विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिनव गुप्ताचार्य.—ही ऐतिहासिक किंवा बहुत करून काल्पनिक व्यक्ति माधवाचार्यांच्या शंकर दिग्विजयाच्या सोळाव्या सर्गांत आणली आहे. आचार्यानीं वादांत त्याचा पराभव केला, व शंकराचार्यांस भगंदर रोग झाला होता तो याच्या मांत्रिक करणीनें झाला, त्याच्या उपचारासाठीं मांत्रिक करणी पद्मपादनामक शिष्यानें केली तेव्हां तो रोग बरा झाला आणि अभिनवगुप्त मेला, असें त्या काव्यांत वर्णिलें आहे.
अभिनवबाण—( वामनभट्ट बाण ) हा कोंडुवीडूच्या वेम नांवाच्या रड्डीवंशीय राजाच्या (१४ व्या शतकाचा शेवट अगर पंधराव्याचा आरंभ) पदरी राजकवि होता. यानें ‘ वीर नारायणचरित ’ नाटक लिहिलें. तसेंच यानें ‘ पार्वती-परिणय ’ हें नाटक लिहिलें. हें नाटक हर्षाच्या पदरी असलेल्या बाणानें लिहिलेलें आहे व ते कुमारसंभवाच्या आधारें रचलेलें आहे, अशा समजुतीनें तें फार लोकप्रिय झालें. कृष्णम्माचरियर यानें हें नाटक अभिनवबाणाचें आहे असें सिद्ध केलें आहे. यानें ‘ शृंगारभूषणभाव ’आणि कदाचित् ‘ शर्वचरित ’ लिहिलें असावें. पार्वतीपरिणयनाटकांत शिवपार्वतीविवाह व मदनदहनाची कथा यानें वर्णन केली आहे.