विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभयदेवसूरि - (१) हा बृहत खरतरगच्छाचा संस्थापक होता. ३ ते ११ या नऊ अंगावर त्यानें टीका लिहिल्या म्हणून त्यास सामान्येंकरून नवांगवृत्ति असें म्हणतात. तो ‘ धारा ’ येथें जन्मला. त्याच्या बापाचें नांव धन व आईचें नांव धनदेवी होतें. त्यांचा बाप धारा येथील एक व्यापारी होता. दीक्षा घेण्यापूर्वी त्याचें नांव अभयकुमार असें होतें. वयाच्या १६ व्या वर्षी त्यानें आचार्यपद संपादन केलें. वर्धमानसूरीच्या विनंतीवरून संवत् १०८८ सालीं जिनेश्वरसूरीनें त्यास सूरि केलें. संवत् ११३५ साली गुजराथेंत कप्पडवणिज ग्रामांत तो मरण पावला. दुस–या प्रमाणभूत ग्रंथकारान्वयें त्याचा मृत्युकाल संवत ११३९ आहे. वर्धमान, जिनेश्वर, जिनचंद्र व प्रस्तुतचा अभयदेव ( जिनचंद्राचा लघुगुरू भ्रातर ) हे अनुक्रमें ३९,४०,४१ व ४२ असे क्ल्याटनें पट्टावलीतील क्रमांत दिले आहेत.
ग्रं थ.— अभयदेवानें खाली दिलेले ग्रंथ लिहिले असें सर्वश्रुत आहे:—
( १) स्नानांगावरील टीका संवत् ११२० मध्यें. अभय देवानें वरील टीका अनहिलपट्टण येथे अच्छुप्त नामक व्यापार्या च्या घरी द्रोणाचार्याच्या नेतृत्वाखालीं भरलेल्या पंडिताच्या सभेकरितां तयार केली. अजितसिद्दाचार्योचा शिष्य यशोदेवगणि यानें त्याला मदत केली.
(२) समवायांगावर टीका. वर निर्दिष्ट केलेल्या स्थली व त्याचवर्षी लिहिली.
(३) भगवतीसूत्रावर टीका. अच्छुप्त व्यापार्याच्या घरी अनहिटपट्टण येथें संवत ११२८ साली अभयदेवानें वरील टीका लिहिली.
(४) ‘ ज्ञाताधर्मकथांगा ’ वर टीका. संवत् ११२० च्या दसर्या ला वरील टीका अभयदेवानें लिहून संपविली.
(५) उपासक दश, अंतकृद्दश, व अनुत्तरौपपातिका, ( ७ वें ८ वें व ९ वें अंग) यांवर टीका. यावर कर्त्याचे नाव नाहीं तरी अभयदेवानें त्या लिहिल्या असाव्या असें मानण्याला आधार आहे. अभयदेवाची सहाव्या अंगावरील टीका व ७,८,९ या अंगावरील टीका एका हस्तलिखित ग्रंथांत एकत्र केलेल्या आहेत. शिवाय १० व ११ अंगावरील अभयदेवाच्या टीका व ७,८,९ अंगावरील अनामिक टीका मिळून एक ग्रंथ झाला आहे. त्याचे कर्तृत्व अभयदेवाकडे येतें. नवव्या अंगावरील टीके ( संवत ११८४ त लिहिली ) च्या हस्तलिखित प्रतींत २ श्लोक आहेत. ते प्रिन्सेपच्या आवृतींत सापडतात, परंतु बर्लिन येथील हस्तलिखित प्रतीत आढळत नाहीत. ह्यावरून ते त्या आवृतींत प्रक्षिप्त असावे असें पीटर्सन अनुमान काढतो.
(६) ‘ प्रश्नव्याकरणांगा ’ वर टीका. अभयदेव असें विधान करितो कीं, वर जी एक पंडिताची सभा द्रोणाचार्यांच्या नेतृत्वाखाली भरली होती म्हणून उल्लेख आलेला आहे त्या सभेकडे वरील टीका परीक्षणाकरिता पाठविली होती.
(७) विपाकसूत्रनामक ११ व्या अंगावर टीका
(८) उवइ सूत्रावर टीका. द्रोणाचार्यांच्या नेतृत्वाखालीं भरलेल्या पंडितांच्या सभेचा उल्लेख पुन्हां हीत केलेला आहे.
(९) आराहणपगरण ( आराधन प्रकरण ).
(१०) हरिभद्राच्या पंचाशक ग्रंथावर टीका. विचारामृतसंग्रहांत अभयदेवाने लिहिली आहे असा निर्देश केलेला आहे. ही टीका धवलक्कपूर (धोलका) येथें संवत ११२४ सालीं अभयदेवानें लिहिली. पीटरसन यानें अहवालाच्या परिशिष्ट ३ पान ४५ मध्यें याच नांवाचा एक निराळा ग्रंथ हरिभद्राचा आहे असें लिहिलें आहे. पण तो ग्रंथ ह्मणजे अभयदेवाच्या टीकेची नक्कल असली पाहिजे, असे तोच म्हणतो. विचारामृतसंग्रहावरून वेवर यानें एक उतारा घेतलेला आहे त्यावरून असें दिसतें कीं, प्रकरणसमूहाला पंचाशक असें नांव पडण्याचें कारण प्रत्येक प्रकरणांत ५० गाथा आहेत हें होय. प्रकरणांची संख्या १९ आहे.
(११) जयतिहुयणस्तोत्र (पार्श्वनाथस्तुति) संवत् ११११ मध्यें लिहिले.
(१२) जिनचंद्रगणीच्या नवतत्त्वपगरणावर टीका.
(१३) निगोडषटत्रिंशिका. हें पुस्तक अभयदेवसूरीनें केलेलें नाही असेंहि कांहीचें मत आहे.
(१४) पंचनिग्रंथ विचारसंग्रहणी.
(१५) पुद्गलषटत्रिंशिका.
(१६) पण्णवनाच्या (चौथें उपांग) तिसया पदावर संग्रहणी.
(१७) जिनभद्गाच्या विशेषावश्यक भाष्यावर टीका.
(१८) हरिभद्रकृत षोडशकावर टीका.
(१९) देवेंद्रकृत सत्तरीवर ( सत्तरिक प्रकरण अथवा सप्ततिका ) गाथाबद्ध टीका.
(२) गुजराथचा राजा (सं. ११२०—५०) कर्ण यापासून याला मलधारिन् ही पदवी मिळाली, म्हणून त्याला मेलधारिन् असें म्हणत असत. सुराष्ट्रा ( सोरठ )च्या खेंगर राजावर त्याचें फार वजन होतें असा उल्लेख आहे. अभयदेवसूरीनें खेंगर राजाला जैन दीक्षा दिली. अभयदेवसूरीच्या सांगण्यावरून गिरनारच्या यात्रेकरूंवर बसविलेले कर खेंगर राजानें माफ केले. हा अभयदेवसूरि प्रश्नवाहन कुलातला, कोटिगणाच्या मध्यम शाखेच्या स्थूलिभद्रमुनीच्या वंशांतला व हर्षपुरीयगच्छाचा होता. संवत् ११७० सालीं हेमचंद्रसूरीनें भवभावना ग्रंथ रचिला. त्याचा अभयदेवसूरि गुरू असून जयसिंहसूरीचा हा शिष्य होता. हजाराहून अधिक ब्राह्मणांनां जैन दीक्षा दिल्यावर व कडमड नांवाच्या यक्षाला जैन केल्यावर मदेरा शहरीं ( अजमींर जवळ ) त्यानें एक महावीराचें देवालय बांधविलें.
(३) विजयचंद्रसूरीचा (विजयेंदु) शिष्य व देवभद्रसूरीचा गुरू होता. जिनशेखरापासून अभयदेवसूरि हा पट्टावलींतील तिसरा पुरूष होता ( जिनशेखर, पद्मचंद्र, विजयचंद्र, अभयदेव ). संवत् १२०४ सालीं हा होऊन गेला अशी प्रसिध्दि आहे. याला दुसरा अभयसूरि हें नांव दिलें. हा दुसरा अभयसूरि पहिल्यापेक्षां कमी प्रतीचा नव्हता. याच्या आधिपत्याखालीं रूद्रपल्लीयगच्छ महत्त्वाला चढला. “ संवत् १२०४ त रूद्रपल्ली येथें जिनशेखराचार्यांनी रूद्रपल्लीयखरतरशाखा स्थापली. हा दुसरा गच्छभेद होता. ” काशीच्या राजानें याला वादीसिंह अशी पदवी दिली होती असा उल्लेख आहे. ‘ जयंतविजयकाव्य ’ नांवाचा ग्रंथ यांने संवत् १२७८ सालीं लिहिला.
(४) हा गुणाकरसूरीचा समकालीन होता. संवत् १४२६ सालीं गुणाकरसूरीनें सरस्वतीपट्टण येथें भक्तामरस्तोत्र टीका लिहिली. ह्या वर्षी टीकेची नक्कल सरकारनें विकत घेतली आहे. क्ल्टचें म्हणणें आहे की, याच अभयदेवसूरीनें संवत् १४५१ साली तिज्जयपहुत्तस्तोत्र रचिलें आहे.
(५) अभयदेवसूरि हा राजगच्छांतील प्रद्युम्नसुरीचा शिष्य व अनुगामी होता. अजितसेनाच्या चरित्रांत याचा उल्लेख आलेला आहे. नैय्यायिक ग्रंथकाननांत स्वैर केसरीप्रमाणे संचार करीत असल्याबद्दल याचें वर्णन केलेलें आहे. अनेक परस्परविरूद्ध मतानीं सन्मार्गाचा नाश होऊं नये ह्या उद्देशानें अभयदेवानें वादमहार्णव ग्रंथ रचिला. याच्यानंतर जिनेश्वर अधिकारी झाला. १२७६ त पार्श्वनाथ चरित्राचा कर्ता माणिक्यचंद्र हा ‘अभयदेवसूरीपासून मी नववा उत्तराधिकारी आहे ’ असें म्हणतो. सिद्धसेनसूरि त्याचा उल्लेख आपला ९ वा पूर्वाधिकारी म्हणून करितो. सिद्धसेनसूरीनें सं. १२४२ त ग्रंथ लिहिले आहेत. ह्या अधिकारवंशावलीप्रमाणें अभयदेवानंतर धनेश्वरसूरि झाला. धनेश्वरसूरि मुंजराजाचा समकालीन होता. याच अभयदेवानें संम्मतिसूत्रावर टीका लिहिली असून तिचें नाव तत्त्वबोधविधायिनी असें ठेविलें आहे. कँल्टनें जिचा उल्लेख केला आहे ती ‘कतिपय सूत्र व्याख्या ’ कदाचित तत्त्वबोधविधायिनीहून निराळी नसावी. शांतिसूरी ( मृत्यु सं १०९६ ) च्या दोन अध्यापकापैकीं अभयदेवसूरि हें नांव असलेला ‘ जगप्रसिद्ध ’ सूरि व प्रस्तुतचा अभयदेवसूरि हे दोघे एक असावेत.
[ सं. ग्रं— पीटर्सन्स रिपोर्ट ४ था ] ( बाँ. ब्रँ. रा. ए. सो. १८९४ ). भांडारकर रिपोर्ट १८८३-८४ वेबर इंडिश्चे.स्टुडिया १६. क्ल्चाट-इं अँ. पु. ११ किलहाने रिपोर्ट, फोर्ब्स-रासमाला.]