विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अब्रूनुकसानी — एखाद्या गृहस्थाची अब्रूनुकसानी करणें म्हणजे लेखांनीं किंवा भाषणांनीं किंवा खुणांनीं किंवा चिन्हांनीं त्याची इज्जत घेणें होय. बर्याच प्राचीन कायद्यांच्या ग्रंथांतून अब्रूनुकसानीस फौजदारी गुन्ह्याचें स्वरूप दिलेलें आढळून येतें. यावरून द्रव्याच्या मोबदल्यानें अब्रूनुकसानीच्या गुन्ह्याचें परिमार्जन करितां येतें ही कल्पना प्राचीन काळीं प्रचलित नव्हती असें दिसतें. प्राचीन काळच्या रोमन कायद्याप्रमाणें अपशब्दात्मक गाणीं रचणारास व सार्वजनिकस्थळीं मोठयानें अपमानास्पद भाषण करणारांस देहान्त शिक्षा सांगितलेली होती. त्याहून सौम्य स्वरूपाच्या बेअब्रूच्या व अपमानाच्या अपराधांस शिक्षाहि त्याच प्रमाणांत सौम्य सांगण्यात येत असे. त्यानंतर ज्या रोमन न्यायतत्वशास्त्रावर हल्लीं प्रचलित असलेल्या इतर पाश्चात्य देशांतील कायद्याची उभारणी केली आहे त्यांत भाषणांनी केलेल्या बेअब्रूच्या विचार दोन प्रकरणांत केलेला आहे. पहिल्या प्रकरणांत सार्वजनिकरीत्या केलेल्या बेअब्रूचा विचार केलेला असून दुसर्यांत खाजगी रीतीनें केलेल्या बेइज्जतीचें विवेचन आहे. बेअब्रू करणार्या विधानाची सत्यता सिद्ध करून आरोपीस आपली सुटका करून घेतां येत होती इतकेंच नव्हे तर त्याकाळीं आपले विधान सत्य आहे अशी आरोपीची समजूत असल्यासहि तो दोषमुक्त होत असे. भाषणांनीं केलेल्या बेअब्रूच्या गुन्ह्यास रोमन लोकांत द्रव्यदंडाची शिक्षा करण्याची चाल असे. परंतु पुढें त्या प्रकारच्या गुन्ह्यास अधिक कडक शासन करण्यांत येऊं लागलें.
हिं दु स्था नां ती ल प्रा ची न का य दा.— या विषयाची हिंदुस्थानासंबंधी माहिती दोन कालविभाग पाडून दिली पाहिजे. यांपैकीं पहिला प्राचीन संस्कृत ग्रंथांतील कायद्याचा काळ होय. हिंदूंचे सुप्रसिद्ध कायदे ग्रंथ मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति इत्यादि होत. या स्मृतिग्रंथांत अब्रूनुकसानीसंबंधींचा जो कायदा दिलेला आढळतो तो हिंदुस्थानांत दोन हजार वर्षांहूनहि अधिक वर्षें प्रचलित असावा व तोच ब्रिटिश अमलाखालीं पीनल कोडाचा कायदा अंमलांत येईपर्यंत चालू होता. या जुन्या हिंदू कायद्याचें स्वरूप प्रथम पाहूं.
शब्दांनीं दुसर्याची अब्रू खराब करणें हा विषय आपल्या स्मृतिग्रंथांत ' वाक्पारुष्यं ' या सदराखाली दिलेला असतो. वाक्पारुष्याचें लक्षण नारदस्मृतींत येणेंप्रमाणें दिलें आहे.
