विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिनंद - योगवासिष्ठकथासार व कादंबरीकथासार या ग्रंथांचा कर्ता, गौडकवि, अभिनंद, याचा काल इ. स, ८४० हा असावा. कारण त्याच्यामागील ४ थ्या पिढींतील पूर्वज ( खापरपणजा) शक्तिस्वामिन् हा काश्मीरच्या मुक्तापीडाच्या अनदानीत ( इ. स. ७२६) होता. अभिनंदाचा जन्म काशी येथें झाला होता. परंतु तो गौड (बंगाल) येथें राहिला होता असें दिसतें. धर्मपालाच्या वंशातील विक्रमशीलाचा मुलगा युवराज हारवर्ष हा त्याचा आश्रयदाता होता.
याला गौडाभिनंद असेंहि म्हणत. काश्मीरच्या मुक्तापीड कर्कोटवंशजांचा दिवाण शक्तिस्वामी, त्याचा मुलगा कल्याण स्वामी, त्याचा मुलगा कांत, व त्याचा मुलगा जा भट्ट जयंत तो अभिनंदाचा पिता होय. क्षेमेंद्रानें आपल्या सुवृत्ततिलकांत ( ३.१६,२९) याचा उतारा दिला आहे. श्रीधरदासकृत सृक्तिकर्णामृतांत ( ३.५२) उद्भृत केलेल्या याच्या एका श्लोकांत आपला समकालीन म्हणून राजशेखराची स्तुति यानें केली आहे. याच ग्रंथांत उद्भृत केलेल्या दुसर्या एका श्लोकांत ( ५.१२९) भवभूति, बाण, कमलायुध, केशट वाक्पतिराज यांचा नामनिर्देंश अभिनंदानें केला आहे. रामचरितमहाकाव्याचा कर्ता जो अभिनंद तो निराळा असावा असें ऑफ्रेक्ट सूचीवरून दिसतें [आफ्रेट सूची]