विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभयगिरि —सिंहलद्वीपाची प्राचीन राजधानी जी अनुराधपुर, तेथील एका प्रख्यात मठाचें हें नांव आहे. राजा वट्टगामिनीनें स्तूपाशेजारी हा मठ बांधिला. वट्टगाभिनीचें एक नांव अभय असें असल्यामुळें याला अभयगिरि असें नांव पडलें. या मठवाश्यांमध्यें व त्याहून २१७ वर्षांनीं प्राचीन असलेल्या महाविहार मठांतील भिक्षूंमध्यें बरीच स्पर्धा असें. प्रथम वैयक्तिक व नंतर धार्मिक मतांत स्पर्धा सुरू झाली. तथापि तिचें स्वरूप नक्की माहीत नाही. एकदां महासेन ( इ. स. २७५—३०२ ) राजाच्या कारकीर्दीत महाविहार मोडून त्यांतील माल अभयंगिरिला दिला, पण नंतर लगेच महाविहार पूर्वीच्या योग्यतेला चढून त्यानें सिंहल द्वीपाच्या इतिहासांत आपली श्रेष्ट पदवी कायम राखिली. [ ए. रि. ए.- अभयगिरि. केव्ह-रूइंड सिटिज् ऑफ सिलोन. सिलोन अर्किआलॉजिकल रिपोर्टस् १८६८-१९०७ नॉक्स-हिस्टारिकल रिलेशन ऑफ दि आयलंड ऑफ सिलोन ].