विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबुल फैजी - अकबराच्या दरबारांतील सुप्रसिद्ध सुफीपंथी कवि. हा नागोरच्या शेख मुबारकचा पुत्र असून अबुल फजल याचा वडील भाऊ होता (अबुल फजल पहा). याचा जन्म ता. १६ सप्टंबर सन १५४७ (१ शाबान ९५४) रोजीं आग्रा येथें झाला. फैजीची व अकबराची प्रथम भेट अकबराच्या कारकीर्दीच्या १२ व्या वर्षी झाली. यावेळीं फैजीच्या बापावर अकबराच्या दरबारांतील मुसुलमानी पंडितांनीं बालंट आणल्यामुळें तो आपल्या मुलांनां आग्र्यासच ठेवून अज्ञातवासांत गेला होता. फैजीचीं कवनें वाचून अकबरास समाधान वाटलें आणि चितोडच्या वेढ्याचें काम चालू असतां त्यानें फैजीस भेटीस बोलाविलें. त्यास शिक्षा करण्याकरितां बादशहानें हें पाचारण केलें, अशी प्रथम उलेमांची समजूत होऊन त्यांस आनंदाच्या उकळ्या फुटूं लागल्या. फौजेच्या अधिकार्यानें मुबारिकच्या घरीं जाऊन त्यास वाटेल तसा त्रासहि दिला. फैजीला पकडून त्यानें बादशहासमोर नेलें. तेथें बादशहानें फैजीचा सत्कार केला, तेव्हां त्याच्या जीवांत जीव आला.
फैजी ह्याजकडे कांहीं दिवस शहाजादा मुराद ह्यास पढविण्याचें काम होतें. पुढें त्याची आग्र्याच्या 'सदरच्या' जागीं नेमणूक झाली. सन १५८८ त त्यास 'कविराज' ह्या अर्थाचा किताब मिळाला. हिंदुस्थानांत दोनच मोठे उत्कृष्ट फारशी कवी होऊन गेले, पहिला अमीर खुश्रु व दुसरा फैजी. इतिहास, तत्त्वज्ञान, वैद्यकी, पत्रव्यवहार व कवित्व या विषयांत त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. त्याच्या पूर्वींच्या कवितांत फैजी असें कत्याचें नांव आहे; परंतु मृत्यूच्या अगोदर एक दोन महिने तो फैजीच्या ऐवजीं फैयाजी असें नांव घालूं लागला होता. बादशहाच्या आज्ञेवरून त्यानें महाभारतांतील नलदमयंती आख्यानावर फारशीमध्यें काव्य केलें होतें. हिंदु वाङ्मयाचा व शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करणारा पहिला मुसुलमान फैजी हाच होता. संस्कृतमधील काव्य व तत्त्वज्ञानग्रंथांशिवाय त्यानें भास्कराचार्याच्या बीजगणित व लीलावती या ग्रंथांचींहि भाषांतरे केलीं होतीं. त्याची स्वतंत्र कविताहि बरीच असून दुसरींहि कित्येक पुस्तकें त्यानें फारशीमध्यें लिहिलेलीं आहेत. त्यानें फारशी मूळाक्षरांतील २८ अक्षरांपैकीं टिंबें नसलेल्या १३ अक्षरांचाच फक्त उपयोग करून कुराणावर सवात-उल-इलहाम नांवाची एक विस्तृत टीका लिहिली होती. त्यानें एकंदर १०१ ग्रंथ रचले होते असें म्हणतात. त्याची वकील म्हणूनहि कधीं कधीं नेमणूक होत असे. उदाहरणार्थ, तो इ. स. १५९२ च्या सुमारास दक्षिणेंत होता व येथूनच त्यानें राजाच्या इतराजींत असलेल्या बदाउनी नामक इतिहासकारास पत्र लिहिलें होतें.
आगष्ट सन १५९३ (जिल्काद १००१) त शेख मुबारिक मरण पावला, तेव्हां त्याच्या दोघांहि मुलांस अत्यंत दु:ख झालें. मुबारिकला जरी पुष्कळ शत्रू होते, तरी त्याच्या विद्वत्तेबद्दल सर्व लोकांत मोठा आदर होता. स्वत: फैजी यास दम्याचा विकार होता. तो बापाच्या पश्चात् अवघ्या दोन वर्षांनीच आग्रा येथें मरण पावला (शनिवार ता. ४ (५?) आक्टोबर सन १५९५). मरणापूर्वीं थोडा वेळ बादशहा अकबर आपला विद्वान हकीम बरोबर घेऊन फैजीच्या समाचारास गेला असतां फैजीचें बोलणें बंद झालें होतें. बादशहा बोलला, 'शेखजी, माझे हकीम औषध द्यायला आणिले आहेत, औषध घ्या.' त्यावर कांहींच उत्तर आलें नाहीं, असें पाहून बादशहाला अत्यंत कळवळा आला. असें म्हणतात कीं, त्यानें त्यावेळीं वैतागानें डोकीचें पागोटें काढून जमिनीवर आपटलें आणि बराच वेळ बसून अत्यंत शोक केला. [सं द र्भ ग्रं थ.- ऐनइ अकबरी, मुसुलमानी रियासत; बीलचा कोश].