देशजातिकुलादीनामाक्रोशं न्यंगसंयुतम्र।
यद्वच: प्रतिकूलार्थं वाक्पारुष्यं तुदच्यते ॥
म्हणजे देश, जाति, किंवा कुल याला उद्देशून प्रतिकूल अर्थ असलेले शब्द अंगविक्षेप करून मोठयानें बोलणें याला वाक्पारुष असे म्हणतात. अशा अपशब्दांचे किंवा आक्रोशाचे तीन प्रकार केले आहेत: देशाक्रोश, जात्याक्रोश, व कुलाक्रोश. '' गौड लोक कलहप्रिय आहेत '' असें म्हणणें हा देशाक्रोशाचा गुन्हा होय. '' ब्राम्हण लोक अत्यंत लोभी असतात '' असें म्हणणें हें जात्याक्रोशाचें आणि '' वैश्वामित्र म्हणजे विश्वमित्र कुलांतले लोक क्रूर कर्मे करणारे असतात,'' हें कुलाक्रोशाचें उदाहरण होय. शिवाय एखाद्या व्यक्तीच्या विद्येची किंवा कारागिराच्या कौशल्याची वगैरे निंदा करणें हाहि वाक्पारुष्याचाच प्रकार होय. या अपराधाला दण्ड ठरवितांना त्याचे पुढीलप्रमाणें आणखी भेद केले आहेत.
निष्ठुराश्लील तीव्रत्वादपि ततञिविधं स्मृतम्।
गौरवानुक्रमात्तस्य दण्डोऽपि स्यात्क्रमादगुरु:॥
म्हणजे अपशब्दांचे निष्ठुर, अश्लील व तीव्र असे तीन भेद असून त्या भेदानुसार शिक्षा अधिकाधिक मोठी सांगितलेली आहे. धिङमूर्ख, जाल्म इत्यादि निष्ठुर अपशब्दांचें: भगिन्यादि गमनविषयक शब्द अश्लील अपशब्दांचें; आणि सुरापी इत्यादि तीव्र अपशब्दांचें उदाहरण आहें. शिवाय दण्डाचें कमजास्त मान व्यक्तींच्या वर्ण व जाति यांच्या उच्चनीचत्वावरहि अवलंबून होतें. त्याविषयीं याज्ञवल्क्यस्मृतींत पुढील वाक्य आहे.
दण्डप्रणयनं कार्यं वर्णजात्पुत्ताराधरै : (याज्ञ. १८. २०६)
उदाहरणार्थ :- ब्राम्हणाला क्षत्रिय अपशब्द बोलल्यास दण्ड १०० पण, वैश्य बोलल्यास २०० आणि आणि शूद्र बोलल्यास जिव्हाछेदादि शारीरिक शिक्षा; उलट पक्षीं ब्राम्हण क्षत्रियाला अपशब्द बोलल्यास दण्ड ५० पण, वैश्याला बोलल्यास २५ पण आणि शूद्राला बोलल्यास कांहींच शिक्षा नाहीं, असा फरक केलेला आहे. शिवाय जुन्या स्मृतिग्रंथांतील कायद्यांत आणि अलिकडील ब्रिटिश अमलांतील दिवाणी अपकृत्यांच्या कायद्यांत (टॉर्ट) दोन महत्वाचे फरक आहेत. पहिला फरक हा कीं, उच्चारलेले अपशब्द यथार्थ असेल म्हणजे ते उद्दिष्ट व्यक्तीला पूर्ण लागू पडत असले तरी त्या अपराधाबद्दल शिक्षा स्मृतिग्रंथांत सांगितली आहे.
काणं वाप्यथवा खव्जमन्यं वापि तथाविधं॥
तथ्येनापि ब्रुवन् दाप्यो दंण्ड कार्षापणावरम्॥ मनु ८.२७४
म्हणजे काणा, लंगडा वगैरे शब्द तशा माणसाला जरी उद्देशून वापरले तरी अब्रूनुकसानीबद्दल बोलणाराला दण्ड करण्यांत यावा असा स्मृतिग्रंथातील कायदा आहे. उलटपक्षीं हल्लींच्या अपकृत्यविषयक कायद्याप्रमाणें बोललेले शब्द सत्य असेल तर तो अपराध होत नाहीं. दुसरा महत्वाचा फरक म्हणजे हल्लींच्या कायद्यांत अब्रूनुकसानी हा अपराध ' अपकृत्य ' (टॉर्ट) आणि ' गुन्हा ' ( क्राईम ) या दोन्ही सदराखालीं घालतां येतो. म्हणजे अपशब्दाबद्दल केवळ नुकसानभरपाई म्हणून योग्य रक्कम वादीला प्रतिवादीकडून दिवाणी कोर्टमार्फत मिळविता येते. आणि तेच अपशब्द फौजदारी गुन्हा ठरवून अपराध्याला दण्ड, शिक्षाहि मॅजिस्ट्रेटकडून देववितां येते. अशा तर्हेची दुहेरी व्यवस्था जुन्या हिंदु कायद्यांत नाहीं.
