विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबूबकर सिद्दिक.- आयेषेचा बाप व महंमद पैगंबराचा सासरा. याचा जन्म इ. स. ५७३ मध्यें कुरेश जातींत मक्का येथें झाला. हा फार श्रीमंत असून याचें लोकांत दांडगें वजन होतें. यानें मुसुलमानी धर्माची दीक्षा घेतल्यावर आपलें नांव बदललें. याची महंमद पैगंबरावर अचल श्रद्धा होती. महंमदाच्या हिजर्यापासून मृत्यूपर्यंत तो त्याच्या अगदीं संन्निध होता. महंमदहि याला फार मान देत असे. यानें याला 'सिद्दिक' म्ह. 'खरें बोलणारा' ही पदवी दिली होती. जून ६३२ मध्यें पैगंबराच्या मृत्यूनंतर याला खलीफा निवडलें. ह्यानें महंमदाच्या नवीन धर्मास चांगलीच चालना दिली; त्यानें प्रथम जे अरब लोक हा नवीन धर्म सोडून पुन्हा पूर्वीच्या धर्मांत शिरूं पहात होते त्यांना वठणीस आणलें. नंतर त्यानें आपली दृष्टि इतर राष्ट्राकडे वळविली; व आपल्या शूर सेनापतीच्या साहाय्यानें ग्रीक सम्राट हरक्युलिस यानें सिरिया उध्वस्त करण्याकरिता पाठविलेल्या सैन्याचा पराजय केला. याच्या सेनापतींनी इराण व सिरिया हे देश काबीज केले. परंतु याला आपण मिळवलेल्या यशाचा फार दिवस उपभोग घेता आला नाहीं. तापानें त्याची शरीरप्रकृति क्षीण होत जाऊन ज्या दिवशीं दमास्कस शहर त्याच्या हातीं आलें त्याच दिवशीं म्हणजे २३ ऑगस्ट इ. स. ६३४ मध्यें तो मृत्यु पावला. याची कबर मदिना येथें महंमदाच्या कबरीशेजारीं आहे. यानें महंमदाची वचने लिहून काढली होती. [बीलचा कोश]-