विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिधम्मत्थसंगह — ब्रह्मदेश हें अभिधम्माच्या अध्ययनाचें केन्द्रस्थान आहे. बौद्ध लोकांच्या मानसशास्त्रावरील व नीतिशास्त्रावरील अभिधम्मत्थसंग्रह हें छोटें पुस्तक अत्यंत महत्त्वाचें आहे. याचा कर्ता अनुरूद्ध हा असून तें बहुधा बाराव्या शतकांत लिहिलें गेलें असावे, सिलोन व ब्रह्मदेश या देशांत हें पुस्तक अद्यापि आधारभूत असून दुसर्या कोणत्याहि अभिधम्मग्रंथांपेक्षां या पुस्तकावर वारंवार अधिक टीका लिहिल्या जातात; व ब्रह्मी भाषेंत भाषान्तरें केलीं जातात.
या ग्रंथाचें प्रकाशन टी. डब्यू. र्हीसडेव्हिडस् यानें १८८४ मध्यें केलें. मिसेस र्हीसडेव्हिडस् बाईनीं याच्या भाषांतराची आवृत्ति १९१० मध्यें प्रसिद्ध केली.
अभिधम्मांतील सात प्रकरणांत ज्या पदार्थांचा उहापोह केला आहे, त्यांतील प्रधानभूत पदार्थांचा संग्रह अनुरूद्धाचार्यांनीं अभिधम्मत्थसंग्रह प्रकरणांत केला आहे. अभिधम्मांतील जे अर्थ म्हणजे पदार्थ, त्यांचा संग्रह असा ह्या प्रकरणाच्या नांवाचा अर्थ आहे. पहिल्या परिच्छेदांत चित्ताचे ८९ किंवा १२१ विभाग कसे होतात ह्याचा संग्रह आहे. दुसर्या परिच्छेदांत प्रत्येक चित्तांत कोणकोणत्या चित्तवृत्ती असतात, किंवा असूं शकतात, ह्याचा विचार केला आहे. तिसर्यांत चित्तचेतसिकधर्म वेदना, हेतु, कृत्य, द्वार, आलम्बन इत्यादिकांच्या योगें कसे अस्तित्त्वांत येतात ह्याचें विवेचन आहे. चवथा वीथिसंग्रह ह्यांत रूपरसादिक विषयांशी व प्रवृत्तींशीं मनाचा संबंध आला असतां कशाप्रकारें व्यापार घडून येतो ह्याचा फारच चांगला विचार केला आहे. पांचव्यांत पूर्वजन्मापासून इहजन्मी प्राण्याची त्या त्या उत्तमाधम लोकांत कशी उत्पत्ति होते, हे दर्शविलें आहे. सहाव्यांत जड सृष्टीचे विभाग पाडून कर्म, चित्त, ऋतु, आहार ह्यांच्या योगानें शरीराचा जड भाग पालटत असतो हें दाखविलें आहे. शेवटीं थोडक्यांत निर्वाणाचें वर्णन आहे.सातव्या समुच्चयसंग्रहांत कुशलाकुशल आणि अव्याकृत पदार्थांचें अभिधर्मांत भिन्न भिन्न ठिकाणीं जें वर्गीकरण केलें आहे त्याचा संग्रह आहे. आठव्यांत प्रतीत्यसमुत्पादरूपानें वर्णिलेल्या व पठ्ठान- प्रकरणांत वर्णिलेल्या प्रत्ययांचा ( कारणांचा ) संग्रह आहे; व नवव्यांत समाधीचे जे निरनिराळें प्रकार आहेत ते दाखविले आहेत. हें प्रकरण सिंहलद्वीप आणि ब्रह्मदेश येथें फारच लोकप्रिय आहे. त्याच्यावर प्राचीन आणि अर्वाचीन अशा बर्याच टीका उपलब्ध आहेत.
अनुरूद्धाचार्यांच्या बाबतींत सांपडणारी माहिती अपुरी असून कित्येक ठिकाणी परस्परविरोधी आहे तरी हे आचार्य कांचीपुर ( आधुनिक कांजीवर,) शहरांत किंवा त्याच्या आसपास इ. स. ११ व्या शतकाच्या अखेरीस किंवा १२ व्या शतकाच्या आरंभी झाले असले पाहिजेत, एवढें अनुमान करतां येतें. सिंहलद्वीपांत प्रख्यात पराक्रमबाहूच्या कारकीर्दीला सुरवात इ. स. ११६४ सालीं झाली, व त्यानंतर त्यानें ३३ वर्षे एकछत्री राज्य केलें. आपल्या कारकीर्दीत बौद्धधर्माच्या उन्नतीसाठी त्यानें अनेक कामें केलीं. त्यांत, आपली राजधानी पुलत्थिपुर ( सिंहल = पोलोत्ररूवा) ह्याच्या शेजारी जेतवन नांवाचा मोठा विहार बांधून तेथें सारिपुत्त नांवाच्या महास्थविरास निवासस्थान करून दिलें, असें वर्णन महावंशांत सांपडतें. ह्या सारिपत्त स्थविरानें अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांत सिंहली भाषेंत लिहलेली अभिधम्मत्थसंगहाची टीकाहि आहे. तिच्याच आधारें त्याच्या सुमंगलस्थविर नांवाच्या शिष्यानें विभावनी टीका पाली भाषेंत लिहिली. अर्थात् अनुरूद्धाचार्यांचा काल सारिपुत्तस्थविरापूर्वी निदान ५० वर्षे तरी असला पाहिजे. [वि.विस्तार वर्षे ५४. अं. ७ ].