इं ग्र जी का य दा.—या विषयावरील इंग्रजी कायदा मूळांत कसा होता हें स्पष्टपणे सांगतां येण्यासारखें नाहीं. साधारणपणें पहिल्या एडवर्डच्या कारकीर्दीपासून दिवाणी कोर्टांतील द्रव्यमोबदल्याचा मार्ग खुला झाला होता. त्यावेळीं भाषणांनीं व लेखांनीं केलेल्या बेअब्रूच्या गुन्ह्यांत फारसा फरक करण्यांत येत नव्हता. बेअब्रूच्या अपराधास फौजदारी गुन्ह्याचें स्वरूप पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत देण्यांत आलें आणि त्या वेळेपासून इंग्लंडांत बेअब्रूच्या गुन्ह्यास दिवाणी व फौजदारी असे दोन्ही उपाय अंमलांत आले आतां आपण या दोन्ही उपायांचें स्वतंत्र रीतीनें अवलोकन करूं.
दिवाणी कायदा.—यांत प्रथम लेखांनीं व भाषणांनीं केलेल्या बेअब्रूचा विचार करून त्यांत फरक केला जातो. भाषणांनीं उत्पन्न होणार्या अब्रूनुकसानींचें परिमार्जन करण्याला मर्यादित उपाय असतात. यांत प्रत्येक अपशब्दात्मक किंवा निंदाव्यंजक शब्द विचारांत घेण्यांत येतो असें नाहीं. प्रतिवादीच्या बेअब्रूकारण भाषणानें वादींचें अमुक सांपत्तिक नुकसान झालें किंवा अमुक सांपत्तिक नुकसान हटकून होण्यासारखें आहे हे सिद्ध करावें लागतें. वादीची बदनामी झाली, त्याच्या समाजांत त्याची मानहानी झाली किंवा बेअब्रूकारक विधानामुळें त्याच्या मनाला धक्का बसून तो बेमार झाला इतकें दाखवून भागत नाहीं. ज्या वेळेस वादीला आपलें सांपत्तिक नुकसान झालें असें सिद्ध करतां येत नाहीं, तेव्हां कांही कांही बाबतींतच फक्त अब्रूनुकसानीची फिर्याद करण्याचा हक्क असतो. उदाहरणार्थ प्रतिवादानें सजा होईल अशा तर्हेचा गुन्हा केल्याचा त्याच्यावर आरोप केला असेल तर किंवा त्याला सांसर्गिक रोग झाला आहे असा प्रतिवादीनें त्याच्यावर आरोप केला असेल तर, प्रतिवादीच्या भाषणांनीं वादीचा वारसाहक्क बुडण्याचा संभव असेल तर, प्रतिवादीनें वादी-स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप केला असेल तर आणि प्रतिवादीच्या भाषणांनीं वादीच्या धंद्यांत नुकसान होण्याचा संभव असेल तर वादीला दिवाणींत अब्रूनुकसानीचा दावा लावतां येतो.
