विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबुल फजल - अबुल फजल उर्फ अल्लामी (१५५१-१६०२) हा शेख मुबारिक याचा मुलगा आग्र्याजवळ १४ जानेवारी १५५१ रोजीं जन्मला. हा अस्सल अरबी कुटुंबात जन्मला होता. या कुटुंबाचा पूर्वज शेख मुसा हा अरबस्तानांत रहात होता. ९ व्या शतकांत हें कुटुंब सिंधप्रांतांत राहिलें होतें. तेथून मुबारिकचा बाप शेख खिज हा साधुवृत्तीनें फिरत फिरत अजमीरनजीक नागोर येथें येऊन राहिला व तेथें शेख मुबारिक जन्मला. मुबारिकच्या लहानपणींच ह्या कुटुंबाची दुष्काळांत वाताहात झाली; पण सुदैवानें मुबारिक बचावला. तो त्या काळांतील विद्यापीठांतल्या एका अध्यापकाजवळ राहून चांगली विद्या शिकला. पुढे तो पुष्कळ वर्षे अहमदाबादेस राहून नंतर आग्र्याजवळ यमुनाकाठीं एका साधूजवळ राहिला, व तेथें त्यानें अध्यापकाचें काम सुरू केलें. मुबारिक फार विद्वान व स्वतंत्र विचारांचा होता. तो जुन्या ग्रंथांवर विश्वास न ठेवतां खर्याखोट्याचा निर्णय स्वत: स्वतंत्र बुद्धीनें करीत असे. त्यावेळीं सुनी, शिया व सूफी असे तीन वेगवेगळे पंथ मुसुलमानांत झाले होते. मुबारिक सुनी पंथांत काढलेला, पण पुढें शियापंथ स्वीकारून यूरोपांतील लूथरप्रमाणें तत्कालीन धार्मिक सुधारणेच्या चळवळींचा तो पुढारी बनला. आग्रा येथेंच त्याचा वडील मुलगा अबुलफैजी व धाकटा अबुलफजल हे दोघे जन्मले व त्यांनां त्यानें चांगलें शिक्षण देऊन स्वत:चे धार्मिक विचार शिकविले. दिल्लीच्या बादशहानें मुबारिक यास जमीनीची नेमणूक करून दिली होती. परंतु जुन्या पंथाच्या उलेमांनीं अकबरास मुबारिक पतित असल्याचें कळविलें व त्याला पकडण्याचा हुकूम मिळविला; तेव्हां मुलांनां आग्र्यासच ठेवून मुबारिक पळून गेला. मागें दोघे मुलगे मोठ्या योग्यतेस चढले. वडील मुलगा सूफीपंथी कवि होता तो सदैव विचारात मग्न असे, सुरेख कवनें करी व भक्तिपुर:सर ईश्वराचा स्तव करी. तीं कवनें पाहून अकबरानें त्यास आश्रय दिला. तेव्हांपासून या कुटुंबाचा छळ बंद होऊन त्याचें दैव उघडलें (स. १५६८). धाकटा अबुल फजल याची बुद्धिविशाल व महत्त्वाकांक्षा जबर होती, व तो त्या वेळच्या सर्व विद्यांत निपुण होता. वीस वर्षांच्या वयांतच बहुतेक सर्व ग्रंथ वाचून तो बापाप्रमाणें लोकांस पढविण्याचें काम करूं लागला. पुढेंहि संन्यस्तवृत्तीनें राहून तिबेटच्या लामांची, पोर्तुगालच्या पाद्य्रांची व पारशी झेंदावेस्ता पंडिताची गांठ घेऊन त्यांच्याजवळ धार्मिक चर्चा करावी असें त्याच्या मनांत होतें. परंतु अकबरानें फैजीचा जो सत्कार केला त्यामुळें हा सर्व बेत बदलला. दरबारी व समयोजित वर्तन ठेवून स्तुतिपाठकाचें काम करण्यांतहि त्याचा हातखंडा होता. सन १५७४ मध्यें वडील भावाच्या शिफारसीनें त्याची बादशहाशीं ओळख झाली. तो अकबरास परम दैवत समजून त्याला देवाप्रमाणें नमन करून भजूं लागला. अकबरहि स्तुतिप्रिय असल्यानें दोघांचा स्नेह जमण्यास मुळींच उशीर लागला नाहीं. हा स्नेह जमला त्या सुमारास अकबर मोठ्या कचाट्यांत सांपडलेला होता. सर्व लोकांस सारख्या प्रेमानें वागवावयाचें असा त्याचा निर्धार असल्यामुळें, पुष्कळ लोकांस शियापंथ स्वीकारल्याबद्दल व स्वतंत्र विचार प्रकट केल्याबद्दल आग्र्याच्या सरन्यायाधीशानें सांगितलेल्या देहान्तशिक्षा अमलांत आणण्यास त्याचें मन धजत नव्हतें. परंतु उलट कुराणधर्मनिष्ठ उलेमांनां दुखविण्याचीहि त्याची