विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अब्राहाम - हा इस्त्रायल लोकांचा पूर्वज व बायबल मध्यें उल्लेख केंलेल्या मूळपुरुषांपैकीं पहिला होय. याच्या संबंधानें निरनिराळया काळच्या परस्परविरोधी अशा पुष्कळ दंतकथा व आख्यायिका सांगितल्या आहेत.
एकाच्या मतें हा टेरेहाच्या तीन मुलांपैकीं एक होता. टेरेहा हा खाल्डी लोकांच्या '' उर '' शहराहून मेसापोटेमियांत आला असें म्हणतात. तेथून अब्राहाम, त्याची बायको सारा व पुतण्या लाट हीं सगळीं कॅनान देशांत गेलीं. तेथून ईश्वराच्या आज्ञेवरून व ईश्वरानें त्यास ''तूं राष्ट्रनिर्माण करशील'' असें सांगितल्यावरून अब्राहामनें आपल्या मंडळीसह पुढे प्रवास केला. बेथेल येथें त्याच्या व लाटच्या गुराख्यांमध्यें भांडण झालें, म्हणून तो त्यापासून वेगळा झाला व पुढें इजिप्त देशांत गेला. अब्राहामला त्याच्या बायकोच्या दासीपासून आयझाक नांवाचा मुलगा झाला.
पुढें ईश्वराचा त्यास असा साक्षात्कार झाला कीं, तुझी संतति ईजिप्त देशांत वसाहत करील.
या प्रसंगाची आठवण राहण्याकरितां त्यानें आपलें व आपल्या बायकोचें नांव बदललें व आपल्या मुलाची सुंता केली. ईश्वरानें त्यास आपला मुलगा बळी देण्यास आज्ञा केली. ती तो अक्षरश: पाळणार होता इतक्यांत एका देवदूतानें त्यास तसें करण्याची मनाई केली. या आज्ञा पाळण्याच्या तयारीबद्दल ईश्वर त्यास प्रसन्न झाला व त्यानें 'तुला पुष्कळ मुलें होतील' असा आशीर्वाद दिला. त्यानें आपल्या दुसर्या दासीपुत्रांस वगळून आपली सर्व जिंदगी आयझाक यास दिली. तो व त्याची बायको, हीं फार वृद्ध होऊन मरण पावलीं.
अब्राहामच्या चरित्राचें ऐतिहासिकदृष्ट्या फारसें महत्व नाहीं. परंतु ख्रिस्ती धर्मशास्त्रांतील जुन्या कराराचा अभ्यास करणार्यास तें फार उपयोगी आहे. हिब्रू लोकांनां अब्राहाम म्हणजे आपल्या ध्येयांचें मूर्त स्वरूप आहे असें वाटतें. ते त्यास राष्ट्रनिर्माणकर्ता पुरुष म्हणून अग्रस्थानीं लेखितात व ईश्वरानें त्यास वरचेवर अभिवचन देऊन व त्याच्याशीं करार करून त्याजवरील आपले प्रेम व्यक्त केले, म्हणून त्यास फार पूज्य मानितात.
धर्मसंस्थापनकर्ता, मूळपुरुष व संकटसमयीं ईश्वर नेहमीं त्याचा पाठिराखा असे या समजुतीमुळें हिब्रू लोकांच्या दृष्टीनें त्याचें महत्व फारच आहे.