प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अबू - अर् बुद्ध म्हणजे ज्ञानाची टेकडी अशी याची व्युत्पत्ति सांगितलेली आहे. राजपुतान्यांतील शिरोही संस्थानांत दक्षिणेस हा एक प्रसिद्ध पर्वत आहे. हा राजपुताना माळवा रेल्वेच्या अबूरोड स्टेशनपासून १७ मैलांवर व मुंबईपासून ४४२ मैल उत्तरेस आहे. उ. अ. २४ ३६' व पू. रे. ७२ ४३'. ही अरवली पर्वताची एक शाखा समजली जाते तरी त्यापासून अगदीं तुटक आहे. याचा आकार लांब व अरुंद आहे परंतु याचा माथा एक निसर्गरमणीय पठार आहे. हें समुद्रसपाटीपासून ४००० फुटांवर असून लांबी १२ मैल व रुंदी २ ते ३ मैल आहे. याचें मुख्य शिखर ''गुरु शिखर'' हें समुद्रसपाटीपासून ५६५० फूट उंचीवर आहे. हवा साधारण सर्व वर्षभर सुंखावह व आरोग्यदायक असते. जानेवारी महिन्यांत येथील उष्णतामान ५९ फ. अंशावर असतें ते उन्हाळ्यांत मे महिन्यांत ७९ फ. अंशावर येतें. येथील प्रेक्षणीय भाग नयनमनोहर असून पश्चिम व उत्तर बाजू एकदम उतरणीच्या आहेत. पूर्व व दक्षिण या बाजूंनां पुष्कळ फांटे फुटलेले असून त्यांच्यामध्यें खोल दर्‍या आहेत.

अरवली पर्वत व सपाट मैदानें यांमध्यें आढळणार्‍या झाडांनीं अबूचा पायथा व उतरणी गच्च भरून गेल्या आहेत. अबूवर पाऊस फार पडत असल्यामुळें सर्व राजपुतान्यापेक्षां येथें झाडी फार आहे. येथें पांढर्‍या गुलाबाचे ताटवेच्याताटवे लागलेले असतात व करवंदीच्या फुलांचा वास हवेमध्यें दरवळून गेलेला असतो. कार नांवाचें एक झाड येथें उगवतें, तें दिसण्यांत अति सुंदर असून जेव्हां सहा सात वर्षांनीं त्याला फुलें येतात तेव्हां त्यांचा निळा जांभळा रंग एकदंर सृष्टिसौंदर्यांत पुष्कळच भर टाकतो.

अबूच्या कँपांत पोंचण्यापूर्वीं सुमारें एक मैल अलीकडे दिलवाड्यास जाणार्‍या मंडळीस उतरावें लागतें. उतारूंनां कँपांत घेण्यापूर्वीं डॉक्टरांची तपासणी होते. कँपमध्यें बाजार व लोकवस्ती आहे. हे राजपुताना सरकारचें ग्रीष्म ऋतूंतील वसतिस्थान आहे. इ. स. १८४० पर्यंत हें हवेचें ठिकाण ठरलें नव्हतें. जोधपूर पलटणीचें ऑफिसंर्स व सिरोहीचा पोलिटिकल सुपरिन्टेडेंट हे उन्हाळ्यांत हवा खाण्यास येत असत. इ. स. १८४५ मध्यें सिरोहीच्या राजानें येथें आरोग्यगृह बांधण्याकरितां कांहीं जमीन गाई न मारण्याच्या व गाईचें मांस वर न नेण्याच्या अटीवर दिली. तेव्हां येथें आजारी यूरोपियनांकरितां खोल्या बांधण्यांत आल्या. सध्यां येथे लष्करी व मुलकी असे दोन भाग आहेत. त्यांची वस्ती स्वाभाविकपणें नेहमीं कमीजास्त होत असते. लोकसंख्या सुमारें साडेतीन हजार आहे. डोंगरांत एकमेकांपासून अलग अशीं भिल्लांचीं १८ गांवे आहेत. त्यांचीं लोकसंख्या सुमारें दोन हजार आहे. अबूला एक म्युनिसिपालिटी असून तेथील मॅजिस्ट्रेट हाच तिचा सेक्रेटरी असतो. म्युनिसिपालिटीचें उत्पन्न सरासरी वर्षास ११००० रु. असतें. येथील स्मालकॉज कोर्ट व डिस्ट्रिक्ट कोर्टच्या न्यायाधीशाचें काम मॅजिस्ट्रेटच पाहतो. गांवांत शेट नागरदास रणछोडदास यांची मोठी पेढी आहे. सरकारचे हेच खजिनदार होत; अबूवर प्रवाश्यांनां राहण्यासारखी कांहिंहि सोय नाहीं.