लेखांनी केलेल्या बदनामीच्या बाबतींत प्रतिवादीला इतक्या सवलती देण्यांत येत नाहींत. कारण लेख लिहिणाराला अधिक सवड असल्यामुळें त्याचें लिहिणें जाणून बुजून व द्वेषमूलक असलें पाहिजे असें गृहीत धरण्यांत येतें. या कारणानें लेखी बदनामीच्या दाव्यांत वादींचे नुकसान झालें किंवा त्याच्या धंद्यांत त्याजकडे कमीपणा आला वगैरे गोष्टी सिद्ध कराव्या लागत नाहींत. हा बेअब्रूकारक मजकूर तिर्हा
इताच्या नजरेस पडेल अशा रीतीनें प्रसिद्ध केला असला पाहिजे. हें प्रसिध्दीकरण प्रतिवादीकडून अगदीं निष्काळजीपणानें झालें असलें तरी तेवढयानें तो दोषमक्त होत नाहीं. बेअब्रूकारक मजकुराबद्दल लेखक प्रकाशक व मुद्रक या तिघांवर जबाबदारी असते व नुकसानभरपाईच्या दृष्टीनेंच फक्त प्रसिध्दिकरणाच्या क्षेत्राबद्दल विचार करण्यांत येतों. बदनामीकारक लेखांतील निंदा उघड उघड नसून प्रच्छन्न आहे असें म्हणून प्रतिवादीला आपलें संरक्षण करिता येत नाहीं.
लेखांतील किंवा भाषणांतील बेअब्रूकारक मजकुराला जर सत्याचा आधार असेल तर त्यानें प्रतिवादीला आपलें रक्षण करितां येतें परंतु त्या मजकुरांत सत्य आहे हें सिद्ध करण्याचा बोजा मात्र त्याजवर असतो. कांहीं बाबतींत मात्र प्रतिवादीवर तसला बोजा नसतो कारण कायद्यानेंच तशाप्रकारचीं विधानें क्षम्य समजण्यांत येतात. उदाहरणार्थ, एखाद्या प्रतिवादीनें जर न्यायकचेरीतींल एखाद्या कज्ज्यांत अवश्य लागणारी माहिती दिली व ती माहिती देतांना त्याला वादीची बदनामी होईल असा मजकूर सांगावा लागला तर त्याबद्दल प्रतिवादीवर अब्रू-नुकसानीचा दावा लावतां येत नाहीं. त्याचप्रमाणें पार्लमेंटांत केलेल्या विधानांबद्दल किंवा तीं प्रसिद्ध केल्याबद्दल दावा करितां येत नाहीं. वृत्तपत्रकारांसहि सत्य विधानांबद्दल व सार्वजनिक हिताच्या मजकुराबद्दल जबाबदार धरतां येत नाहीं.
खाजगी आयुष्यक्रमांत एकानें दुसर्याशीं विश्वासानें केलेलीं विधानेंहि कायद्यानें क्षम्य मानलीं आहेत. नैतिक, सामाजिक व कायदेशीर कर्तव्य करीत असतां जर त्या कर्तव्यासंबंधीं एकानें दुसर्याजवळ कांहीं विधानें केलीं तर ती विधानें दुसर्यानें पृच्छा केल्यानंतर त्यास प्रामाणिकपणानें दिलेली माहिती: उदाहरण, नोकराच्या वर्तणुकीबद्दल दिलेली माहिती, एखाद्या व्यापार्याच्या लायकीबद्दल दिलेली माहिती, स्नेह्याला दिलेली इशारत किंवा ज्या एका धंद्यांत दोघांचें हित निगडित झालें आहे त्यासंबंधीं एका भागीदारानें दुसर्या भागीदारास दिलेली माहिती वगैरे सर्व कायद्याच्या दृष्टीनें क्षम्य आहेत.
फौजदारी कायदा.- बदनामी करणार्या लेखांत किंवा भाषणांत निंदापर, अनीतीपर व राजद्रोहपर मजकुराचा समावेश होतो. साधारणपणें दिवाणी व फौजदारी कायद्यांत सामान्य तत्वांसंबंधीं फारसा फरक नाहीं.
