विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अब्र:हामाइट.- हा ग्रंथ १८ व्या शतकांत बोहिमियांत अस्तित्वांत होता. ह्या पंथाचे लोक ईश्वरवादी होते. हे आपणांस आब्राहामनें सुंता करण्यापूर्वीचे त्याचे अनुयायी म्हणवीत असत. जगांत एकच ईश्वर आहे, असें यांचें मत होतें यांनीं ख्रिस्ती किंवा यहुदी या दोन्ही पंथांत आपली गणना करून घेण्याचें नाकारिलें, म्हणून या पंथास उपासनास्वातंत्र्याच्या कायद्यांतून दुसर्या जोसेफ बादशहानें वगळिलें व हद्दपार केलें.