विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबिसीनिया यास पूर्वीं इथिओपिया असें म्हणत असत. ईशान्य आफ्रिकेंतील एक अन्तर्भागांतील देश व साम्राज्य. हा देश ५० आणि १५० उत्तर अक्षांश व ३५० आणि ४२० पूर्वरेखांश यांच्या दरम्यान आहे. अबिसीनियाच्या उत्तरेस इरीट्रिआ (इटालियन), पश्चिमेस आंग्ल-इजिप्शियन सूदन, दक्षिणेस ब्रिटिश ईस्ट आफ्रिका, पूर्वेस व आग्नेयीस सोमालीलँड व तांबडा समुद्र यांमधील ग्रेटब्रिटन, फ्रान्स व इटाली यांचा मुलूख आहे. फक्त ईशान्य सरहद्द कायती समुद्राला लागून आहे. बाकीच्या सर्व बाजूंनीं यूरोपीय राष्ट्रांनीं अबिसीनियाला घेरला असल्यानें ती समुद्रापासून विभक्त आहे. या देशाचे खुद्द अबिसीनिया व मध्यसोमालीलँड (हारार धरून) असे दोन भाग आहेत. एकंदर देशाचें क्षेत्रफळ ३५०००० चौरस मैल आहे.
नै स र्गि क र च ना.- अबिसीनिया देश पठारें व पर्वतमय आहे असें म्हटल्यास चालेल. डोंगरांचा देखावा फार भव्य दिसतो. १०० आणि १५० या उत्तर अक्षांशांच्या मधील डोंगरांचा भाग, समुद्रसपाटीवर ७००० ते ७५०० फूट आहे व त्साना सरोवरांतील जलानें या डोंगरांमधील खळगा तुडुंब भरलेला असतो. अबिसीनियांतील बहुतेक डोंगराचा उतारा वायव्येकडे असल्यामुळें जवळ जवळ सर्व मोठ्या नद्या त्या दिशेनें नाईलला जाऊन मिळतात. या नद्यांपैकीं कांहीं मुख्य नद्या म्हटल्या म्हणजे टकाझी, आबाई व सोबाट ह्या होत.
अबिसीनियांतील मुख्य सरोवरें म्हटलीं म्हणजे स्टीफानी व रूडॉल्फ हीं होत. रूडॉल्फ सरोवर हें अबिसीनियांतील सर्वांत मोठें सरोवर आहे. अबिसीनियामध्यें उष्ण पाण्याचे झरे विपुल आहेत. या ठिकाणीं भूकंप नेहमी होत असतात.
भू स्त र.- अबिसीनियामध्यें अग्न्युत्पन्न व ज्युरिन (जुरासिक) जातीचे विपुल खडक दृष्टीस पडतात. सॅडाईन नामक पदार्थानें झालेले द्राचिटिक व लोखंडासारख्या काळ्या रंगांचे व वाटोळ्या आकाराचे अष्टपैलु अथवा षट्पैलू (बसाल्ट) खडकहि येथें दृष्टीस पडतात.
ह वा मा न.- खुद्द अबिसीनिया व तेथील मांडलिक प्रांत या दोहोंतील हवेंत फार तफावत आहे. सोमाली लँडमधील हवा फार उष्ण व रुक्ष आहे. पण खुद्द अबिसीनियांतील हवा फार आरोग्यकारक व समशीतोष्ण आहे. आक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत हिवाळा, पुढें जूनच्या मध्यापर्यंत उन्हाळा आणि तेथून पुढें पावसाळा असतो. सामान्यत: वर्षाच्या प्रत्येक महिन्यांत पाऊस पडत असतो.
व न स्प ती व प्रा णी.- दक्षिणेंतील डोंगर वनस्पतींनीं समृद्ध आहेत. खजूर, अंजीर, पाईन, नारिंग इत्यादिकांचीं त्याचप्रमाणें इमारतीच्या लांकडांचीं झाडें या ठिकाणीं विपुल आहेत. काफा प्रांतांत काफीचीं झाडें फार असून हा प्रांत अनेक प्रकारचें गवत व रंगीबेरंगी फुलें यांनीं फुललेला असतो.
येथील जंगलांत प्राणीहि विविध प्रकारचे सांपडतात. हत्ती, गेंडे, मगर, सिंह, चित्ते, तरस, लांडगे, कोल्हे, रानडुकरें, काळवीट इत्यादि अनेक प्रकारच्या प्राण्यांनीं येथील जंगल भरलेलें आहे. त्याचप्रमाणें अनेकविध पक्षीहि येथे सांपडतात. गरुडपक्षी, गिधाड, बहिरीससाणे, बदकें, खबुतरें, चिमण्या, शहामृग इत्यादि पक्षी जंगलांत वावरतात. सर्प तर असंख्यात आहेत.
प्रांत.- राज्यकारभाराच्या सोयीकरितां अबिसीनियाचे प्रांत व मांडलिक संस्थानें असे विभाग केलेले आहेत. त्यांत खालील प्रांत मुख्य आहेत:- टायग्रे हा अबिसीनियाच्या ईशान्येस आहे. अम्हारा अथवा गोंडार हा मध्यभागीं आहे. गोजाम हा अबाई नदीच्या प्रचंड अर्धवर्तुलाकार वांकणानें वेष्टिलेला आणि शोआ हा अबाई नदीच्या पूर्वेस व अम्हारा प्रांताच्या दक्षिणेस आहे. हे प्राचीन प्रांत खेरीज करून, गोजामच्या नैर्ऋत्येकडील 'वालेगा' प्रदेश, पूर्वेकडील हारार प्रांत, शोआच्या दक्षिणेकडील व नैर्ऋत्येकडील काफा व गाला हे प्रांत आणि सोमालीलॅण्डचा मध्यभाग इत्यादिकांचाहि अबिसीनियाच्या साम्राज्यांत समावेश होतो.