येथें तीन शाळा आहेत व त्यांमध्यें सुमारें अडीचशें विद्यार्थ्यांची शिकण्याची सोय आहे. यांपैकीं ''अबू लॉरेन्स स्कूल'' नांवाची शाळा यूरोपियन शिपायांच्या पोरक्या मुलांकरिता असून त्या शाळेसाठीं दरवर्षीं ३०००० रु. खर्च केला जातो.

दं त क था.- हें प्राचीनकाली देवांचें राहण्याचें आवडतें ठिकाण होतें. येथें वसिष्ठादि मुनी तपाचरण करीत. त्यावेळीं या जागीं पर्वत मुळींच नसून फक्त जमीनींत एक विवर असे. त्यांत एकदां वसिष्ठ मुनीची कामधेनू पडली असतां ती मोठ्या चमत्कारानें पाण्याच्या उद्गमाबरोबर एकदम वर आली. असे अपघात नेहमीं घडूं नयेत म्हणून ऋषीनें कैलासनाथाची प्रार्थना केली. शंकरानें हिमाचलपुत्रांनां या कामावर नेमिलें. हिमाचलाच्या एका पुत्रानें तें विवर बुजवून टाकण्यासाठीं अर्बुदसर्पावर बसून त्या जागीं उडी घेतली. पण आंत तक्षक चळवळ करूं लागल्यामुळें वसिष्ठानें शंकराला सतविलें. तेव्हां शंकरानें पाताळांतून आपला पायाचा आंगठा वर काढून तें स्थान स्थिर केलें. तेव्हांपासून ''अचलेश्वर'' ही तेथील देवता झाली अशी एक कथा आहे. या पर्वतासंबंधीं निरनिराळ्या पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत. कोणी अर्बुद हा हिमालयपुत्र होता तर कोणी तो नाग होता असें म्हणतात (स्कंद पुराण-अर्बुदाचल महात्म्य; महाभारत, वनपर्व अध्याय ८२; विष्णुपुराण इ.). यासंबंधीं दुसरी एक कथा अग्निकुलोत्पत्तींची आहे. जेव्हां दैत्य विश्वामित्राच्या धर्मकृत्यांत व्यत्यय आणूं लागले तेव्हां त्या ऋषीनें देवांच्या मदतीची याचना केली. तेव्हां त्यांनीं अग्निकुंडांतून चव्हाण, परिहार, सोळंकी आणि परमारं अशी चार ''अग्निकुलें'' निर्माण केली. या रजपूत कुलांनी दैत्यांचा विध्वंस केला. या दोनहि कथांवरून प्राचीन कालीं जातीजातींत कांही शत्रुत्व असावें असें दिसतें.

