विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिजित् - ज्योतिषांत अभिजित् हें एका नक्षत्राचें नांव असून आकाशांत त्यायोगें ज्यास इंग्रजीत लायरा म्हणतात त्या तारकापुंजाचा बोध होतो. यांची गणना नक्षत्रांत करण्यांत येते तरी त्याचा क्रातिवृत्ताशी वस्तुत: काहीं संबंध नाहीं. हें फारच उत्तरेस आहे. सूर्य, ब्रह्मगुप्त, द्वितीय आर्यभट व सार्वभौम या सिध्दांताच्या मतें या नक्षत्राचा योगतारा जो व्हीगा त्याचें कदंबाभिमुख शर अनुक्रमें ५९° ५८’, ६१° ५६’, ६३°व ६२° १४’ उ. हे आहेत. या सिध्दांतांत या तार्याचे कदंबाभिमुख भोग अनुक्रमें २६४° १०’, २६०° ४६’, २५३ ° व २६२° १० ’, दिलेले आहेत. १९०५ च्या आरंभी या तार्याचे विषुवांश २८° ३३’ ४३”, ३ व क्राति ३८° ४१’ ४१”.८ उ. होती. व वर्षगति अनुक्रमे + २”. ०१ व २ ”. ९ आहे. वैदिकग्रंथात या नक्षत्राचा उल्लेख मैत्रायणी संहिता २.१३’.२०; तैत्तिरीय ब्राह्मण १.५,१; अथर्वसंहिता १९.७ या ठिकाणी दिलेल्या नक्षत्रांच्या याद्यांत आढळतो. परंतु उलटपक्षी तैत्तिरीय संहितेंत किंवा काठक संहितेंत जेथें नक्षत्रांची नावें आलीं आहेत. तेथें हें नक्षत्र नाहीं. अभिजित् शब्दाचा प्रयोग या सर्व ठिकाणीं एकवचनांतच आढळत असल्यामुळें त्या वेळी त्या नक्षत्रांत एकच तारा अंतर्भूत करण्यांत येत होता हें उघड आहे. तथापि वृद्धगार्गीय संहिता, खंडखाद्यक, लल्लकृत रत्नकोश. , शाकल्यब्रह्मसिध्दांत, श्रीपतिकृत रत्नमाला, मुहूर्ततत्त्व, मुहूर्तचिंतामणी या उत्तरकालीन ग्रंथांत या नक्षत्रांतील तारकांची संख्या तीन दिलेली आढळते.
लायरा असें जें या तारकापुंजास इंग्रजीत नांव आहे त्याचा अर्थ स्वरमंडल किंवा सारंगी असा आहे.याचा ख्रि. पू. ४ थ्या शतकांत होऊन गेलेला युडॉक्सस व ख्रि. पू. ३ र्या शतकांत झालेला आरेटस यांनी उल्लेख केलेला आहे. या नक्षत्रांत टॉलेमीनें १० तार्यांची, टायकोब्राहीनें ११ तार्यांची व हेवेलियसनें १७ तार्यांची नोंद केली होती ( विज्ञानेतिहास ८ वें प्रकरण पहा ) या तारकापुंजातील लायरी उर्फ व्हीगा ही तारा पहिल्या प्रतीची असून तेजस्वीपणांत त्याला उत्तरगोलार्धांत दुसरें स्थान आहे. या तार्याचें वैशिष्टय म्हणजे त्याच्या प्रकाशाची शुभ्रता हें असून ही शुभ्रता सूर्यप्रकाशाच्या शंभरपट आहे. व्हीगा हें नांव ‘पडणारा गरूड’ ( वेगि ह्मणजे पडणारा ) या अरबी नांवाचे अपभ्रष्ट रूप आहे व तशाच प्रकारचा अपभ्रंश होऊन आल्टेर ( व आक्किली = श्रवण) म्हणजे ‘ उडणारा गरूड ’ हें दुसर्या एका तार्याचें नांव बनलेलें आहे. ६ लायरी हा एक तारकागुच्छ असून त्यांत नुसत्या डोळ्यांनींहि किंवा फार झालें तर एकाद्या लहानशा दुर्बिणीच्या साह्य्यानें दोन तारका दिसूं शकतात; तीन-इंची दुर्बीण घेतली तर यांपैकी प्रत्येक पुन्हा दोन तारका दिसूं लागतात, व याहूनहि अधिक सूक्ष्म ( चार-इंची ) दुर्बिणीनें या दोन जोड्यांमध्यें तीन बारीक बारीक तारका द्दग्गोचर होतात बीटा लायरी व आर् लायरी या अल्पावधीच्या रूपविकारी तारका आहेत. याच तारकापुंजांत एम् ५७ लायरी हा सुप्रसिद्ध वलयाकार तेजोमेघ असून त्याच्या मध्यभागी असलेली अंधुक तारका प्रकाशलेकनानें द्दग्गोचर होऊं शकते. एप्रिलमध्यें दिसणार्या लायरिड नामक उल्कावृष्टीचें उद्रमस्थानहि याच तारका पुंजांत आहे.
पंचागांत २१ व्या नक्षत्राचा चतुर्थपाद व २२ व्या नक्षत्राचा पंधरावा भाग मिळून होणार्या १९ दंडांइतक्या काळास अभिजित हें नांव असून त्यास २८ वें नक्षत्र मानण्यांत येतें. अभिजिन्मुहूर्त हें दिवसाच्या आठव्या मुहूर्ताचें मध्यान्हपूर्व एक घटका व मध्यान्होत्तर एक घटकाया कालाचें नांव आहे.
[ सं द र्भ ग्रं थ:—ज्योतिर्विलास, भारतीय ज्योतिषशास्त्र ब्रिटानिका लायरावरील लेख. मोलस्वर्थकृत कोश.]