श ह रें.- अबिसीनियामध्यें फारशीं मोठीं शहरें नाहींत. टायग्रे प्रांतांतील आक्झम शहर ही प्राचीन राजधानी होय. मध्ययुगांत गोंडार राजधानी होती व १८९२ सालापासून शोआ प्रांतांतील अॅडिस आबाबा ही अबिसीनियाची राजधानी आहे.
द ळ ण व ळ णा चीं सा ध नें.- रेल्वे, सडका, तारायंत्रे, संदेश-वाहक यंत्रें, इत्यादि येथें दळणवळणाचीं साधनें आहेत.
शे ती.- येथील जमीन फारच सुपीक आहे, तेव्हां शेतीचा धंदा विस्तृत प्रमाणांत चालतो. हा धंदा विशेषेंकरून गाला लोक करतात. अबिसीनियन लोक आळशी असल्यामुळें कृषिकर्मांत ते कुशल नाहींत. मका, डुरा, गहूं, जव, राय, वाटाणे, कापूस, ऊंस, भूईमूग इत्यादि जिन्नस येथें उत्पन्न करण्यांत येतात. कॉफी हें येथील महत्त्वाचें उत्पन्न होय; कृषिकर्माचीं अवजारें जुनींच वापरण्यांत येतात.
शेत नांगरण्याचें काम बैलांकडून करवून घेण्यांत येतें अबिसीनियन लोक मेंढ्या व बकरींहि बाळगितात. देश्य लोक बकर्याचें मांस मोठ्या आवडीनें खातात. सामानाची नेआण करण्याच्या कामीं खेंचरें फार उपयोगी पडतात व या कामाकरितां घोड्यापेक्षां त्यांचाच अधिक उपयोग करण्यांत येतो.
ख नि ज प दा र्थ.- दक्षिण आणि नैर्ऋत्य प्रांतांत सोन्याच्या खाणी आहेत. या खाणींवरहि गाला लोकच काम करितात. शोआ प्रांताच्या दक्षिणेंतहि सोन्याच्या खाणी आहत. याशिवाय, चांदी, लोखंड, कोळसा, व इतर खनिज पदार्थहि अबिसीनियांत सांपडतात.
व्या पा र.- अबिसीनियाला स्वत:चें बंदर नसल्यामुळें देशाचा बहिर्व्यापार मसावा (इतालिअन); जीबुटी (फ्रेंच); झैला व बर्बेरा (ब्रिटिश) या परकीय बंदरांच्या द्वारें चालतो. कॉफी, कातडीं, हस्तिदंत, शहामृगाचीं पिसें, गोंद, सोनें, इत्यादि निर्गत व्यापाराच्या मुख्य वस्तू होत. कापड, शस्त्रें, दारूगोळा, तांदूळ, साखर, सत्रंज्या, व साहेबी टोप्या ह्या आयात व्यापाराच्या मुख्य वस्तू होत.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत येथें मराया थेरीसा 'डॉलर' सर्वत्र प्रचलित असे. १८९४ सालीं मेनेलेक डॉलर अथवा 'तलारी' हें दोन शिलिंग किंमतीचे नाणें उपयोगांत आलें. १९०५ सालीं अबिसीनियामध्यें एक बँक स्थापन करण्यांत आली. या बँकेजवळ ५००००० पौडांचें भांडवल असून तिला नाणीं वगैरे पाडण्याचा अधिकार आहे.
शा स न व्य व स्था.- आपापल्या प्रांतांत राजेलोक जवळजवळ बादशाही सत्ता गाजवितात. अबिसीनियाच्या बादशहाची पदवी 'नेगस नेगुस्ती' (राजांचा राजा) अशी आहे. बादशहाला मधून मधून सल्ला देण्याकरितां म्हणून एक राजमंडळ आहे. १९०७ सालीं यूरोपीय धर्तीवर एक कॅबिनेट स्थापन करण्यांत आलें व परराष्ट्रीय राजकारण, लढाई, व्यापार, न्याय व जमाबंदी इत्यादि खात्यांवर प्रधान नेमण्यांत आले. जस्टीनिअनच्या कायदेसंग्रहाप्रमाणें न्याय वगैरे देण्यांत येतो. न्यायाधीशांच्या निकालांवर बादशहाकडे विनंतिअर्ज अथवा अपील करितां येतें. मुख्य न्यायाधिकार्यास 'आफा-नेगस' असें म्हणतात. जमीनीवर बादशहाचा किंवा धर्मगुरूंचा ताबा असतो. प्राथमिक शिक्षण पाद्री लोक देतात. १९०७ सालीं सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास करण्यांत आला. १२ वर्षांच्या वरील सर्व मुलांनां हा कायदा लागू करण्यांत येतो.
लो क सं ख्या, भा षा व स्व भा व.- अबिसीनियाच्या साम्राज्याची लोकसंख्या पसतीस ते पन्नास लक्ष आहे. साम्राज्यांत मुख्यत: अबिसीनियन, गाला व सोमाली हे लोक राहतात. त्याचप्रमाणे आफ्रिकेच्या बाहेरील लोकहि येथें येऊन राहिले आहेत; उदाहरणार्थ, आर्मोनिअन, हिंदी, यहुदी व ग्रीक लोक. ब्रिटिश, फ्रेंच, इटालियन व रशियन लोक यांचीहि येथें एक छोटीशी वसाहत आहे.
