विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिनव गुप्त — हा काश्मीरचा शैव पंडित इ. स. च्या दहाव्या शतकात होऊन गेला. यानें आपल्या बृहत्प्रत्यभिज्ञानविमर्शिनति—इति “ नवतितमेsस्मिन्वत्सरेsत्न्ये युगाशे | तिथिशशिजलधिस्थे मार्गशीर्षावसाने ” ||- असें जें म्हटलें आहे या वरून त्याच्या कालाचे अनुमान करितां येतें.याचा बाप चुखल, आजा वराहगुप्त, भाऊ मनोरथगुप्त व गुरू उत्पलदेव, इंदुराज आणि तौत हे असून क्षेमराजाचा गुरू जो सोमानंद त्याचा हा प्रशिष्य होता. भट्ट नारायण, भट्ट दिवाकर वत्साचा विवेकांजन ग्रंथ,विद्यापति, सोमानंदाचा शिवदृष्टिसार ग्रंथ, संक्षेपविमर्शाधिरोह यांचा गुप्तानें आपल्या बृहत्प्रत्यभिज्ञानविर्मार्शिनीत उल्लेख केला आहे. आणि क्षेमेंद्र, मम्मट, माधवाचार्य, शार्ङ्गदेव व इतर यांनीं आपल्या ग्रंथांतून गुप्ताचा उल्लेख केला आहे. ईश्वरप्रत्यभिज्ञानविमर्शिनी, घटकर्परकुलवृत्ति, तन्त्रसार, तन्त्रालोक, ध्वन्यालोक लोचन ( काव्यालोक टीका), परमार्थसंग्रह, परमार्थसार (आधानकारिका), परात्रिशिकातत्त्वविवरण, बिंब प्रतिबिंबवाद, बोधपंचदशिका, भगवद्गीतार्थसंग्रह, भेदवादविदारण, भैरवस्तव, शक्तिभाष्य, स्पंद इत्यादि ग्रंथ यानें रचिले आहेत. ही मोठी ग्रंथरचना इ. स. ९९३—१०१५ पर्यंत झाली असावी.