एकोणिसाव्या शतकांत इंग्लंडांत जे अब्रूनुकसानीचे खटले झाले त्यात पंचांच्या अधिकारासंबंधीं बराच मनोरंजक व महत्वाचा वाद झाला. हा वाद काय होता हें ज्यांनीं मेकॉलेचा 'सात बिशपसंबंधीं निबंध' वाचला असेल त्यांस विस्तारानें सांगण्याची गरज नाहीं. परंतु ज्यांत हा वाद विशेष निकरानें चालविण्यांत आला व ज्यांत त्याचा समाधानकारक रीतीनें निकाल लागला असे खटले म्हटले म्हणजे. वुडफॉल व विल्कीज वगैरेवर झालेले व डीन ऑफ सेंट असाफ याजवर झालेला खटला हे होत. या खटल्यांत लॉर्ड अर्स्किन यानें मोठया चातुर्यानें व निकरानें काम चालवून वादाचा निकाल लावून घेतला. पंचांनी पुराव्यांत दाखल केलेल्या गोष्टींचाच तेवढा विचार करावयाचा कीं, आक्षेपित मजकूर बेअब्रूकारक आहे कीं नाहीं याबद्दल व लेखकाचा हेतु काय होता याचाहि विचार करून आपला अभिप्राय द्यावयाचा हा वादाचा मुख्य प्रश्न होता. अखेर दोषी किंवा निर्दोषी असा निकाल देणें हा अधिकार पंचांकडे होता ही गोष्ट खरी. तथापि त्यांनी न्यायाधीशानें केलेल्या समारोपाचें नीट मनन करावें व निकाल देतानां कोणत्या गोष्टी विचारांत घेण्याविषयीं न्यायाधीशानें त्यांस सांगितले तेंहि त्यांनीं ध्यानांत ठेवावें असें कायद्याचें सामान्य तत्व आहे. या सामान्य तत्वास अनुसरून सदर खटल्यांतील आक्षेपित मजकूर ''बेअब्रूकारक'' या सरदारांत पडतो किंवा नाहीं व कायद्याच्या दृष्टीनें तो मजकूर द्वेषमूलक ठरवितां येतो किंवा नाहीं हें पहावयाचें काम न्यायाधीशाचे असून पंचांनीं त्याचा विचार करण्याचें कारण नाहीं असें त्यांस सांगण्यांत आलें. फौजदारी कायद्याच्या वरील सामान्य तत्वासंबंधीं वाद नव्हता आणि वरील खटले जर अब्रूनुकसानीच्या खाजगी स्वरूपाचे असते तर त्या वादाला विशेष महत्व आलें नसतें. प्रस्तुत खटल्यांत राजकीय विषयाच्या चर्चेला किती स्वतंत्रता असावी हा मुख्य वादाचा विषय होता. सार्वजनिक हिताच्या प्रश्नाच्या वेचनस्वातंत्र्याचा हल्लीं ज्याप्रमाणें व्यापक दृष्टीनें विचार करतात त्याप्रमाणें जर त्यावेळीं विचार करण्यांत आला असता तर वादच उपस्थित झाला नसता. लेखकानें आपला लेख सध्देतूनें लिहिला कीं असध्देतूनें लिहिला हें ठरविण्याचा हक्क पंचांचा आहे असें अर्स्किनचें म्हणणें होतें आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणेंच प्रस्तुत इंग्लंडचा कायदा आहे.
हिं दु स्था नां ती ल अ र्वा ची न का य दा.—वर सांगितल्याप्रमाणें अब्रूनुकसानी हा विषय अपकृत्यांचा कायदा (लॉ ऑफ टॉटर्स) आणि फौजदारी गुन्ह्याचा कायदा (पीनल कोड) या दोन्ही ठिकाणीं येतो. या दोन्ही प्रकारचा हिंदुस्थानांतील कायदा मूळ इंग्रजी कायद्याच्या आधारें तयार झाला असल्यामुळें त्याचें सामान्य स्वरुप वर दिलेल्या इंग्रजी कायद्याच्या माहितीवरून लक्षांत येईल. तथापि कांहीं बाबतींत इंग्रजी व हिंदुस्थानांतील कायद्यांत फरक आहे. भाषणांनीं केलेल्या बेअब्रूबद्दल प्रत्यक्ष सांपत्तिक नुकसान झाल्याचा पुरावा असल्याशिवाय नुकसानीबद्दल दावा चालत नाहीं असा इंग्रजी कायद्याचा सामान्य नियम आहे, पण मद्रास हायकोर्टानें हा इंग्रजी कायद्याचा नियम अयोग्य ठरवून अशा बेअब्रूनें सांपत्तिक नुकसान झालें नसलें तरी दु:ख व त्रास झाल्याबद्दल वादीस नुकसानभरपाई द्यावी असें ठरविलें आहे [८ मद्रास १७५ (१८८४)]. मुंबई व अलाहाबाद हायकोर्ट याच मताचें आहे. कलकत्ता हायकोर्ट मात्र इंग्रजी कायद्याच्या मताचें आहे. बेअब्रूकारक लेख प्रसिद्ध करण्यास मनाई हुकूम (इन्जंक्शन) करण्याचा अधिकार स्पेसिफिक रिलीफ अॅक्टाचा कलम ५४ (इ) पोटसदराप्रमाणें हिंदुस्थानांतील कोर्टांनां दिलेला आहे. इंग्रजी कायद्याप्रमाणें साक्षीदारानें आपल्या जबानींत केलेल्या बेअब्रूकारक विधानाबद्दल दावा करतां येत नाहीं. हिंदुस्थानांत प्रिव्हि कौन्सिलनें व मुंबई हायकोर्टानें याच नियमाला संमति दिली आहे. पण कलकत्ता व अलाहाबाद हायकोर्टांनी अप्रस्तुत विधानें बेअब्रूकारक असल्यास नुकसानभरपाई मिळावी असें मत दिलें आहे. फिर्याद व कैफियत अर्जांतील अप्रस्तुत बेअब्रूकारक विधानाबद्दलहि असाच निर्णय या हायकोर्टांनीं दिलेला आहे.
अब्रूनुकसानी या फौजदारी गुन्ह्याची व्याख्या व स्वरूप इंडियन पीनल कोंडांतील ४९९ कलम व त्याला जोडलेलीं चार स्पष्टीकरणें व दहा अपवाद यांत दिलें आहे. सामान्यत: ही व्याख्या इंग्रजी कायद्याप्रमाणेंच आहे. पण दोहोत मुख्य फरक असा आहे कीं, लिहिलेल्या शब्दांप्रमाणें तोंडानें बोललेले शब्दहि या गुन्ह्याखालीं पीनल कोडाप्रमाणें येऊं शकतात. पण इंग्रजी कायद्यांत केवळ तोंडचे शब्द (ते कितीहि बेअब्रूकारक असले तरी,) फौजदारी गुन्हा म्हणून मानले जात नाहींत, त्याबद्दल दिवाणी कोर्टामार्फत फक्त नुकसानभरपाई मिळूं शकते. तोंडी अपशब्दांपेक्षां लेखी अपशब्द लोकांत अधिक पसरतात व अधिक काळ टिकतात, असें या फरकाचें कारण इंग्रजी कायद्यांत दिले आहे. पण तोंडी अपवादच लोकांत अधिक फैलावतात असा पुष्कळ वेळां अनुभव येतो व असल्या अपवादाचे निराकरण करणेहि फार कठिण असतें. म्हणून पीनल कोडच्या व्याख्येंत लेखी बेअब्रूप्रमाणें तोंडी बेअब्रूहि गुन्हा मानला आहे. दुसरा महत्वाचा फरक हा आहे कीं, इंग्रजी कायद्यांत अशा लेखी, छापील, खोदिव वगैरे अपशब्दांनीं मनुष्य शांतताभंगास म्हणजे अत्याचारास प्रवृत्ता होईल किंवा काय हें पाहिलें जातें; अत्याचारास प्रवृत्त करण्याइतके कडक ते अपशब्द नसल्यास ते गुन्हा मानीत नाहींत. पीनल कोडांत ही अट नाहीं. ज्या अपशब्दामुळें मनुष्य इतरांकडून नैतिक किंवा बौध्दिकदृष्टया कमी दर्जाचा लेखला जाईल, किंवा त्याला त्याच्या जातींत किंवा धंद्यांत कमी योग्यतेचा मानतील, किंवा त्याची पत कमी होईल, किंवा तो शारीरिक दृष्टया संसर्गास अयोग्य मानण्यांत येईल असे अपशब्द या गुन्ह्याखालीं येतात (कलम ४९९, स्पष्टीकरण ४ थें). पीनल कोडच्या व्याख्येप्रमाणें बेअब्रूकारक शब्द प्रसिद्ध केले गेले पाहिजेत, म्हणजे उद्दिष्ट व्यक्तीखेरीज एका तरी इसमास ते कळले पाहिजेत. फक्त उद्दिष्ट व्यक्तीसच ते ज्ञात केले गेल्यास तो गुन्हा मानला जात नाहीं. इंग्रजी कायद्यांत ही अट नाहीं. आक्षेपित मजकुराची पुनरावृत्ति करणें हाहि पीनल कोडाप्रमाणें स्वतंत्र गुन्हा मानला जातो, व त्याला शिक्षा तितकीच कडक असते. तसेंच मृत मनुष्याबद्दल बेअब्रूकारक शब्द बोलणें गुन्हा आहे (स्पष्टीकरण १ लें); पण त्याबद्दल दिवाणी कोर्टामार्फत नुकसानभरपाई मात्र मागतां येत नाहीं असा कायदा आहे. शिवाय व्यक्तीप्रमाणें कंपन्या, संस्था वगैरेनांहि बेअब्रूच्या गुन्ह्याबद्दल काम चालवितां येते (स्पष्टीकरण २ रें).