हॅमिटिक वंशाच्या पूर्वेकडील शाखेंतील लोक अबिसीनियांत प्रथम रहात असावेत असा तज्ज्ञांचा तर्क आहे. तथापि आजमितीस वरिष्ठ दर्जाच्या लोकांत सेमिटिक संस्कृतीचा जास्त प्रसार झालेला दिसतो. मध्यप्रांतांतील लोकांचा वर्ण पिंवळा जर्द आहे. उत्तर भागांतील लोकांचा तपकिरी आहे. दक्षिणेकडे काळ्याकुट्ट व काजळी रंगाच्या लोकांचा भरणा जास्त. पुष्कळ लोक नीग्रो वळणाचे, जाड ओठांचे, बसक्या नाकाचे, आणि काळ्या व कुरळ्या केंसांचे आहेत. तथापि एकंदर रहिवाश्यांपैकीं बहुसंख्याकांचे वर्णन 'संमिश्र हॅमिटी सेमिटिक लोक' असेंच करणें जास्त सयुक्तिक होईल. शोआ आणि अम्हारा या प्रांतांमधील वोलो जिल्ह्यांत 'गाला' लोक बरेच दृष्टीस पडतात. राजदरबारची व वरिष्ठ दर्जाच्या लोकांची भाषा सेमिटिक भाषेसारखी आहे. मूळच्या मूर्तिपूजक व प्राचीन सेमिटिक कल्पना ज्यांच्या रोमरोमांत भिनल्या आहेत अशा लोकांवर एकाएकीं ख्रिस्ती संप्रदायाचें जूं लादण्यांत आलें, व ख्रिस्ती संप्रदाय राजधर्म झाला. यामुळें या जुन्या कल्पना अबिसीनियन लोकांच्या मनांतून जाऊं शकल्या नाहींत. अजूनहि अपराधी शोधून काढण्याकरितां स्वप्नांकडे धांव घेण्यांत येते. असा प्रसंग आला असतां प्रथम उपाध्यायाला बोलावून आणतात. त्याच्या शापवाणीचा व प्रार्थनेचा गुन्हेगार शोधून काढण्याच्या कामीं जेव्हां कांहींच उपयोग होत नाहीं, तेव्हां एका लहान मुलाला गुंगीचें औषध देतात व त्याच्यां स्वप्नांत जो मनुष्य येईल त्याला गुन्हेगार समजण्यांत येतें. उपाध्यायानें योजिलेला मनुष्य जर मुलानें स्वप्नांत पाहिला नाहीं तर तसा मनुष्य स्वप्नांत पाहीपर्यंत त्या मुलाला गुंगीतच ठेवण्यांत येतें.
अबिसीनियन लोकांत खून व फांशीसारखे प्रकार नेहमीं दिसतात. तथापि क्रूरपणा हा कांहीं यांच्या स्वभावाचा विशेष नव्हे. लढाईंतील कैद्यांनां ते बहुतकरून ठार करीत नाहींत. खुनी माणसाला मयत इसमाच्या भाईबंदांच्या स्वाधीन करण्यांत येतें. त्यांनीं वाटल्यास त्याला देहांत प्रायश्चित द्यावें. अथवा कांहीं मोबदला घेऊन सोडून द्यावें; हा त्यांच्या खुषीचा प्रश्न असतो. मयत इसमाला कोणी भाऊबंद नसल्यास खुनी इसमावर सूड उगविण्याचें काम उपाध्यायाकडे सोंपवितात. अबिसीनियन लोक जात्याच आळशी असल्यामुळें भीक मागत दारोदार फिरण्यांत त्यांनां कमीपणा वाटत नाहीं. मोठा मानी अबिसीनियनहि 'वाणी ही ईश्वरानें भीक मागण्याकरितां दिलेली आहे' असें म्हणून आपल्या दोषावर पांघरूण घालतो असें सांगतात. हे लोक गर्विष्ठ, आपमतलबी, पण बुद्धिमान आहेत. उत्सवप्रसंगीं गाय मारण्याचा यांच्यांत प्रघात आहे. हे लोक फार खादाड आहेत, व मीठ हे यांच्यांत चैनीचें खाद्य समजलें जातें. या लोकांचीं नीतिबंधनें फार शिथिल असतात. विवाहबन्धन नवर्याला अथवा बायकोला वाटेल त्यावेळीं तोडतां येतें. एका बापाचीं पण वेगळाल्या आयांचीं मुलें एकमेकांनां शत्रूप्रमाणें लेखितात.
इ ति हा स. - प्राचीनांना इथिओपिया म्हणून माहीत असलेल्या देशाच्या टांपूत पूर्वीं अबिसीनियाचा अथवा निदान त्याच्या उत्तर भागाचा समावेश होत असे. मिसर व इथिओपिया या दोन देशांत प्राचीनकाळीं दाट मैत्री असे व क्वचित् काळीं या दोन्ही देशांवर एकच राजा राज्य करीत असे. हिब्रू लोकांचा देखील त्याकाळीं इथिओपियाशीं व्यापारी संबंध असे. इजिप्तच्या टॉलेमी राजांच्या आमदानींत इथिओपियामध्यें ग्रीक वसाहती स्थापन करण्यांत आल्या. या ग्रीक वसाहतींमधूनच पुढें 'आक्झुमाईट' राज्याचा उदय झाला असावा असें इतिहासवेत्त्यांचें मत आहे. ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकापासून तों सातव्या शतकापर्यंत या राज्याची भरभराट होती, व एकेकाळीं खास अबिसीनिया व हें राज्य यांचा विस्तार सारखाच होता.
