विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अब्-इ-इरताद — गझनीच्या दक्षिणेस ६५ मैलांवर उत्तार अक्षांश ३२°३०' व पूर्व रेखांश ६७°५०' यामध्यें अफगाणिस्तानमधील तरकि गिलझइ प्रदेशांतील हें एक सरोवर आहे. हें १७ मैल लांब व १५ मैल रुंद असून अतिशय उथळ आहे. तें इतकें कीं याची अगदीं मध्यावर खोली फक्त बारा फूट आहे. याच्या काठांवर झाड किंवा एखादी गवताची काडी देखील उगवत नाहीं. याचें पाणी खारट व कडू आहे व कांठावर मिठाचें थर सांचून राहतात. हें सरोवर इतकें खारट आहे कीं, येथें गझनी नदींतून आलेले मासे जिवंत राहूं शकत नाहींत. भोंवतालचा प्रदेश रुक्ष व ओसाड असल्यामुळें येथें स्थानिक वस्ती मुळींच नाहीं. भोंवतालचा प्रदेश रुक्ष व ओसाड असल्यामुळे येथें स्थानिक वस्ती मुळींच नाहीं. फक्त उन्हाळ्यामध्यें गिलझइ लोक येथे गुरे चारण्यास आणतात. या सरोवरांतून पाणी वहात जात नाही. फक्त जें पाणी झिरपून जातें त्यापासून अर्धस्तान लोरा ही नदी निघते. [इं.गॅ.५].