ऐ ति हा सि क.- वेन राजाच्या वंशांतील केयो नांवाचा भिल्ल अर्बुदावर प्रथम राज्य करीत होता; त्याच्याच वंशांत गूह होऊन गेला. हा गूह शेवटचा भिल्ल राजा असून त्याचा संबंध रामायणांतील रामाला गंगापार करणार्‍या गूहाशीं जोडतात. अर्वाचील इतिहासावरून परमार राजे अर्बुदावर राज्य करीत अशी माहिती मिळते. यांच्या कारकीर्दीतच (१०३२ त) अबूवर आदिनाथाचें देवालय बांधलें गेलें. इ. स. १२१२ त चव्हाण घराणें अर्बुदावर आलें. पुढें हल्लींच्या शिरोहीच्या रजपूत घराण्यांतील रावरंभानें १२९६ मध्यें अर्बुद जिंकून घेतलें तें अद्याप या घराण्याकडे आहे.

अर्बुदावर निरनिराळ्या संप्रदायांचें प्राबल्य निरनिराळया काळीं होतें असें तेथील अवशेषांवरून दिसतें. अगदीं जुना शिलालेख संवत ७२७ (इ. स. ६७१) चा आहे. त्यांत शैव मताचें वर्चस्व नजरेस येतें. येथें १०३२-१३२० पर्यंत जैनांचें प्राबल्य होतें, त्या अवधींत जैन देवालयें बांधिलीं गेलीं. यानंतर पुन्हां शैवांचा अधिकार चालू झालासें दिसतें. पुढें १५ व्या शतकापासून १७५२ पर्यंत जैन धर्म बळावला पण त्यानंतर शैवधर्म जो येथें स्थिर झाला तो कायमचा इ. स. १८२१ त शिरोहीचे राजे माधवसिंग यांनीं बर्‍याच हिंदु देवालयांचा जीर्णोद्धार केला हे तेथील शिलालेखांवरून उघड होतें. इ. स. १८२२ त राजस्थानचे विख्यात् इतिहासकार कर्नल टॉड यांनीं अबूला भेट दिली (वि. विस्तार पु. ३८. १).

येथील प्रेक्षणीय स्थळें म्हटलीं म्हणजे मुख्यत्वेंकरून दिलवारा येथील नामांकिम जैनमंदिरें, अर्बुददेवी, अचलगड, अचलेश्वर, महादेव, वसिष्ठाश्रम, गौतमाश्रम, गुरु शिखर, सनसेट पॉइन्ट, गोपीचंदाचीगुंफा, भर्तुहरीचीगुंफा, रामगुंफा, परशुरामकुंड, कनकतीर्थ, भृगूचा आश्रम अग्निकुंड, सूर्यकुंड, कपिलातीर्थ, 'नागतीर्थ, इत्यादि आहेत.

या पर्वताचे कडे ठिकठिकाणीं तुटून भयंकर दर्‍या झालेल्यां आहेत. तेथें श्वापदांच्या गुहा असून आसपास योगसाधनांत गुंतलेले तपस्वी, महंत, ऋषी यांच्या गुंफा आहेत. या गुंफा इतक्या बिकट जागीं आहेत कीं, येथें जाणें तर जीवाची आशा सोडूनच निघालें पाहिजे. परमार्थ आणि मोक्षसाधन करण्यासाठीं सर्वसंगपरित्याग करून तपश्चर्या करणार्‍या लोकांसाठीं अगदी एकांताचें नैसर्गिक व मोहकस्थान यादृष्टीनें हा पर्वत सर्वथैव योग्य असल्याकारणानें हें प्राचीन काळापासून अशा लोकांचें वसति-स्थान झालें असावें.

