विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबू रोड.- याचें दुसरे नांव खरारि. हें राजपुतान्यांत सिरोहि संस्थानात उत्तर अक्षांश २४° २९' व पूर्व रेखांश ७२° २७' ह्यावर बनास नदीच्या पश्चिम तीरावर वसलेलें आहे. राजपुताना माळवा रेल्वेचें हें एक स्टेशन असून मुंबईपासून ४२५ मैल व दिल्लीपासून ४६५ मैल दूर आहे. अबूला जातांनां हें शेवटचें स्टेशन लागतें. येथील लोकसंख्या सुमारें सात हजार आहे. व्यापाराची पेठ म्हणून हें फार महत्वाचें आहे. कारण, दांता, इंदूर व मेवाड या संस्थानांत लागणारा माल येथून पुरवला जातो. येथें टपाल व तार ऑफिस असून एक दवाखानाहि आहे. यूरोपियन व यूरेशियन मुलांच्याकरिता रेल्वेची एक शाळा आहे. तसेंच सरकारच्या मदतीनें चाललेली एक इंग्रजी शाळा आहे. रेल्वेनें आपल्या नोकराकरितां एक दवाखाना ठेवला आहे. अबूरोडपासून अबूला जाण्यास महाबळेश्वरासारखी नागमोडी पक्की सडक डोंगराच्या कडयावर बांधलेली आहे. तेथें जाण्याला सध्यां मोटार सर्व्हिस सुरू आहे.