विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबेस - युरोपांत मठाच्या अध्यक्षिणीस अबेस असें म्हणतात. ही जागा निवडणूक करून भरतात. मठवासिनींचीं गुप्तपणें मतें घेऊन त्यांच्यापैकींच एकीला निवडतात. त्यावेळीं मोठा धार्मिक समारंभ होऊन तिला एक दंड व क्रूस अर्पण करितात. ही जागा गैरवर्तनामुळें काढून टाकण्यांत आली नाहीं तर तहाहयात असते. चाळीस वय व आठ वर्षांचा अनुभव अबेसला पाहिजे. मठनिवासीनींनां तसेच हुकूम पाळावे लागतात. तिला त्यांनां शिस्त लावण्याचा पूर्ण अधिकार असतो. तथापि स्त्री असल्यामुळें अॅबटचे धार्मिक अधिकार तिला नसतात. जर्मनींत ही जागा मोठया मानाची आहे. केव्हां केव्हां राजकन्यादेखील मठाच्या अध्यक्षिणी होत असत.