विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिधर्मकोश —हा नितिशास्त्र, मानसशास्त्र, व अध्यात्मशास्त्र या विषयांची चर्चा करणारा सूत्रकारिकाबद्ध हीनयान पंथाचा वसुबंधुकृत ग्रंथ आहे. या कोशाची मूळ संस्कृत आवृत्ति नष्ट झाली असून फक्त चिनी व जपानी प्रती हयात आहेत. त्यांपैकी चिनी प्रती सर्वांत जुन्या आहेत. त्यांतील पहिली प्रत परमार्थ नांवाच्या हिंदू भिक्षूनें ( इ. स. ५६३-५६७) केली व दुसरी, पहिलीचीच सुधारलेली भाषांतरित आवृत्ति ह्युएनत्संग यानें इ. स. ६५१-६५४ मध्यें रचिली. या कोशाचा कर्ता प्रसिद्ध, बौद्ध पंडित वसुबंधु असून, इ. स. च्या ५ व्या शतकाच्या शेवटी याचा काळ धरतात. या कोशांत ६०२ कारिका व त्यावर वृत्ति असे दोन भाग आहेत ; व धातु, इंद्रियें, लोक, अनुशय, आर्यपुद्गल, ज्ञान, समाधि आणि पुद्गल असे आठ विषय मांडिलें आहेत.वसुबंधु सर्वास्तिवादीपथाचा होता, तरी त्याचा कोश सर्व बौद्ध पंथांनां प्रमाणभूत असा आहे. कोशावरचा प्रसिद्ध असा टीकात्मक ग्रंथ “अभिधर्मकोशव्याख्या ” हा होय.
अभिधर्मकोशव्याख्येचा कर्ता यशोमित्र सौत्रान्तिक असून चिनी व जपानी लोकांनीं त्याचा ग्रंथ मूळ वचनंग्रथ म्हणून सर्वदां अभ्यासिलेला आहे. अभिधर्म कोशावर बरेंचसें साहित्य झालेलें आहे. यशोमित्रापूर्वी हिंदुस्थानांत स्थिरमति, गुणमति आणि वसुमित्र यांनी या कोशावर टीका लिहिल्या असून, त्यांच्या तिबेटी प्रती अद्याप आढळतात. ह्युएनत्संगाच्या शिष्यांनी कांही टीका लिहिल्या आहेत. या कोशावरील वाङ्मयानें सर्व ग्रंथ संग्रहालय भरणें हल्लीं सोपें जाईल. या कोशाला जी इतकी मान्यता मिळाली त्याचें कारण त्याच्या कर्त्याच्या ठिकाणी असलेले अलौलिक गुण होत. वसुबंधूनें सर्व पंथांतील गहन तत्त्वांचें विशदीकरण करून, फार उत्तम रीतीनें सर्वमान्य बौद्धमतें एकत्र प्रतिपादिलीं आहेत.
[ सं द र्भ ग्रं थ :— ए. रि. ए. ( अभिधर्मकोश व्याख्या). विंटरनिझ- हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर. पु.२. बुद्धोत्तरजग ( ज्ञानकोश)].