विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबिपोन.- दक्षिण अमेरिकन इंडियनांची ही एक जात होती. यांची संख्या १७८० च्या सुमारास अजमासें ५००० होतीं पण हल्लीं बडूवे, पायाग्वा, लेंग्वा इत्यादि तत्सम जातींप्रमाणें ही नामशेष झाली असें म्हणतात. या जातीसंबंधी याच्यामध्ये सात वर्षे राहिलेला एक जेसुइट मिशनरी (मार्टिन डोब्रिझोफर) खालीं दिलेली जी थोडीशी माहिती देतो तेवढीच काय ती उपलब्ध आहे. 'अबिपोन हे उंच व बांधेसूद असून त्यांचा पेशा परिभ्रमणवृत्ति शिकारी लोक यांच्याप्रमाणे असे, ते अंगभर वस्त्रें वापरीत व त्यांना अलंकार घालण्याची व स्वत:ला रंगवून घेण्याची हौस असे. काठ्याने अंग टोंचून व रक्तस्त्राव होत असलेल्या त्या जखमा राखेनें माखून स्त्रीपुरुष दोघेहि गोंदून घेत. पुरुष कपाळावर गोंदून घेत व स्त्रिया चेहरा, वक्षस्थल आणि बाहू या भागांवर फुल्या व इतर सुरेख आकृती काढून घेत. मुलींनां वयात यावयाच्या वेळीं नवरा मिळण्याकरितां त्या सुंदर दिसाव्या म्हणून व त्याचप्रमाणें त्यांच्या धैर्याची परीक्षा पाहण्याकरितां अशा तर्हेनें गोंदवीत. सात वर्षांच्या पुढील पुरुष ओष्ठालंकार घालीत. मोठमोठ्या लोकांकरितां अति उत्तम असा हा ओष्ठालंकार पितळेचा किंवा एक प्रकारच्या गोंदाचा करीत. हे अलंकार छातीपावेतों लोंबत. स्त्रीपुरुष दोघेंहि आपल्या कानाचीं पाळीं इतकीं ताणीत कीं ती बहुतेक खांद्याला लागत. यांची नीतिमत्ता फार उत्तम असे असें डोब्रिझोफर म्हणतो. त्यांचें पतिपत्नीविषयक वर्तन नांवाजण्याजोगें असून पेहराव, आविर्भाव आणि संभाषण यांत विनय व सभ्यपणा दिसून येई. त्यांचें वर्तन नेहमीं शिष्टाचारास धरून असे. कैद्यांनां देखील ममतेनें वागवून त्यांचा छळ करवीत नसत. विजयाबद्दल सांवत्सरिक समारंभ हंसून खेळून व मद्यपान करून साजरे करण्यांत येत. मद्यपान हाच काय तो त्यांच्यांत दुर्गुण होता. त्यांचा स्वभाव कांहीसा धिमा असे व अंगीं शौर्य असतांना देखील ते लढाईंत फारसे साहस करीत नसत.
त्यांची शरीरप्रकृति उत्कृष्ट असण्याचें कारण पुष्कळ अंशीं असगोत्र-विवाहपद्धति असूं शकेल. बालविवाह मुळींच नसून पुरुषाच्या तिसाव्या वर्षी व स्त्रीच्या विसाव्या वर्षी लग्नें होत. मूल होण्याच्या वेळीं बापाला प्रसूतिसंस्काराचें अनुकरण करावें लागे. भ्रूणहत्या आणि गर्भपात यांच्यांत फार होत. प्रत्येक स्त्री दोन मुले शिल्लक ठेवून बाकीच्यांनां मारून टाकी. तीन वर्षें मूल अंगावर पीत असल्यानें ही भ्रूणहत्येची चाल वाढत गेली. कारण त्या अवधींत नवर्याला स्त्री सुख घेण्याची बंदी असे व म्हणून तो पुन्हा लग्न करी. लग्न मोडणें त्याच्या मर्जीवर अवलंबून असे. तथापि अनेक बायका करण्याची चाल फार क्वचित दिसून येई व सवतीसवतींनां एकत्र रहावें लागत नसे. स्त्रीपुरुषधर्म उत्तम रीतीनें पाळण्यांत येई. भ्रूणहत्येमध्यें आश्चर्याची गोष्ट ही कीं पुरुष संततीपेक्षां स्त्रीसंततीचे बळी कमी घेत, कारण लग्नांत कन्येच्या पित्याला मोठा हुंडा मिळे व वराला वधूच्या पित्याच्या पदरांत मोठी रक्कम ओतावी लागे.
