विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबू-तालिब खान (मिर्झा).- हा हाजी महंमद बेगखानचा मुलगा लखनौ येथें १७५२ त जन्मला. नबाब असफउद्दौल्याच्या दिवाणानें १७७५ त त्यांला इटवा व गंगायमुना नद्यांमधील दुसरे अनेक जिल्हे यांवरचा अंमलदार नेमिलें. या हुद्दयावर त्यानें दोन वर्षे काम केले. पण पुढें दिवाणाच्या मृत्यूमुळें त्याची बढती थांबली व तो लखनौला परत आला. नबाबानें त्याला खर्चासाठीं साठ हजाराचें वर्षासन करून दिलें. पुढें एक वर्ष गेल्यानंतर, कर्नल अलेक्झांडर हॅने हा गोरखपूरचा कलेक्टर असतां त्यानें याला आपला दुय्यम म्हणून नबाबापासून मागून घेतलें. कर्नलच्या हाताखाली तालीबखानानें तीन वर्षें काम केलें. नंतर लखनौच्या रेसिडेंटनें राजा बलभद्रसिंगाचा पाडाव करण्याच्या कामावर त्याला नेमिलें. राजा बलभद्रसिंगाच्या वधानंतर कांहीं वर्षे अबू-तालिब संकटांत सापडला होता. त्यावेळीं तो एका ब्रिटिश अधिकार्याबरोबर यूरोपला गेला (१७९९). इराणी राजपुत्र म्हणून तिकडे तो ओळखिला जाई. प्रवासात असतां त्यानें रोजच्या हकीकतीची नोंद करून, ही रोजनिशी कलकत्यास परत आल्यावर प्रसिद्ध केली (१८०३). तिचें नांव ''मआसिर-उत्-तालिबी फी बिलादि-इफ्रंजी.'' चार्लस स्टुअर्टनें याचें इंग्रजी भाषांतर करून लंडन येथें प्रसिद्ध केलें (१८१४). अबूतालिब १८०६ च्या सुमारास वारला. ''खुलासत-उल-अफकार'' हा याचाच ग्रंथ आहे.