अ बू व री ल प्रे क्ष णी य स्थ ळें - दिलवाडा किंवा देऊळ वाडा - हें स्थान कँपाच्या उत्तरेस दीड मैलावर आहे. जैनधर्मीय लोकांचीं सुप्रसिद्ध मंदिरें येथें आहेत. ह्या मंदिरांत प्रवेश करण्याकरितां सव्वा रुपया देऊन पास काढावा लागतो. हा पास दिलवाडा, अर्बुददेवी व अचलगड येथें दाखवावा लागतो. हीं मंदिरें स्फटिकाच्या सुबक कोरींव कामामुळें अत्यंत प्रेक्षणीय झालीं आहेत. श्वेतांबरी पंथाचे आदिनाथ व नेमिनाथ यांच्या मंदिरांच्या भिंती, खांब, गाभारे, घुमट वगैरेंवर इतकें सुबक कलाकौशल्याचें कोरीव काम केलें आहे कीं, तसे चित्तवृत्ति तल्लीन करून सोडणारें काम नांवाजलेल्या ताजमहालसारख्या स्थलींहि दिसून येत नाहीं. एक मंदिर विमलशानें इ. स. १०३२ मध्यें अठरा कोट रुपये खर्च करून बांधलें व दुसरें तेजपाल व वस्तुपाल या बंधुद्वयानें इ. स. ११९७ -१२४७ या अवधींत बांधलें. दोन्ही मंदिरांत आदिनाथ-नेमिनाथांच्या पंचधातूंच्या प्रचंड मूर्ती आहेत. त्या हिरे, माणिक, पाच, मोतीं इत्यादि रत्‍नांनीं सजविलेल्या आहेत. देवळाच्या भिंतींवर, खांबांवर व सभोंवताली हिंदूंच्या नाना देवतांच्या कथानकांतील कृष्णलीला, रासक्रीडा, लग्नसोहळा, दशावतार, युध्दांचे देखावे, गंधर्वगायन वगैरे कोरीव कामें फारच चतुराईनें केलेलीं दृष्टीस पडतात. दोन्ही देवालयांत संगमरवरी हत्तींचे हत्तीखाने आहेत. आदिनाथाच्या देवळांत समोरच घोडयावर विमलशाची मूर्ति बसविलेली आहे. देवालयाच्या घुमटाखालील भागांत छतावर कमलाच्या उमललेल्या फुलाप्रमाणें स्फटिकाच्या पाकळया अशा कांही मनोहर रीतीनें कोरल्या आहेत कीं, जणूं काय एखादा झुंबरच टांगला असावा असें वाटतें. जवळच अंबिकामातेची एक मूर्ति आहे. या देवीने विमलशास येथें देवालयें बांधण्यास प्रोत्साहन दिल्यामुळें तिच्या कृपेनें हीं मंदिरें बांधण्यांत आलीं, म्हणून जैन लोक ह्या देवीचें पूजन श्रद्धापूर्वक करतात. देऊळवाडयाबाहेर जैनयात्रेकरूंनां राहण्यासाठी धर्मशाळा आहेत. त्याशिवाय दुसरींहि दिगंबरी पंथाचीं दोनचार देवळें आहेत.

दिलवार्डा जैनमंदिर

 

अबूच्या पहाडावरील मार्केट

दिलवाडा मंदिराचा मुख्य दरवाजा, अबू

नखी सरोवर, अबू.

 

अर्बुददेवी :- ह्या देवीचें स्थान कॅंपाच्या रस्त्यापासून दीड मैलावर डोंगरावर आहे. ह्या देवीस अधरदेवी असेंहि म्हणतात. डोंगरावर अर्ध्या रस्त्यांत एक दरी लागते तेथें दूधबावडी नांवाचें कुंड आहे. तेथें प्राचीनकाळीं दूध असे, व तें पिऊन ऋषी रहात असत, असें म्हणतात. सध्यां येथील पाणी पांढर्‍या रंगाचें परंतु पाचक असें आहे. येथें एक महंताचा आश्रम आहे. त्यांत अलखबुवा राहतो. जागा एकांताची असल्यानें हिंस्त्र पशूंचें भय वाटतें. यापुढें सुमारें ओबडधोबड तीनशें पायर्‍या चढून गेल्यावर शिखरावर एक प्रचंड गुहा लागते. ह्या गुहेंत दुर्गादेवी व चौसष्ट योगिनींच्या कोरींव मूर्ती आहेत. या गुहेंतच दुसरी एक अरुंद तोंडाची पण आंत मोठी अशी गुंफा आहे. तींत अर्बुददेवीची भव्य मूर्ति उभी आहे. या गुहेंत सतत तुपाचे दिवे जळत असतात. देवीच्या उजव्या बाजूला एक लहान बोगदा आहे. त्यांतून देवी नखी-सरोवरावर रोज स्नानास जाते, अशी भाविकांची समजूत आहे. ह्या गुंफेवर एक घुमट बांधलेला आहे. तो सपाटीवरून शोभायमान दिसतो. चैत्री पौर्णिमेस व आ9विन शुद्ध दशमीस येथें मोठी यात्रा भरते. येथून दिलवाडा येथें जातांनां एक मैलावर कोटेश्वर महादेवाचें देवालय व कुंड आहे, व खालच्या बाजूला शुक्लतीर्थ म्हणून एक कुंड आहे.

