजांनां येथें पुरलें होतें. त्या राजांनीं येथील देवस्थान सुधारून मोठें केलें. दुसर्या घराण्यांतल्या तीन राजांनीं शहराच्या मागील वाळवंटांत मोठे किल्ले बांधले. विसाव्या घराण्याच्या काळापर्यंत हें देवस्थान व शहर मधून मधून पुन्हां पुन्हा बांधिलें जाई व येथील श्मशानभूमीहि एकसारखी वापरली जात असे. एकोणिसाव्या घराण्यांतील पहिल्या सेतीनें पूर्वजांच्या स्मरणार्थ शहराच्या दक्षिणेस एक मोठें नवे देऊळ बांधण्यास सुरुवात केली. दुसर्या रामेसीसनें तें पुरें केलें. अगदीं शेवटची इमारत म्हणजे तिसाव्या घराण्यांतील नेख्तानेबचें नवें देऊळ होय. टॉलेमाईक काळापासून हें स्थान ओस पडूं लागलें व पुढील काळची एकहि गोष्ट आंढळण्यांत नाहीं.
पहिल्या ते बाराव्या घराण्याच्या काळापर्यंत येथें शृगाल देवता 'उपुआउट' हिची व पुढें ऑसिरिसची उपासना मोठ्या प्रमाणांत चाले. इ. स. पूर्व. ५५००-५०० या अवधींत एकाच जागेवर एकामागून एक बांधिलेलीं अशीं नऊ दहा देवळें या ठिकाणीं आहेत. या देवळांच्या दक्षिणभागीं पहिल्या सेतीचें देऊळ आहे. याच देवळाला 'अबिडॉसचें मोठे देऊळ' असे नांव आहे. प्रमुख घराण्यांतील राजांची एक लांबलचक नामावळी याच्या एका भिंतीवर कोरलेली आहे. तिला 'अबिडॉसचा तक्ता' असें म्हणतात.
(२). आशियामायनरमधील मायसिया प्रांतांतील प्राचीन शहर. हेलेस्पांटवर नागारा शिखरावर हें वसलेलें होतें. पूर्वी हें थ्रेसियन शहर असून नंतर मिलेसियन लोकांनीं येथें वसाहत केली असावी. क्सर्क्सीझनें ग्रीसवर स्वारी केली त्यावेळेस त्यानें ह्याच ठिकाणीं होड्यांचा पूल बांधून खाडी ओलांडली. मॅसिडोनचा राजा पांचवा फिलिप (इ. स. पूर्वी २००) याला विरोध केल्यामुळें हें शहर प्रसिद्धीस आलें. हीरो व लियांडर यांच्या प्रणयकथांमुळें या शहराची प्रसिद्धि आहे. बिझान्शियमच्या अमदानीपर्यंत हें हेलेस्पांटवरील जकातीचें ठाणें होतें. दुसरा सुलतान महंमद यानें 'जुने किल्ले' बांधल्यामुळें ह्या शहराचें महत्त्व दादानेलिसला आलें.