विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबूकीर.- हें भूमध्यसमुद्राच्या इजिप्तच्या किनार्यावरील एक खंड, अलेक्झँड्रिआपासून रेल्वेनें १४ १/२ मैल ईशान्येस आहे. येथील दुर्गाचा मेहमत अलीनें राजकीय बंदिगृहाप्रमाणें उपयोग केला होता. येथून जवळच रोमन, ग्रीक व इजिप्तमधील लोकांच्या इमारतीचा पडित भाग आहे व या खेडयाच्या आग्नेय दिशेस सुमारें २ मैलांवर कॅनोपसच्या आसपासच्या भागाचे काहीं अवशेष सांपडतात व पुढें कांहीं अंतरावर पूर्वेस नाइलच्या कॅनोपस शाखेचें भूमध्यसमुद्रास मिळण्याचें स्थान आहे. पूर्वेकडे नाइलच्या रोसेटा मुखापर्यंत पसरत गेलेला अबूकीरचा अफाट उपसागर आहे. यांत १७९८ च्या आगस्टच्या १ ल्या तारखेस नेलसन नेपोलियिनच्या नाविक दळाशीं नाईल (अबूकीर) ची लढाई खेळला पुढें १७९९ च्या जुलै महिन्याच्या २५ व्या तारखेस तुर्क व फ्रेंच मध्यें झटापट झाली. १८०१ च्या मार्च महिन्याच्या ८ व्या तारखेस सर ऑर. अॅबरक्राँबीच्या नेतृत्वाखालील इंग्रजी फौज अबूकीरजवळ फ्रेंचाच्या जबरदस्त अडथळयास तोंड देऊन उतरली.