इ. स. ३३० च्या सुमारास इथिओपियामध्यें ख्रिस्ति संप्रदायाचा प्रवेश झाला. प्रथम प्रथम या नूतन संप्रदायाचा प्रसार देशांत फारसा होऊं शकला नाहीं. तथापि पांचव्या शतकाच्या अखेरीपासून या संप्रदायाचें प्रस्थान देशांत चांगलें बसूं लागलें, ऑक्झूमच्या राजानें (५२५ इ.) अरबस्तानांतील येमेन जिंकलें. अरबस्तानांतील अतिशय सुपीक असा भाग याप्रमाणें इथिओपियनांच्या ताब्यांत गेला. पण इजिप्त देश मुसुलमानांनीं जिंकल्यावर इथिओपीयनांनां अरबस्तानचा मोह सोडणें भाग पडलें. मुसुलमानांची विजयी सत्ता जसजशी अधिकाधिक प्रसार पावूं लागली तसतसें इथिओपियाचें सुधारलेल्या राष्ट्रांशीं दळणवळण बंद पडूं लागून त्यांनां बाहेरील जगाची विस्मृति पडली.
इ. स. १००० च्या सुमारास जूडिथ नामक एका यहुदी राजकन्येनें राजवंशाचा समूळ उच्छेद करण्याचा कट रचला. याचा सुगावा अगोदरच लागल्यामुळें बालराजास शोआ येथें पळविण्यांत येऊन तेथें त्याची सत्ता स्थापन करण्यांत आली. बाकीच्या राज्यावर जूडिथनें ४० वर्षें पर्यंत राज्य केलें. इ. स. १२६८ त मूळच्या राजघराण्याकडे पूर्वींप्रमाणें राज्य सोंपविण्यांत आलें.
१५ व्या शतकाच्या अखेरीस अबिसीनियामधील पोर्तुगीजांच्या मिशनरी कार्यास सुरुवात झाली. पेड्रो डी कोव्हिलहॅम हा इ. स. १४९० त अबिसीनियांत येऊन पोंचला, व पोर्तुगालच्या राजाकडून आणलेलीं पत्रें त्यानें बादशहाच्या स्वाधील केलीं. १५०० सालीं बादशहानें मुसुलमानाविरुद्ध पोर्तुगालच्या राजाची मदत मागितली. या विनंतीबरहुकूम पोर्तुगीज आरमारानें १५२० सालीं तांबड्या समुद्रांत प्रवेश केला. १५२८ व १५४० च्या दरम्यान विख्यात सेनानायक महमद ग्रॅन याचे शूर मुसलमान सैनिक देशांत शिरले व त्यांनीं बादशहाला पर्वतांत दडून बसावयास भाग पाडिलें. तेव्हां फिरून पोर्तुगीजांकडे मदत मागण्यांत आली. १५४१ त पोर्तुगीज व अबिसीनियन सैन्याची व मुसुलमानांची चकमक झडून त्यांत मुसुलमानच विजयी झाले. तथापि १५४३ त महंमद ग्रॅन हा एका चकमकींत पडल्यामुळें त्याच्या सैन्याचा सहज मोड झाला व अबिसीनियांत पोर्तुगीजांचें प्राबल्य माजलें. आक्झुमाईट राजे आद्याप पावतों ख्रिस्ती झाले नव्हते. बादशहानें उघड उघड ख्रिस्ती संप्रदायाचा स्वीकार करावा असा आतां पोर्तुगीज लोक आग्रह करूं लागले. १७ व्या शतकाच्या सुरुवातीस फादर पेड्रो पाएझ या पाद्र्यानें बादशहाचें मन वळवून त्याला ख्रिस्ती संप्रदायाची दीक्षा दिली. तथापि याच्या नंतरचा गृहस्थ मेंडेझ याच्या अदूरदर्शीपणामुळें लोकांचीं मनें पोर्तुगीजांविरुद्ध बिथरुन गेलीं. व १६३३ च्या सुमारास त्यांनां अबिसीनियामधून आपलें चंबूगवाळें उचलावें लागलें.