अचलगड :- दिलवाडयाहून सुमारें तीन चार मैलांवर डोंगराळ वाटेनें अचलगडाला जातां येतें. अचलगड हा एक परमारकुलाच्या राज्यांतील डोंगराळ किल्ला होता. आतां हा किल्ला जीर्ण स्थितींत आहे. ह्याच्या पायथ्याशीं मंदाकिनी नामक एक सुंदर सरोवर आहे, आणि त्याच्या घाटावर तीन संगमरवरी दगडाचे टोणगे उभे केले असून एक आदिपाल रजपूत राजाची मूर्तीहि हातांत धनुष्यबाण घेऊन उभी आहे. ह्या कुंडाची आख्यायिका अशी आहे, कीं, पूर्वी ऋषी येथें तपश्चर्या करीत असत, आणि ह्या कुंडांत घृत भरून त्याच्या आहुती देत. तें घृत तीन महिषासुर दैत्य नित्य पिऊन त्यांत घाण करून तपश्चर्येमध्यें विघ्न करीत. तेव्हां सर्व ऋषींनीं तपश्चर्येच्या सामर्थ्यामुळें एक रजपूत राजा उत्पन्न करून त्याच्या हस्तें ह्या दैत्यांनां मोक्ष दिला. त्याचें स्मारक म्हणून त्या महिषासुरांच्या आणि आदिपालाची अशा मूर्ति येथें उभ्या केल्या आहेत. ह्या कुंडाला अग्निकुंड हें नांव मागाहून पडलें. येथें जवळच रेवतीकुंड आहे. येथून पूर्वेकडे एक मैलावर भृगुऋषीचा आश्रम आहे. दुसर्‍या एका कुंडांत गोमुखांतून निर्मळ पाणी सोडलें आहे. मंदाकिनी सरोवरापासून शंभर पावलांवर एका टेकडीवर भर्तृहरीची गुंफा आहे. गुंफेचें तोंड फारच लहान आहे. परंतु निजून आंत गेलें असतां मध्यें मोठे आवार असून एक धुनीची जागा व एक आसनाप्रमाणें उंचवटा केलेला दिसतो. ह्या गुंफेंत उजेड येण्याला वर भोंके पाडलीं आहेत. मंदाकिनी सरोवराजवळ वाडयाप्रमाणें आवारांत श्रीअचलेश्वर महादेवाचें मुख्य स्वयंभू देवालय आहे. हें देवालय फारच जुनें म्हणजे इ. स. ८१० मध्यें बांधलेलें असून आंत नाना प्रकारच्या देवता कोरलेल्या दिसतात. देवालयांत एक मोठी पिंडी असून लिंगाच्या ठिकाणीं खाडा आहे. खाडयांत हात घालून पाहिलें असतां डाव्या बाजूला हुबेहुब पायाच्या आंगठयाप्रमाणें लहान लिंग आहे. मंदिरासमोर एक मोठा पितळेचा नंदी आहे. या अचलेश्वर महादेवासंबंधानें अशी कथा आहे कीं, वसिष्ठमुनीनें शंकराची आराधना केल्यावर श्रीमहादेवानें आंगठा जमीनींत रोवतांच अबू निर्माण केला तोच हा आंगठा होय. तेव्हां अर्बुद पर्वत ज्यानें उत्पन्न झाला त्याचें आदिस्थान अचलेश्वर आहे. येथें देवळासभोंवतीं उंचउंच प्रचंड पिंपळ व चाफ्यांची झाडें असून त्यांच्या फुलांच्या परिमळामुळें दाहीदिशा दरवळून गेलेल्या असतात. या देवळाच्या आजूबाजूस फार जुनीं व मोडकळीस आलेलीं गणपति, देवी, लक्ष्मीनारायण, राम वगैरे देवांचीं उपमंदिरें आहेत. लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या