तयारी नव्हती. उलेमा हे अभिमानानें फुगलेले व हेकेखोर होते. आरबी भाषा व कुराण ह्यांपलीकडे त्यांची विद्वत्ता नव्हती. फैजी व फजल या दोघा भावांची चलती पाहून व त्यांची बादशहावर छाप बसलेली पाहून उलेमांस अत्यंत वाईट वाटे. बापास छळल्याबद्दल त्यांचा पाडाव करून सूड घ्यावा असें अबुल फजलच्याहि मनांत होतें. इतक्यांत सर्व धार्मिक प्रश्नांचा वादविवाद उलेमांनीं आपल्या देखत करावा, म्हणजे खऱ्याखोटयााचा निकाल सहज करतां येईल असा अकबरानें हुकूम सोडला. या बाबतींत अबुल फजलच्या बुद्धिमत्तेचा व विद्वत्तेचा फायदा करून घेऊन उलेमांचा शिरजोरपणा कमी करून धर्मच्छळ बंद करावा असा अकबराचा हेतु होता. या योजनेप्रमाणें इ. स. १६७६ पासून दर गुरुवारीं सभा भरून शिया, सुनी, सूफी, ब्राह्मण, बौद्ध, ख्रिस्ती, यहुदी, पारशी, व इतर पंथांचे विद्वान् जमून वादविवाद निर्भीडपणें व मोठ्या आवेशानें होऊं लागले. अबुल फजल प्रश्न विचारण्याचें व अभिप्राय मागविण्याचें काम करी; बादशहा फक्त ऐकून अखेर निकाल देई. या सभांत अखेर उलेमांचा पाडाव होऊन कुराणास अनुसरून नवीन फेरफार करण्याचा अधिकार बादशहास आहे, अशी कबुली उलेमांस द्यावी लागली. याचें बहुतेक श्रेय अबुल फजलला होतें, त्यामुळें त्याच्याबद्दल बादशहाला फारच आदर वाटूं लागला. जानेवारी १५९० (हिजरी सन ९९८) त अबुल फजलची आई मरण पावली. त्याप्रसंगी बादशहा स्वत: शातवनार्थ त्याच्या घरीं गेला होता. अबुल फजल हा सदैव बादशहाच्या सन्निध राहूं लागला व स्वारींत बरोबर जात असे. त्याच्या सल्ल्यानें बादशहानें नवीन धर्म स्थापन केला. यामुळें फजल मुसुलमानास अगदींच दु:सह झाला. त्याचा पाडाव करण्याकरिता विरुद्ध पक्षानें मोठा कट केला व त्यांत राजपुत्र सलीमहि मिळाला. असें सांगतात कीं, सलीम एकदा अबुल फजलच्या घरीं एकाएकीं गेला. तेव्हा तेथें चाळीस लेखक कुराणाच्या एका मोठ्या टीकेच्या प्रती उतरून घेत होते. ती टीका फजलच्या बापानें लिहिलेली होती; पण ते सर्व कागद अकबरास दाखवून 'फजलची भक्ति कुराणावरच आहे; पण तो फक्त तुमच्याजवळ बाह्यात्कारी नवीन धर्माची बढाई मारतो' अशी सलीमनें समजूत करून दिली. तें ऐकून अकबराची फजलवर थोडीशी इतराजी झाली; परंतु फजलच्या वैर्याचें हें कारस्थान आहे, असें समजून आल्यावर कांही दिवसांनीं अकबर व फजल यांचें पूर्ववत् प्रेम जुळलें; पण सलीमचा स्वभाव दुष्ट होता आणि त्यानें बापाविरुद्ध केलेल्या बंडात फजल सामील होत नव्हता म्हणून त्याला जगातून नाहींसा करण्याचा विचार सलीमनें ठरविला. अबुल फजल उज्जनीहून आग्र्याकडे येत असतां वाटेंत ओच्छो संस्थानच्या जंगलात सलीमाचा साहाय्यक ओर्च्छाचा राजा वीरसिंहदेव याच्या लोकांनीं त्याजवर छापा घालून १२ आगष्ट १६०२ रोजीं त्याला ठार मारलें. त्याचें डोकें अलाहाबादेस पाठविलें, तें सलीमनें गलिच्छ जागीं टाकून दिलें. त्याच्या धडावर अंत्री येथे बांधलेलें लहानसें थडगें अबुल फजलचें म्हणून अद्याप दाखविण्यांत येतें. ही बातमी कळतांच अकबर एकदम मोठ्यानें ओरडून बेशुद्ध पडला व पुढें मरेपर्यंत या दु:खानें तो अत्यंत विव्हल असे. तथापि मुलानें खून केला ही खात्री असून त्यानें त्याला शिक्षा केली नाहीं. उलटपक्षीं कांहींच्या मतें फजलच्या खुनांत सलीमचें कितपत अंग आहे हें बादशहास अखेरपर्यंत कळलें नव्हतें. वीरसिंहाचा मात्र छळ करून त्यानें आपल्या मनाचें समाधान करून घेतलें.