अबिसीनियन साम्राज्यांतील घटकावय जे प्रांत त्यांचा व मध्यवर्ती सरकारचा संबंध काय याचा येथें थोडा विचार केला पाहिजे. टायग्रे, अम्हारा व शोआ हे अबिसीनियांतील मुख्य प्रांत होत. मध्यवर्ती सरकार बहुतेक अम्हारा येथें असतें व तेथील राजा आपल्याला बादशहा अथवा 'राजाधिराज' (नेगस नेगुस्ती) असें म्हणवितो. मोठाल्या प्रांतांतील कित्येक राजेहि आपणास नेगस अथवा राजा असें म्हणवितात. बादशहाच्या मनगटांत सामर्थ्य असल्यास तो इतर प्रांतांपासून खंडणी वसूल करतो. अबिसीनियाचा सर्व इतिहास खून, मारामार्या, लुटालूट, अंदाधुंदी इत्यादिकांनीं रंगविलेला आहे. देशांत क्वचित् चांगले व उदारधी राजेहि होऊन गेले, नाहीं असें नाहीं; पण ते फार थोडे. १८ व्या शतकांतील विख्यात व दयाळू राजे खालील होते; (१) गोंडार येथील येसू राजा (मृत्यु १७२०); (२) शोआ येथील सेबास्टी (१७०३-१७१८); (३) अम्हाराचा टेक्ला जी आर्डिस (१७७०-१७९८); व (४) शोअचा अस्फनासेन (१७७४-१८०७). १८०५ सालीं अबिसीनियाशीं तह घडवून आणण्याकरितां व तांबड्या सुमुद्रावर बंदर मिळविण्याकरितां एक ब्रिटिश शिष्टमंडळ येथें आलें. या मंडळाच्या मागून यूरोपीय व्यापारी, प्रवाशी व मिशनरीलोक यांचे थवेच्याथवे अबिसीनियामध्यें लोटूं लागले. हा क्रम थिओडारे बादशहाच्या अमदानीपर्यंत अबाधितपणें चालू होता. १९ साव्या शतकाच्या आरंभीं अबिसीनियामध्यें गोंडार व टायग्रे या दोन प्रांतांच्या राज्यकर्त्यांत सत्तेविषयीं सारखा झगडा चाललेला होता. त्या झगड्यांत शेवटीं टायग्रे प्रांताचा राजा वोलडा सेलासी याला जय मिळून सबंध अबिसीनियाचें स्वामित्व त्यालाच मिळालें म्हटलें तरी चालेल. इ. स. १८१६ त वोलडा सिलासी मरण पावला व आगामीचा सागाबादिस याला राज्य मिळालें. यानें इंग्रजाशीं सख्य जोडल्यामुळें अम्हाराचा राजा मेरी यानें याच्यावर स्वारी केली. व १८३१ सालीं जान्युआरी महिन्यांत झालेल्या लढाईंत सागाबादिस व मेरी दोघेहि मरण पावले. मेरीच्या मागून अम्हाराच्या गादीवर अली विराजमान झाला. हा मुसुलमान होता. पण सामेनचा सुभेदार युबी यानें अलीवर स्वारी करून त्याला पराभूत केलें व टायग्रे येथील गादी बळकाविली या वेळीं उत्तर अबिसीनियामध्यें दोन तट झालेले होते. अम्हारा प्रांताचा पराभूत राजा अली हा ब्रिटिश प्रॉटेस्टंट लोकांच्या आश्रयास होता व टायग्रे व युबी हे फ्रेंच रोमनकॅथोलिकांच्या आश्रयास गेलेले होते. दोन तटांमधील हा अन्तर्गत कलहाग्नि बराच वेळ पावेतों आंतल्याआंत घुमसत होता; तो, कासा अथवा थीओडोर बादशहाच्या अमदानींत एकाएकीं भडकला व त्याच्या ज्वाला अंतरिक्षांत जाऊं लागल्या.
कासा याचा जन्म १८१८ सालीं पश्चिम अम्हारा प्रांतांतील क्वारा नामक जिल्ह्यांत झाला. चुलत्याच्या मरणामुळें क्वारा जिल्ह्याची मालकी कासाला मिळाली. १८४१-१८४७ च्या दरम्यान यानें रासअलीविरुद्ध बंडाचें निशाण उभारलें व पुढें लवकरच स्वातंत्र्य पुकारलें. रासअली व युबी यांच्या संयुक्त सैन्याचा यानें १८५३ त गॉर्गोरा येथे पराभव केला. कासानें आतां देशांतील इतर भागांकडे मोर्चा वळवून गोजम आणि टायग्रे येथील राजांचा पराभव केला व तिसरा थीओडोर या नांवाखालीं बादशहातीवर आरोहण केलें.
थीओडोरंच्या साम्राज्यसत्तेच्या आड आतां फक्त शोआ प्रांत कायतो उरला होता व त्यावर स्वारी करण्याचें थीओडार निमित्तच शोधीत होता. शोआचा राजा मेलीकॉथ यानें १८५० त रास अलीशीं तह केल्यामुळें आयतेंच निमित्त सांपडून त्यानें शोआ प्रांतावर स्वारी केली. मेलीकॉथ युद्ध चालूं असतांच मरण पावला व बाल राजा मेनेलेक याला हस्तगत करून विजयी होत्साता थीओडोर गोंडार येथें परतला.
यानंतर थीओडोर हा वोलोगाला लोकांवर विजय मिळविण्याकरितां निघाला. त्यांचा देश लुटून त्यानें मॅगडाला शहर घेतलें, व आपली सत्ता तेथें स्थापन केली.
थीओडोर व ग्रेटब्रिटन यांच्यांत क्षुल्लक कारणामुळें भांडण उपस्थित झालें. थीओडोरनें इंग्लंडच्या राणीसाहेबांस पाठविलेल्या पत्रास लवकर उत्तर येईना. म्हणून त्यानें ब्रिटिश वकील कॅप्टन कॅमेरॉन व त्याचे इतर सोबती यांनां तुरुंगांत टाकिलें. दुसर्या एका पत्रांत त्यानें राणीसाहेबांनां आपल्याकडे कांहीं यूरोपियन मजूर व यंत्रसामुग्री पाठवून देण्याची विनंति केली. राणीसाहेबांनीं त्याप्रमाणें कांहीं मंजूर व यंत्रसामुग्री पाठविली व कैद्यांची सुटका करण्यास थिओडोरला सांगितलें. परंतु याचा बादशहाच्या मनावर कांहींच परिणाम झाला नाहीं व अबिसीनिया आणि ग्रेटब्रिटन यांच्यांत युद्ध जुंपलें. पहिली चकमक अरोगीच्या मैदानावर झडली. तींत थीओडोरच्या सैन्याला आपलें पाऊल मागें घ्यावें लागलें. बादशहानें तहाची इच्छा प्रदर्शित करून सर्व यूरोपियन कैद्यांची सुटका केली, तथापि ब्रिटिशांची इतक्यांतच युद्ध थांबविण्याची इच्छा नसल्यामुळें त्यांनीं मॅगडाला घेतलें पण शहरांत जाऊन पाहतात तों त्यांनां थीओडोरच्या मृत शरीराचें दर्शन झालें. त्याचा मुलगा अलमायाहू याला त्याच्या बापाच्या इच्छेनुसार इंग्लंडला नेण्यांत आलें. सर्वत्र स्थिरस्थावर करण्यांत आल्यावर इंग्रजी सैन्यानें १८६८ च्या मे महिन्यांत अबिसीनिया देश सोडिला.
