विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबू हसन कुतुबशहा (इ. स. १६५८-१६८७) - गोवळकोंडयाच्या कुतुबशाही घराण्यांतील शेवटचा सुलतान. हा मागील सुलतान अबदुल्ला कुतुबशहा याचा जांवई असून त्याच्या पश्चात तो गोवळकोंडयाच्या तख्तावर बसला. हा आळशी व विलासी होता. तरी राज्य चांगले चालवून रयतेस सुख देण्याच्या कमीं तो नेहमीं तत्पर असे, त्यामुळें त्याजवर लोकांची प्रीति होती. त्यानें मदनपंत नामक एका ब्राह्मणास आपली वजिरी दिली. मदनपंतानें महसुलाचा व इतर बाबतींचा बंदोबस्त फार चांगला ठेविला. शहाचा त्याजवर पूर्ण विश्वास असे. त्याच्या विरुद्ध मुसुलमानांनीं केलेल्या कागाळया शहा ऐकत नसे, या मत्सरी मंडळींत शहाचा सेनापतीहि सामील होता. त्यास मदनपंताचें दरबारांतलें वजन सहन होईना. इकडे स. १६८३ त अवरंगजेबानें दक्षिणेवर स्वारी केली.त्यावेळीं संभाजी भोंसल्याबरोबर कुतुबशहानें परस्परांच्या संरक्षणाकरितां एक तह केला. त्याजवरून अवरंगजेबास राग येऊन, त्यानें आपला मुलगा मुअज्जम व खानजहान यांच्या आधिपत्याखालीं गोवळकोंडयावर फौज पाठविली. ही फौज आली, तेव्हां सेनापति इब्राहिमखान विश्वासघात करून मोंगलाला जाऊन मिळाला. त्यावेळीं शहरांत जी गडबड झाली तींत मदनपंत मारला गेला. अबू हसननें दोन कोट रुपये खंडणी व पुष्कळ द्रव्य देऊन मोंगलांशी तह केला (स. १६८६) पण हा तह फार दिवस टिकला नाहीं. विजापूरचें राज्य रसातळास गेल्यावर अवरंगजेब हा जिसुदुराज साधूच्या कबरेचें दर्शन घेण्यासाठीं म्हणून गुलबर्ग्यास जाण्यास निघाला. बिचारा अबू हसन अवरंगजेबाची मर्जी प्रसन्न करण्यासाठीं नाना तर्हा करीत होता. नजीक आल्यावर अवरंगजेबानें कुतुबशहास कळविलें कीं, ' तुम्हीं ब्राम्हण दिवाण नेमिला, परधर्मी संभाजी राजाशीं दोस्ती केली, आणि स्वत: बदफैली वर्तन सुरू ठेविलें, म्हणून आम्ही तुम्हांशीं लढाई करणार.'
कुतुबशहाचे कामदार अवरंगजेबानें फितूर केले आणि गोवळकोंडयास वेढा घातला. सात महिने कुतुबशहानें टिकाव धरला. पुढें सन १६८७ त अवरंगजेबानें अबू हसनास पदच्युत करून दौलताबादच्या किल्ल्यावर ठेविलें; आणि त्याचें सर्व राज्य खालसा करून आपल्या राज्यास जोडिलें. अबू हसनासाठीं त्याची प्रजा हळहळली. त्याच्या सैन्याच्या व शौर्याच्या शेकडो गोष्टी लोकांच्या तोंडीं अद्यापि त्या प्रांतीं ऐकूं येतात. त्यास कवितेचा मोठा नाद होता.
[संदर्भ ग्रंथ.- सरकार-हिस्टरी ऑफ अवरंगजेब; मुसुलमानी रियासत; टेलर-हिस्टरी ऑफ इंडिया.]