आंतील गाभार्‍यांतील देवतांच्या मूर्ती फार कुशलतेनें कोरलेल्या दिसतात. त्यात शेषशायी नारायण पहुडलेले असून लक्ष्मी पादसेवन करीत आहे, नाभिकमलांतून ब्रह्मा वर आला आहे, गंधर्व गायन करीत आहेत हें दृश्य आहे. मंदिरासमोर एक प्रचंड लोहत्रिशूल उभारलेला आहे. तेथें एक महंत रहात असून शिरोही संस्थानानें दिलेल्या गांवावर त्याचा चरितार्थ चालतो. अचलेश्वराच्या उजवीकडे डोंगरावर जैन मंदिरें आहेत. येथेंहि तीर्थंकरांच्या शेंकडो लहानमोठया मूर्ती देवालयांत बसविलेल्या दिसतात. मुख्य आदिनाथाच्या देवालयांत चारी बाजूंनीं दर्शन होण्याकरितां मूर्ती बसविलेल्या असून वर एक मजलाहि आहे, व तेथेंहि मूर्ति आहे. वरील गच्चीवरून सभोंवतालचा फार लांबचा प्रदेश दृग्गोचर होतो. समोरच गुरुशिखर स्पष्ट दिसतें. हीं देवालयें मागें टाकून पुढें डोंगर चढून गेलें कीं, श्रावण व भाद्रपद या नांवांची दोन सरोवरें लागतात. त्यांच्या घांटावर एक चामुंडा देवीचें देवालय आहे. या शिखरावर चांगली सपाटी आहे. येथें उभें राहून राणा अजितसिंहाचा अगदीं जीर्ण महाल दिसतो. या शिखराच्या उत्तरेस अगदीं कडयावरून फक्त एकाच माणसास जातां येण्यासारख्या बिकट पायवाटेनें गोपीचंदाच्या गुंफेकडे ज़ातां येते. ही वाट अशी काही भयंकर आहे कीं‚खालीं नजर टाक   घेरी येते‚ व कि  सभोवार     तटा माणे अति खोल वाटतें. गोपीचंदाची गुंफा दुमजली असून अबूच्या पहाडावरील सर्व गुंफांपेक्षां उत्तम व सोयीस्कर आहे. या गुंफेंत दोन खोल्यांसारख्या दोन लहान गुंफा आहेत. मधोमध एक धुनीची जागा आणि बसण्याकरितां चौथरे केलेले आहेत. वरच्या मजल्यास दोन खिडक्या आहेत. तेथूनहि दूरवरचा डोंगराळ प्रदेश दिसतो. दिलवाडयाहून अचलगडाला जातांना मार्गांत 'ओरीआ' नामक गांव लागतो. तेथें रात्रीं मुक्काम करून प्रात:काळीं तीन चार मैल उंच डोंगर चढून 'गुरु-शिखर' ची भेट घेतां येते. हा रस्ता सबंध जंगलांतून डोंगराच्या कडयावरून असून हिंस्त्र पशूंच्या वसतीमुळें फारच भयंकर झाला आहे. येथें वाटाडया अवश्य लागतो. गुरु-शिखर हें फारच उंच असून सृष्टि सौंदर्याचें प्रदर्शन पाहण्यास योग्य स्थल आहे. येथें महंत राहतात. या रमणीय स्थानाजवळच श्रीदत्ताच्या पादुका, गणपति वगैरेचीं जीर्ण मंदिरें आहेत. बद्रिनाथ, केदारनाथ, वगैरे देवांची देवालये आणि कुंडें, गुंफा वगैरे थोडथोडया अंतरावर आहेत. या शिखरावरून सपाटीवरील शेतें, अबू कॅंप, नदी वगैरे रांगोळीनें रंगवल्ली काढल्याप्रमाणें मनोरम दिसतात.