शोआ प्रांताच्या राजाचा मुलगा मेनेलेक हा थीओडोरच्या देखरेखीखालीं त्याच्या ताब्यांत काळ कंठीत होता हें मागें सांगितलेंच आहे. थीओडोरच्या अडचणींचा फायदा घेऊन यानें वोलोगाला लोकांच्या राणीकडे पलायन केलें. या राणीचा मुलगा थीओडोरकडे ओलीस ठेवलेला होता. मेनेलेकला आपल्या स्वाधीन न केल्यास त्या मुलास जिवें मारण्याची थीओडोरनें राणीस धमकी दिली. परंतु या शूर राणीनें आपल्या राज्याची व स्वत:च्या लाडक्या मुलाच्या प्राणाची किंमत देऊन मेनेलेकचें संरक्षण केलें. मेनेलेक सुरक्षितपणें शोआ येथें पोंचला व तेथील राज्यावर आरुढ झाला.
डौजाज कासा नामक तद्देशीयसरदारानें ब्रिटिशांस थिओडोर विरुद्ध बरीच मदत केली असल्यामुळें त्यांनीं त्याला शस्त्रास्त्रें व दारूगोळा देऊन गौरविलें होतें. या साधनांच्या जोरावर त्यानें टायग्रे, अम्हाला व गोंडार येथील राजांचा पराभव करून जॉन या नांवाखालीं 'बादशहातीवर' आरोहण केलें. १८७२ सालीं इजिप्तनें बोगास काबीज केल्यामुळें त्यानें इजिप्शियन सैन्यावर चाल करून गुंडेट येथें १३ नोव्हेंबर १८७५ रोजीं त्यांचा पुरा मोड केला. २५ मार्च १८७६ रोजीं त्यानें दुसर्यांदां आलेल्या इजिप्शियन सैन्याचाहि पराभव केला व आपल्या विजयी सैन्यासह शोआ प्रांताकडे मोर्चा वळविला. यावेळीं शोआ येथें नुसती बजबजपुरी माजून राहिली होती. यामुळें जॉन बादशहाला मेनेलेकच्या सैन्यावर मात करणें सोपें झालें. शोआच्या स्वातंत्र्याचा अस्त होऊन तो परवशतेच्या काळोखांत खितपत पडला.
अबिसीनियाच्या राजकारणाच्या रंगभूमीवर यापुढें इटाली हें पात्र दिसावयाला लागलें, असाबबेच्या उत्तरेकडील बैलूल बंदर इटालीनें १८८५ मध्यें काबीज केल्यामुळें जॉन व मेनेलेक या दोघांनांहि संताप चढला. इजिप्तपासून इटालीनें मसावा घेतल्यामुळें तर या त्यांच्या संतापांत अधिकच भर पडली. १८८७ च्या जान्युआरींत युद्धास तोंड लागलें पण त्यांतून निश्चित असें कांहीच निष्पन्न झालें नाहीं. इकडे जॉन व माहदीच्या लोकांत वितुष्ट उत्पन्न होऊन माहदीच्या सैन्यानें गोंडार घेतलें. जॉन व माहदीच्या लोकांत गालाबाट येथें मोठी लढाई होऊन तींत माहदीच्या सैन्याचा पराभव झाला, पण जॉनच्या शरीरांत गोळी शिरल्यामुळें तो मरण पावला. जॉनच्या मृत्यूची वार्ता ऐकतांच मेनेलेकनें बादशाहत काबीज केली व जॉनचा मुलगा मांगाश याला आपली सत्ता मान्य करण्यास भाग पाडिलें. २ मे १८८९ रोजीं इटालीनें मांगाशशीं मित्रत्वाचा तह केला याला युक्कीअल्ली तह म्हणतात. कांहीं कालानंतर इटलीनें संधान बांधण्यास सुरुवात केलीं, हें पाहतांच मेनेलेक खडबडून जागा झाला व त्यानें इटालीस याचा जाब विचारला. इकडे मांगाश यानेंहि इटालीविरुद्ध माहदीच्या अनुयायांशीं कारस्थान सुरू करून मोठ्या सैन्यानिशीं इटालियन मुलुखावर स्वारी केली. १८९५ मध्यें इटालियन सैन्यानें त्याचा पाडाव केला. परंतु मांगाशच्या साहाय्यार्थ मेनेलेक धांवून आल्यामुळें इटालीला मागें पाऊल घेणें भाग पडलें (१८९५-९६).