पीनल कोडांत बेअब्रूच्या गुन्ह्याच्या व्याख्येला जोडलेले अपवादहि महत्वाचे आहेत. बेअब्रूकारक शब्द सत्य असून ते सार्वजनिक हित साधण्याकरितां व जरूर तितक्याच प्रमाणांत व लोकांत प्रसिद्ध केल्यास तो गुन्हा होत नाहीं (अपवाद १ ला). म्हणजे बेअब्रूकारक शब्द सत्य आहेत एवढ्यानें अपराधी बचावत नाहीं (दिवाणी खटल्यांत बचावतो,), तर त्याची प्रसिध्दि सार्वजनिक हिताकरितां व योग्य प्रमाणांत केली गेली असली पाहिजे. तसेंच सरकारी नोकरांच्या सार्वजनिक कृत्यांवर कोणाहि व्यक्तींच्या सार्वजनिक कृत्यांवर, कोर्टांतील साक्षीदारांच्या व खटल्याशीं संबंध असलेल्या इतर व्यक्तींच्या खटल्याबाबत वर्तनावर, कोर्टानें निर्णय दिलेल्या खटल्यावर, नाटक, जलसे वगैरेंच्या सार्वजनिक प्रयोगांवर, पुस्तक-वर्तमानपत्रांदिकांवर वगैरे बाबतींत सध्देतुपूर्वक टीका करणें हा गुन्हा होत नाहीं. तसेंच स्वत:च्या अधिकाराखालील व्यक्तींबद्दल म्हणजे आईबापांनीं मुलांबद्दल, शिक्षकानें विद्यार्थ्यांबद्दल, धन्यानें चाकराबद्दल, वगैरे अपशब्दात्मक भाषा वापरली- मात्र ती सध्देतुपूर्वक असली पाहिजे- तर तो गुन्हा होत नाहीं.
आक्षेपित शब्दांचें सत्यत्व तपासावयाचें म्हणजे त्यापैंकीं प्रत्येक शब्द खरा असला पाहिजे असें नाहीं तर आनुषंगिक गोष्टींची व परिस्थितीची माहिती शक्य तितकी मिळवून साधारण अक्कलहुषारीचा माणूस जीं अनुमानें काढील तशा प्रकारची टीका असली म्हणजे ती सध्देतुपूर्वक केलेली आहे असें कोर्ट मानतें व तो गुन्हा होत नाहीं. तसेंच कोणत्याहि माणसाच्या सार्वजनिक कृत्यांवर योग्य ती टीका करणें हें सार्वजनिक हिताचें आहे असें कोर्ट मानतें. मात्र गैरसमज उत्पन्न करणारीं चुकीचीं विधानें बुध्दिपुर:सर केलेली असतां कामा नये. अशा प्रकारचें अब्रूनुकसानीसंबंधींच्या हिंदुस्थानांतील कायद्याचें स्वरूप आहे.