अबुल फजलची योग्यता बाप व भाऊ ह्या दोघांच्याहि पेक्षां श्रेष्ठ होती. त्यानें किती लेखनकार्य केलें, हें त्याच्या ग्रंथांवरून दिसून येतें. त्याची भाषा साधी व विचार थोर होते. खोडसाळपणाचा त्यास अत्यंत तिटकारा होता. त्याच्या लेखांत अपशब्द बिलकूल सांपडत नाहीं. 'अकबर नामा' हा अबुल फजलचा सर्वांत मोठा ग्रंथ होय. यांत उलेमांच्या कृत्यांची भरपूर चर्चा आहे; पण प्रतिपक्षावर द्वेषमूलक शब्दांचा वर्षाव केलेला त्यांत कोठेंहि नाहीं. या ग्रंथाचे तीन भाग असून तिसरा भाग 'ऐन इ-अकबरी' म्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या भागांत तैमूरपासून हुमायूनपर्यंतचा इतिहास दिला आहे. दुसर्या भागांत अकबराच्या कारकीर्दीतील एकंदर महत्त्वाच्या गोष्टींचें वर्णन दिलें आहे. तिसरा भाग 'ऐन इ-अकबरी' याचे पांच विभाग असून त्यांपैकीं पहिल्यांत बादशहा, त्याचें कुटुंब, दरबार इत्यादिकांचें वर्णन; दुसर्यांत दिवाणी, लष्करी व दरबारी नोकर, त्यांचीं नावें, कामें व पगार यांचें वर्णन, तिसर्या विभागांत न्याय व जमाबंदी या खात्यांचें विवेचन; चवथ्यांत लोकांच्या विशेषत: हिंदूंच्या सामाजिक व बौद्धिक स्थितीचें वर्णन आणि शेवटल्या विभागांत थोर पुरुषांच्या व कवींच्या उक्ती, म्हणी व स्फुटवचनें यांचा संग्रह केलेला आहे. हा तिसरा विभाग इ. स. १५९८ त पुरा झाला. या 'ऐन इ-अकबरी' चें हल्लीं ब्लॉकमन व गॅरेट यांनीं अस्सल प्रतीवरून इंग्रजींत केलेले भाषांतर उपलब्ध आहे. ब्लॉकमनचा अबुल फजलविषयीं अभिप्राय येणेंप्रमाणें:-
''अबुल फजलची सत्यप्रीति, परमतसहिष्णुता, त्याचा दरबारचा फार दिवसांचा अनुभव, त्याची सुंदर भाषा व बादशहाचा त्याजवरील भरंवसा यामुळें त्याच्या ग्रंथास विशेष किंमत आली आहे. हें त्यानें आपल्या बादशहाच्या थोरपणाचें व स्वत:च्या विद्वत्तेचें एक प्रकारचें कायमचें स्मारकच करून ठेविलें आहे.''
वरील ग्रंथांशिवाय इतर अनेक विषयांवर त्यानें लिहिलेलीं स्वतंत्र पुस्तकें व अकबरास लिहिलेल्या पत्रांचा संग्रहहि उपलब्ध आहे. त्याला शेख अबदुर्रहमान अफझलखान नांवाचा मुलगा होता. अबुल फजलचें वैर मनांत न ठेवतां जहांगीरनें या मुलाला बहारप्रांताचा कारभार दिला होता. हा इ. स. १६१३ त मरण पावला.