सैन्याची पुन: जमवाजमव करून इटालीयनांनीं अबिसीनियाशीं अॅडावा येथे सामना दिला पण त्यांतहि त्यांचा इतका जबरदस्त पराभव झाला कीं, त्यांनां फिरून तोंड वर करतां आलें नाहीं. अखेरीस युक्कीआली तह रद्द करण्यांत येऊन अबिसीनियाचें स्वातंत्र्य मान्य करण्यांत आलें. मेनेलेकच्या बादशाही सत्तोविरुद्ध मांगाश फिरून बंड करण्याच्या विचारांत आहे असें दिसून आल्यावर १८९८ सालीं मेनेलेकनें त्याच्यावर स्वारी करून त्याला शरण येण्यास भाग पाडलें. १९०२ सालीं इंग्लंड व अबिसीनिया यांच्यांत तह होऊन सूदन व अबिसीनिया यांच्यांतील सरहद्द आंखण्यांत आली. १९०७ सालीं अबिसीनिया व ब्रिटिश ईस्ट आफ्रिका आणि युगांडा यांच्यांतील सरहद्दी आंखण्यांत आल्या.
१८९९ सालीं हाजी महमद अबदुल्ला यानें ब्रिटिश सोमालीलँडच्या सरहद्दीवर बंड उभारलें. बंडाचा मोड करण्याच्या कामीं अबिसीनियनांनीं ब्रिटिशांस शेवटपर्यंत मदत केली. १९०३-०४ सालांपर्यंत हे बंड चाललें होतें, तरीहि त्याचा मोड झाला नाहीं.
यावेळीं मेनेलेकचें वैभव अगदीं शिखरास पोंचलें होतें. बहुतेक यूरोपियन राष्ट्रांनीं आपले प्रतिनिधी त्याच्या दरबारीं ठेविले. १९०३ मध्यें युनायटेडस्टेट्स व अबिसीनिया यांच्यांत व्यापारी तह करण्यांत आला. १९०५ मध्यें जर्मनीनेंहि अबिसीनियाशीं व्यापारी तह केला.
१९०६ सालीं रास माकोनेन व मागांश हे दोन जवळचे वारस मरण पावल्यामुळें देशांत राज्यलोभी दूरच्या वारसांत तंटेबखेडे होण्याचीं चिन्हें दृग्गोचर होऊं लागलीं. विनाकारण होणारा रक्तपात टाळतां यावा म्हणून मेनेलेकनें १९०८ सालीं लिजयासु नामक आपल्या नातवाला आपला वारस नेमिलें.
१९१० मध्यें तो कांहीं रोगामळें राज्यकारभार पाहण्यास असमर्थ झाला तरी १९१३ डिसेंबर मध्यें तो मरेतों लोक त्याला सर्वश्रेष्ठ सत्ताधीश म्हणून मानीत असत. मेनेलेकचा नातू लिजयासु यास १९१० मध्यें रीजंट नेमण्यांत आले, व तोच गादीचा वारस ठरलेला होता. पण मेनेलेकची राणी तैतु हिनें विरोध करून सत्ता आपल्या हातीं घेतली. परंतु एक वर्षानंतर राजवाड्यांतच क्रांति होऊन तिच्या हातून सत्ता काढून घेण्यांत आली. त्यानंतर तिनें राज्यकारभारांत अखेरपर्यंत ढवळाढवळ केली नाहीं. ती १९१८ फेब्रुवारीमध्यें मरण पावली.
१९११ पासून लिजयासूच्या हातीं पूर्ण सत्ता आली व मेनेलेकच्या मरणानंतर त्याला बादशहा म्हणून सर्वांनीं मान्य केलें. तथापि लिजयासु याचें वर्तन अनीतीचें असून कारभार जुलमी होता. शिवाय कोट-सव्वाकोट लोकसंख्येपैकीं पांच लक्ष लोकांचें त्यानें खडें सैन्य ठेविलें होतें. हे सैन्यांतले लोकच लुटालूट करून उपजीविका करीत. या त्रासामुळें प्रजेंत असंतोष माजत चालला.
१९१० ते १९२१ याच्या दरम्यान अबीसिनियाच्या आंतरराष्ट्रीय दर्जांत कोणताहि फरक झाला नाही. स्पॅनिश प्रोटेक्टरेट्स वगळल्यास अबीसीनिया हा आफ्रिकेंतील एकच देश गेल्या जागतिक युद्धांत पूर्ण तटस्थ राहिला होता.
१९१४ मध्यें जिबुतीपासून हबाशनदीपर्यंत रेल्वे झाली होती व यूरोपांतील मालाची आवड लोकांत वाढत चालली होती. अशा सुमारास १९१४ मध्यें जागतिक युद्ध सुरू झालें. लिजयासु याजवर जर्मन व तुर्क यांचें वजन बरेंच होतें. अबिसीनियन लोक ख्रिस्ती असून लिजयासु ख्रिस्ताचार नीट पाळीत नसल्यामुळें त्याची प्रजा नाखूष होत चालली होती. लवकरच लिजयासूनें उघडपणेंच इस्लामी धर्म स्वीकारला व आपल्या साम्राज्यांतील सर्व मुसुलमान एकत्र करून तुर्कजर्मनीला मिळण्याची तयारी करूं लागला. त्यानें आपल्या सत्तेखालील मुसुलमान संस्थानिकांच्या मुलींशीं लग्नें लावलीं. १९१६ मध्यें तुर्कस्तानचा सुलतान हा खलीफ म्हणजे धर्म गुरू म्हणून मानण्याचें त्यानें सरकारीरीत्या जाहीर केलें.
शिवांय त्यानें आपल्या मुसुलमान अनुयायांनां असें कळविलें की, जर्मनी व आस्ट्रिया यांनीं इस्लामीधर्म स्वीकारला असून फ्रान्समध्यें तो धर्म प्रस्थापित करण्याचें काम चालू आहे. एखादा मोठा विजय जर्मनीला मिळतांच दोस्तराष्ट्रांविरुद्ध युद्धांत सामील व्हावयाचें असेंहि त्यानें प्रसिद्ध केलें.