वसिष्ठाश्रमाचामार्ग:- अबू कॅंपपासून सुमारें पांच मैलाच्या अंतरावर अति डोंगराळ पायवाटेनें सुमारें दोनतीन डोंगर चढउतर करून व नंतर हजारांपेक्षा अधिक नैसर्गिक ओबडधोबड पायर्‍या उतरून चांफा, आम्रवृक्ष यांच्या अतिरम्य गर्द छायेंतून वसिष्ठाश्रमाला जातां येतें. हा रस्ता फार एकांताचा असून त्यांत हिंस्त्र पशूंचे भय असल्यानें एकटयानें जाणें जोखमीचें आहे. डोंगर उतरतांच खालीं स्फटिकाच्या गोमुखांतून स्वच्छ निर्झराचें पाणी सोडून केलेलें एक कुंड आढळतें. हे कुंड आम्र व चांफा वगैरे झाडांच्या गर्द छायेनें आच्छादित असल्यानें फार मनोरम व गार वाटतें.

वसिष्ठाश्रम.- येथून सुमारें पंचवीस तीस पावलांवर वसिष्ठाश्रम आहे. या आश्रमाभोंवतीं एक किल्ल्याच्या तटाप्रमाणें बांधलेली भिंत असून सभोवतालीं शेट नागरदास यांनीं धर्मशाळा बांधली आहे. तींत महंत राहतात. येथें येणार्‍या मंडळींचा ते योग्य परामर्ष घेतात. पुढें श्री वसिष्ठजींचें मंदिर लागतें. येथें पूर्वीच्या आश्रमाच्या जागीं एक मोठें देवालय बांधलेलें आहे, आणि आंत वसिष्ठ ऋषींची मोठी मूर्ति दोन्ही हातांनी रामलक्ष्मणांनां धरलेली अशी उभी आहे. जवळच वसिष्ठपत्‍नी अरुंधती हिची मूर्ति व दुसर्‍याहि बर्‍याच मूर्ती आहेत. देवालयाच्या बाहेर एक कामधेनूची मोठी मूर्ति व इंद्राची पितळेची मोठी मूर्ती आहे. दुसरी चारपांच देवळें आजूबाजूस आहेत व पाठीमागें एक अग्निकुंड आहे. तेथें पूर्वी ऋषी हवन वगैरे करीत असत, असें म्हणतात. देवळांत हिंदूंच्या नाना देवता, वराह-अवतार, अर्बुदसर्पावर नंदिवर्धन बसलेला वगैरे कोरींव मूर्ती आहेत. या आवारांत व बाहेर द्राक्षांच्या वेलांचे मंडप, व पिच फळांची झाडें, जंगलीं केळीं, साखरलिंबू, डाळिंबें वगैरे फळझाडें, व केतकी, चांफा, कण्हेर वगैरे फुलझाडांचे गर्द रानाप्रमाणें बनलेले कुंज आहेत. येथून सुमारें दोनतीन मैलांवर गौतमाश्रम आहे. तेथें फार बिकट डोंगराळ मार्गानें जावें लागतें. गौतमाश्रम हें मनास, शांति व आल्हाद देणारें स्थळ आहे. तेथें शंकराचीं जीर्ण देवालयें, कुंडें, गुंफा वगैरे बर्‍याच आहेत. एकंदरींत येथील डोंगराळ रस्त्यानें जातांनां थोडासा त्रास व श्रम सोसावे लागतात, परंतु त्या मानानें हीं स्थानें पाहून फारच आनंद व शांति वाटतें.