उपासनेसंबंधीं पाहूं जातां अबिपोन लोकांना चिंतन, विवेचन यांची फारशी आवड नसे. ईश्वर या अर्थी शब्दच त्यांच्या भाषेंत नसे. ते एका क्षुद्र देवतेची उपासना करीत. या देवतेचें नांव ''अहरै गिची'' किंवा क्कीबेट होते. अहरैगिची म्हणजे कृत्तिका नक्षत्र. जेव्हां हें नक्षत्र क्षितिजावर दिसत नसे तेव्हां तें आजारी असून अत्यवस्थेंत आहे असें अबिपोन समजत. ह्याचा उदय झाला असतां नाच, गाणें, खाणेंपिणें इत्यादि गोष्टींनीं त्याचा सत्कार करीत. अहरैगिचीनें ज्यांनां अमानुष शक्ति दिली आहे अशी समजूत होती ते कीबेट नांवाचे उपाध्ये हा धर्मसंप्रदाय चालवीत. कीबेटांनां लोक फार भीत कारण ते रागावले असतां व्याघ्ररूप धारण करीत अशी त्यांची समजूत असे. कीबेटांच्या द्वेषामुळें मृत्यु येतो असे अबिपोन मानतात. गडगडाट व वीज म्हणजे मृत कीबेटांची र्औध्वदेहिकें होत असें ते समजत; त्यांनां व धूमकेतु आणि ग्रहणें यांनांहि हे लोक फार भीत.
मृतमाणसाचें काळीज व जीभ उकळून कुत्र्याला खावयास घालीत. याविषयीं त्यांची समजूत अशी होती कीं त्यांतील कीबेटचा नाश व्हावा. मृतांचे आप्त आणि स्नेही डोक्याची श्मश्रू करवीत आणि बायका ९ दिवस अहोरात्र रडत. रडण्याकरितां मुद्दाम बोलावलेल्या माणसांनीं फक्त रात्रींच रडावें असा निर्बंध असे. स्त्रीनें आठवण होईल तेव्हां रडावें व इतर बायकांनी तिचें रडणें ऐकून आपणहि त्यांत भाग घ्यावा असें असे. मृताचें नांव अजीबात घेत नसत, त्याचें घर उध्वस्त करण्यांत येऊन त्याचे आप्तइष्ट आपलीं नांवें बदलीत. भुतें लहान लहान बदकांत प्रवेश करून रात्रीचें जमाव करून एक प्रकारच्या करुण स्वरानें ओरडतात असें मानीत. थडग्यावर पाण्याचें भांडें, वस्त्र, शस्त्रें आणि गाई, घोडे यांचीं शरीरें ठेवीत; हे गाई घोडे मृताच्या अंतकाळीं मारलेले असत. पूर्वजांच्या समाधींना मान देण्यांत येत असे आणि त्यांचीं हाडें उकरून एका जागेवरून दुसर्या जागीं हालवीत व शेवटीं घरच्या श्मशानांत पुरून टाकीत. [एम.डोब्रिझोफर्स-हिस्टोरिआ डि अबिपोनिबस; सारा कूलिज अकाउंट ऑफ दि अबिपोन्स ३ व्हॉ. लंडन १८२२].