लिजयासूच्या या ख्रिस्तविरोधी वर्तनामुळें त्याचा नाश झाला. दोस्ताचे अडिसअबाबा येथील प्रतिनिधी विशेषत: ब्रिटिश मिनिस्टर दि ऑनरेबल डब्ल्यू. जी. थेसिगेर, यांनीं तुर्क जर्मन पक्षातर्फेची चळवळ हाणून पाडण्याची फार खटपट केली व तिला यश येऊन २७ सप्टेंबर १९१६ रोजीं धर्मांतराच्या कारणास्तव लिजयासूला पदच्युत करण्यात आलें. त्याची आत्या प्रिन्सेस झौडितु (जुडिथ) हिला बादशाहीण म्हणून जाहीर करण्यांत आले, व या गोष्टीस सर्व प्रजेची मान्यता मिळाली. लिजयासु हारार येथें सैन्य जमवीत होता. त्याला ही बातमी कळताच इस्लामी धर्माचा त्याग केल्याचें त्यानें जाहीर केलें. पण त्यावर कोणाचा विश्वास बसला नाहीं. उलट त्याच्या मनाचा दुबळेपणा मात्र व्यक्त झाला. लवकरच उभयपक्षांत युद्ध सुरू झालें. त्यांत लिजयासूला हारार सोडून पळून जावें लागलें. पण लिजयासूचा बाप रासमिकेल यानें सैन्य जमवून लढाई दिली. १९१६ आक्टोबर मध्यें शॅनो येथें निकराची लढाई होऊन त्यांत मिकेलच्या सैन्याचा पराभव झाला व तो स्वत: कैद केला गेला. १९१७ मध्यें सैन्य जमवून पुन्हां लिजयासूनें लढाई सुरू केली. पण त्यांतहि त्याचाच पराभव झाला, व तो डनकिल व सोमाली लोकांत भटकत दिवस कांढू लागला. १९१८ मध्यें अरबस्तानांतील तुर्कांची मदत मिळविण्याचा प्रयत्न त्यानें केला आणि अखेर १९२१ मध्यें याला सरकारी सैन्यानें कैद केलें.
झौडितु बादशाहीण दोस्तांच्या बाजूची होती. तिनें १९१९ मध्यें लंडन, पॅरिस, रोम, ब्रूसेल्स, व वॉशिंगटन येथें मिशनें पाठवून विजयाबद्दल दोस्तराष्ट्रांचें अभिनंदन केलें. या मिशनांमार्फत गुलामगिरी बंद करण्याचा व शेतकी व व्यापार वाढविण्याचा सदुपदेश दोस्त सरकारांनीं अबिसीनियाच्या सरकारला केला.
या देशाची आर्थिक उन्नति होण्यास मुख्य दोन अडचणी आहेत, त्या अंतर्गत अशांतता व दळणावळणाच्या साधनांचा अभाव. जागतिक युद्धानंतर व एडनच्या आखातापासून अडिसअबाबापर्यंत रेल्वे पुरी झाली असल्यामुळें आतां सुधारणा होईलसें वाटतें. १९२० मध्यें एकंदर व्यापार ३५-४० लाख पौडांचा झाला. निर्गत व्यापाराचा मुख्य माल म्हणजे कातडीं, काफी व मधमाशांचें मेण हा होय. मुख्य आयात माल कापसाचें कापड. येथील पुष्कळसा व्यापार ग्रीक, सीरियन व अरबलोकांच्या हातीं आहे. येथें शेतकी सुधारलेली नाहीं, खनिज संपत्तीलाही हात लागलेला नाहीं. तसेंच जलशक्तीचाहि उपयोग करून घेण्याचा उपक्रम झालेला नाहीं.
सन १९२३ च्या पूर्वार्धांत अबिसीनियामधील गुलामगिरी विषयीं एक ब्रिटिश सरकारचा ''व्हाईट पेपर'' प्रसिद्ध झाला त्यांत हिजाजच्या किनार्याजवळ एक २६ गुलाम असलेलें गलबत आढळलें आणि ते गुलाम अबिसीनयामध्यें खरेदी केले होते आणि ते अरबस्तानांत विकण्यासाठीं जात होते, अशा प्रकारचा मजकूर होतो. अबिसीनियाच्या रीजंटनें अशी खातरजमा दिली कीं, त्याचें सरकार गुलामाच्या व्यापार्यांनां पकडून शिक्षा करण्यास उत्सुक आहे. त्यावेळी अशीहि धास्ती पडली होती कीं, अबिसीनियांतील गुलाम पकडण्याचे प्रदेश निर्जन होत गेले म्हणजे अबिसीनियांतील या व्यापाराचे नाईक आपलें लक्ष केनियांतील देश्य लोकांकडे वळवितील आणि तेथील वसाहतीचा सहज पराभव करतील. १९२३ च्या सप्टेंबरमध्यें अबिसीनियाचा प्रवेश राष्ट्रसंघांत झाला. त्यावेळेस त्याला स्वीकारावें किंवा नाहीं, यासंबंधानें राष्ट्रसंघास विचारच पडला आणि तो विचार पडण्याचें कारण आस्ट्रेलियानें अबिसीनियात गुलामांचा व्यापार अजून आहे, असें कारण किंवा समजूत घेण्यास आक्षेप म्हणून दिलें होतें.