विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिमन्यु - (१) सहावा चाक्षुषमनु याच्या पुत्रांतील एक.
(२) सोमवंशी पुरूकुलोत्पन्न अजमीढ राजा. त्याच्या वंशांत जन्मलेल्या कुरूपुत्र जन्हु राजाच्या कुलांतील पंडुपुत्र जो अर्जुन, त्याचा पुत्र. हा अष्टवसूंतील सोमनामक वसूचा पुत्र वर्चस्, त्याच्या अंशानें कृष्णभगिनी सुभद्रा, हिचे पोटीं अर्जुनापासून झाला होता. ( भार. आदि. अ. ६७ ), हा जन्मला त्या वेळींच दीर्घबाहु, वीर आणि महाक्रोधी असा दिसला म्हणून य चें अभिमन्यु हें नांव ठेविलें होतें.
यानें अर्जुनापासून दशविध धनुर्वेद, तशीच मानुष आणि दिव्य अस्त्रविद्या संपादिली होती. तीत हा इतका प्रवीण होता कीं, बलरामानेंहि त्याचें हस्तचापल्य आणि अस्त्रयोजना परिज्ञान हीं पाहून संतुष्ट होऊन यास रौद्रनामक उत्तम धनुष्य दिलें होतें. याचा बसण्याचा रथ परमभव्य असें व त्यास हा कपिल वर्णाचे पिंगट अश्व जोडी, याच्या रथाचा ध्वज शार्ङ्पक्षाचा असून रथ हांकण्यांत परम कुशल, असा याचा सारथि सुमित्र नांवाचा होता ( भार. द्रोण. अ. २३).
हा अर्जुनाप्रमाणेंच पराक्रमी होता. कुरूयुद्धांत द्रोणाचार्य सेनापति असतां दुर्योधनाच्या आज्ञेवरून त्यांनीं चक्रव्यूहाची रचना करून युद्धास आरंभ केला. संशप्तकाकडे अर्जुन गुंतल्यामुळें युद्धाचा भार धर्मभीमादिकांवरच पडला, त्यांना चक्रव्यूह भेदण्याचें ज्ञान नसल्यामुळें ते विचारांत पडले असतां अभिमन्यु ब्यूहभेदाच्या कार्यास तयार झाला. व्यूहभेदाचें ज्ञान त्याला होतें. धर्मानें संमति दिल्यावर अभिमन्यु युद्धास प्रवृत होऊन त्यानें द्रोणाचार्य, कर्ण यांसारख्या योद्धयांस तोंड देऊन व्यूहांत प्रवेश केला. तो व्यूहांत शिरला असें पाहून कर्णादिकांनीं त्याच्या साहाय्यकांस विरोध केला. अभिमन्यूनें बरेंच शौर्य गाजविलें; परंतु तो एकटा व त्याच्याविरूद्ध द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा, दुर्योधनपुत्र लक्ष्मण, जयद्रथ व दु:शासन पुत्र हे त्याच्यावर, एकदम उठल्यामुळें तो बेशुद्ध पडला व सावध होऊन उठणार तोंच दु:शासनपुत्रानें त्याच्या मस्तकांत गदा घातली. त्या घावानें अभिमन्यूचें मस्तक चूर्ण होऊन त्याचा मृतदेह जमीनीवर पडला.
अभिमन्यूची आकृति‚ त्याचा मातुल जो कृष्ण, त्याप्रमाणेंच असून, वीर्य, आणि शौर्यहि तसेंच होतें, याशिवाय हा कृष्णास जितका प्रिय असे, तितकाच किंबहुना कांहीं अधिक बलरामासही प्रिय होता, यास स्त्रिया दोन होत्या, त्यांत पहिली वत्सला, ही बलरामाची कन्या, व दुसरी उत्तरा विराट राजाची कन्या. हा मरण पावला, त्यावेळेस उत्तरा गर्भवती असून, तिला जो पुढें पुत्र झाला, तोच परीक्षित् राजा प्रख्यात आहे. [भार० द्रोण० अ० ३५—४९ .]