सनसेट पॉइंट.- कॅंपपासून सुमारें दीड मैल चांगल्या सडकेनें सनसेट पॉइंटवर जातां येतें; किंवा रामकुंडाच्या बाजूनें 'वेलीस वॉक' म्हणून एकांताचा व डोंगराच्या कडयावरून रस्ता आहे, त्यानें गेलें असतां वनश्री पाहून आनंद वाटतो. या कडयावर मंडळींनां बसण्याकरितां चुन्याचे चौथरे व दगडी बांक बांधलेले आहेत. तेथें स्वस्थपणें बसून फार लांबचा प्रदेश पाहाण्यास मिळतो. येथें पश्चिम क्षितिजाकडे भगवान् सहस्त्ररश्मि अस्ताला जातांना फारच हृदयंगम देखावा दिसतो. खालील विस्तीर्ण सपाटीमध्यें बनास नदीचे निर्मळ पाट सर्पाकृति वाहतात. येथें उत्तम सुवासिक जंगली फुलझाडें आहेत. त्याचप्रमाणें बुलबुल, चंडोलादि पक्षी शीळ घालून पाहुण्यांचें मन रंजवितात.

नखी सरोवर.- हें सुंदर व शीतलोदकानें परिपूर्ण असें सरोवर कॅंपला लागूनच आहे. चारी बाजूंनीं उंच डोंगर असल्यामुळें हें मोठें रमणीय दिसतें. सरोवरासभोंवतालीं पक्की सडक बांधलेली असल्यानें फिरण्यास निघालेल्या मंडळीस सरोवराला प्रदक्षिणा घातली म्हणजे चांगला व्यायाम घडतो. सरोवरामध्यें लहान लहान खडक आहेत. येथें शिकार करण्यास बंदी असल्यानें ह्या प्राण्यांनां मनुष्यापासून मुळींच भीति वाटत नाहीं. ह्या सरोवराचें नांव नखी पडण्याचें कारण, पूर्वी ऋषींनीं हें नखांनीं कोरून काढलें होतें, असें म्हणतात. सरोवरावर श्रीरघुनाथजींचें एक मंदिर आहे. त्यांत महंत मध्यम वर्गाच्या हिंदुधर्मीय मुशाफरांनां तात्पुरतें रहाण्यास जागा देतात. येथेंहि द्राक्षांचे मंडप व लहानशीं फुलझाडांची बाग आहे. सरोवराच्या उत्तरेस डोंगरावर परशुरामकुंड, रामगुंफा, हाथीगुंफा व हनुमानगुंफा या पाहण्यासारख्या आहेत. कॅंपातील विहिरी फार खोल असल्यामुळें बागबगीच्यासाठीं बैलावर पखालींत पाणी भरणारांची सांजसकाळी सरोवरावर बरीच गर्दी दिसते.

कॅं प चा बा जा र.- हा बाजार लहानसा आहे. येथें सर्व कांही मिळतें. दूध, दहीं मुबलक मिळतें. प्रवाशानें रहाण्यास जागेची सोय केली असतां कांहीं अडचण पडत नाहीं.

[संदर्भग्रंथ इं. गॅ. ५-१९०८; ए. वि. ए; मा. मनोरंजन वर्ष २६; वि. विस्तार पु. ३८; इं. अँ. १८७५. टॉ:- राजस्थान; फर्ग्यूसन—हिस्टरी ऑफ इंडियन अँड ईस्टर्न आर्किटेक्चर. राजपुताना गॅ. पु. ३. १८८० ].

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .