विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभयसिंह ( इं स. १७२५-१७५० ) —जोधपुरचा राजा. यानें आपला बाप अजितसिंह याचा खून करून राज्य मिळविलें ( संवत् १७८१ ). तो गादीवर आला त्याच सालीं त्यानें भंदोडच्या रावइंद्राकडून नागोर घेऊन तें आपला भाऊ बखत याच्या स्वाधीन केलें. संवत १७८२ म्ह.इ.स. १७२६ मध्यें तो आपल्या पश्चिम सरहद्दीवर भूम्या लोकांची बंडे मोडण्यात गुंतला होता. सं १७८२ मध्यें अभयसिंहास दिल्लीहून बादशहाचें बोलावणें आले. सं. १७८४ म्ह. इ. स. १७२७ मध्यें तो दिल्लीस जाऊन पोहोंचला. व शहाजादा जुंगली [ ?] याचें बंड मोडण्यास पाठविलें असतां गुजराथ बळकावून बसलेल्या सर बुलंदखानाचा पराभव करण्याचा विडा उचलून त्यानें:बादशहाकडून गुजराथची सुभेदारी मिळविली. (टॉड) १७३० च्या जून महिन्यांत अभयसिंह दिल्ली सोडून अजमीरला आला व त्या प्रांताची त्याला सुभेदारी मिळाली असल्यामुळें त्यानें तेथें आपले लोक नेमिले. यानंतर तो मेढत्यावरून जोधपूरला आला, व सरबुलंदखानावर चालून जाण्याकरितां त्यानें आपलें सर्व सैन्य गोळा केलें. संवत् १७८६ ( इ. स. १७३१ ? ) च्या चैत्र शुद्ध १० स अभयसिंह जोधपुराहून निघून सिरोहीवर चालून आला. तेव्हां तेथील राजानें लढाईच्या भानगडीत न पडतां आपली पुतणी ( मानसिंहाची मुलगी ) अभयसिंहास देऊन त्यास संतुष्ट केलें. हिच्याच पोटी पुढें दहा महिन्यांनी, अभयसिंहाच्या मागून मारवाडच्या गादीवर बसलेला, रामसिंह जन्मास आला. यानंतर अभयसिंहाने पालनपूर, सिद्धपूर मार्गानें अहमदाबादेवर चाल करून जाऊन त्या शहरास वेढा घातला, व सं. १७८७ ( इ. स. १७३१ ) सालच्या आश्विन शुद्ध १० स अहमदाबाद सर होऊन सरबुलंदखान शरण आला.
अभयसिंहाचा भाऊ बखतसिंह हा मोठा पराक्रमी होता. गुजराथेवरील स्वारीत त्यानें बरेच शौर्य दाखविलें होतें. बखतसिंहाच्या शौर्यामुळे अभयसिंहास त्याची फार भीति वाटत होती व स्वत: बखतसिंहहि आपल्यावर अभयसिंहाचा विश्वास नाही हें समजून चुकला होता. या भावाभावांतील चुरशीमुळें अंबरच्या जयसिंहाची जोधपूरवर स्वारी घडून आली. बिकानेर येथें जोधपूरच्या राठोडवंशी रजतपुतांची एक स्वतंत्र पण कनिष्ट शाखा राज्य करीत होती. बिकानेरच्या राजानें अभयसिंहाचा कांही क्षुल्लक गोष्टीत अपमान केल्यामुळें त्यानें बिकानेरवर स्वारी करून त्या शहरास वेढा घातला. परंतु अभयसिंहाच्या सैन्यांतील लोकांस या आपआपसांतील भांडणांत उत्साह न वाटल्यामुळें बिकानेरचा वेढा कित्येक दिवस रेंगाळत राहिला. ही संधि साधून बखतसिंहानें बिकानेरच्या वकीलास अंबरच्या जयसिंहाची मदत मागण्याचा सल्ला दिला. बिकानेरच्या वकीलाच्या विनंतीवरून जयसिंहानें अभयसिंहास बिकानेरचा वेढा उठविण्याविषयीं लिहिलें. अभयसिंहास जयसिंहाची ही लुडबुड आवडली नाही. त्यानें जयसिंहास आपण वेढा उठविण्यास तयार नाहीं म्हणून खडखडीत जबाब पाठविला. तेव्हां हा आपला अपमान झाला असें वाटून जयसिंह जोधपूरच्या राज्यावर चालून आला; हे पाहून अभयसिंहहि बिकानेरचा वेढा उठवून जयसिंहास तोंड देण्यास आला. आपल्या कारस्थानाचें अशा रीतीनें राष्ट्रीय लढ्यांत पर्यवसान झालेले पाहून स्वत: बखतसिंहच जयसिंहाशीं लढण्यास पुढें आला. या दोन्ही सैन्यांची जोधपूरच्या सरहद्दीवर गंगवणी येथें लढाई झाली व तीत जयसिंहाच्या सैन्यानें माघार घेऊन स्वदेशी गमन केलें अभयसिंह सं १८०६ ( इ. स. १७५० ) मध्यें मरण पावला.
वरील हकीकत टॉडच्या राजस्थानाप्रमाणें दिली आहे. टॉडनें ज्या कर्णनामक भाटाच्या काव्यावरून आपली हकीकत घेतली आहे त्यानें बरीच एकतर्फी हकीकत दिली आहे. त्यानें अभयसिंहाच्या पितृवधाची गोष्ट आपल्या हकीकतीतून वगळली असून अभयसिंह व बखतसिंह यांच्या परस्पर संबंधाविषयीहि बराच लपवालपवीचा प्रकार केलेला दिसतो. रिसायतकार म्हणतात की, अभयसिंह हा दुष्ट, व्यसनी व विलासी असून त्याची कारकीर्द त्याचा भाऊ बखतसिंह याशीं लढण्यांत गेली. बील म्हणतो की, अजितसिंहानंतर जोधपूर येथे बखतसिंहानें राज्य केलें. पण बखतसिंहास जोधपूरची गादी अभयसिंहाच्या मरणानंतर मिळाली. बीलनें अभयसिंह व बखतसिंह यांच्यामध्यें घोटाळा केलेला दिसतो. कारण, ज्याचा इ. स. १७५२ मध्यें विषप्रयोगानें खून झाला व ज्याच्यामागून त्याचा पुत्र विजयसिंह गादीवर बसला म्हणून तो म्हणतो तो अभयसिंह नसून बखतसिंह होय. अजितसिंहाच्या वधाचा सन रिसायतकारांनी इ. स. १७३१ दिला आहे.
[ सं द र्भ ग्रं थ.— टॉडचे राजस्थान; मुसुलमानी रियासत; बील-ओरिएंटल बायाग्रॉफिकल डिक्शनरी ].