विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिषेक. — हा शब्द अथर्ववेदांत सांपडतो पण ऋग्वेद व सामवेद यांत आढळून येत नाहीं. अथर्ववेदांत देखील याचा अर्थ एखादा निश्चित संस्कार असा नाहीं. शुक्लयजुर्वेद आणि कृष्णयजुर्वेदाच्या तीन संहिता, त्याचप्रमाणें चारहि वेदांची ब्राह्मणें आणि श्रौतवाङ्मय यांत ‘ अभिषेचनीथ ’ हें नांव राजसूयांतील एक विधि या अर्थी आलेलें आहे; व ऐतरेय ब्राह्मणाच्या शेवटच्या पंचिकेंत बहुतेक अभिषेक हाच मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. प्रथम अशा प्रकारचा संस्कार कोठें कोठें करण्यांत आला होता हें सांगून, नंतर अभिषेक, वाजपेय व राजसूय संस्कार यांसंबंधीचे विधी वगैरे खाली दिले आहेत.
सं स्क र णी य व्य क्ति.— अभिषिक्त पुरूष सार्वगौम असत. ऐतरेय ब्राह्मणांत असें सांगितलें आहे की, हा विधि सार्वभौम सत्ता मिळविण्यासाठीं करावयाचा असतो की; या सत्तेलाच साम्राज्य‚ भौज्य स्वाराज्य, वैराज्य, पारमेष्टय, राज्य, माहाराज्य व आधिपत्य हीं समानार्थक नांवें त्यांत दिली आहेत; व अशा सत्ताधीश राजांची यादीहि दिली आहे. (ऐ.ब्रा. ८.२१-२३). महाभारतांत राजा युधिष्ठिराचे दोन अभिषेक वर्णिले आहेत; पहिला (सभापर्व) दिग्विजय केल्यानंतर मांडलिक राजांनां बोलावून राजसूय यज्ञ केला त्यावेळी व दुसरा (शांतिपर्व) महायुद्धानंतर. अशोकानें गादीवर आल्याबरोबर अभिषेक करून न घेतां पुढें चार वर्षांनी तलवार गाजवून मग राज्याभिषेक समारंभ केला.उज्जनीच्या हर्ष शिलादित्यानेंहिं असेंच केलें. रघुवंशाच्या दुस-या सर्गांत अभिषेकांचे वर्णन आहे. तसेंच बृहत्कथेंत ( क्षेमेंद्र १७; सोमदेव १५, ११०, विशेषत: ५,८९) नरवाहनदत्ताचा अभिषेक आला आहे.
सामान्य राजांच्या बाबतीत ही अभिषेकाची चाल फारशी दिसून येत नाहीं, पण जोंपर्यंत त्यांनां कांहीतरी स्वतंत्रता असे तोंपर्यंत त्यांनां सुद्धां अभिषेक होत असे, असें समजण्यास हरकत नाहीं. कारण प्रथम राजे व सम्राट वेगळे काढणें कठिण आहे, व ऐतरेय ब्राह्मणांत (८.१४) नुसत्या राजांनांहि अभिषेक होत असल्याबद्दल स्पष्ट वचन आहे. दुसरें असें कीं, अथर्ववेदाच्या कौशिक सूत्रांत (१७.११-१३) सामान्य राजांच्या (एक राजांच्या) अभिषेकाहून उच्च दर्जाच्या राजाचा (वर्षींयांचा) अभिषेक निराळा कल्पिला आहे. महाभारतांत (शांतिपर्व ५. २४९६) राजभिषेचनविधि देशाला अत्यंत आवश्यक असल्याबद्दल लिहिलें आहे. हर्ष शिलादित्याचा पिता प्रभाकरवर्धन सार्वभौम नव्हता तरी अभिषक्ति होता.
अथर्ववेदांत एक राजसूय सूक्त (४.८) आहे. एखाद्या युवराजाला त्याच्या पित्यानें केलेला अभिषेक आर्ष काव्यांतून वर्णिलेला असतो.
रामायणांत अयोध्याकांड व युद्धकांड यांतून सविस्तर वर्णिलेला रामराज्याभिषेक दोन दृष्टीनीं महत्त्वाचा आहे. एकतर, याला युवराजाभिषेकापासून सुरूवात होऊन अखेरीस राज्यारोहणानंतर याची समाप्ति झाली व दुसरें, पुष्यभिषेकाचें हें एक उदाहरण होय. पुष्याभिषेकाचें सविस्तर वर्णन अथर्ववेद परिशिष्ट ( ४ थें ), वराहमिहिराची बृहत्संहिता व कालिकापुराण यांतून आढळतें. या विधींचें वैशिष्टय म्हणजे चंद्र आणि पुष्यनक्षत्र यांच्या युतींत हा विधि पार पाडला. असें सांगतात कीं , याच कालीं पूर्वीं इंद्रानें असुरांनां जिंकलें. बौद्ध समजुतीप्रमाणें याच वेळीं बोधिसत्त्वाचा यौवराज्याभिषेक व अभिनिष्क्रमण ही घडून आली. ही वेळ रामायणांत अनेक ठिकाणी उल्लेखिली आहे. उदाहरणार्थ २.२, १२; २. ३‚ ४१; २. ४, २२; २. १४, ४२, रामायणत निर्णयसागर आवृत्ति स. १९१५.
कालिकापुराण व बृहत्संहिता यांतील पुष्याभिषेक किंवा पुष्यस्नानविधि केवळ राज्याभिषेकाचा नसून मानवेतिहास संशोधनालाहि त्याचा उपयोग होणार आहे.
कांहीं राजमंत्र्यांनांहि अभिषेक करीत. हर्षचरितांत ‘ मूर्धाभिषिक्ता अमात्या राजान: ’ असें वाक्य आहे. पुरोहिताकरितां बृहस्पतिसव नांवाचा वाजपेयाशीं कांही संबद्ध असा विधि असे. ऐतरेय ब्राह्मणांत ( ८.२४ पासून पुढें ) व कौशिक सूत्रांत (१७.३० पासून पुढें ) अभिषेकानंतरच्या पुरोहितप्रशस्तींत अभिषेचनाचा उल्लेख नाहीं. सेनापतीसंबंधानें महाभारतांत (शल्यपर्व अध्याय ४६) व इतर ठिकाणीं माहिती आहे.
प्रतिष्ठेच्या वेळीं सणावारीं, प्रसंगविशेषीं किंवा नित्य मूर्त्यभिषेक करण्याची भारतांतील हिंदूलोकांत व नेपाळांतील बौद्धलोकांत अजून चाल आहे. त्याविषयीं पूजाविधि, प्रतिष्ठाविधि या ग्रंथांत नियम दिले आहेत. यापूर्वींचा उल्लेख हवा असल्यास हर्षचरितांत सांपडेल. या विधीत योजण्यांत येत असलेलें मुख्य द्रव्य म्हणजे दूध ; पण निरनिराळ्या ठिकाणचें पाणी, गोमय, वारुळाची मृत्तिका इत्यादि दुसरे अनेक पदार्थहि यांत योजतात.
बौद्धलोक अभिषेकभूमि हें नांव त्यांच्या दहा भूमीतील किंवा पूर्णतेच्या आवस्थांतील शेवटच्यास लावितात. (महावस्तु,१. १२४, २० ). त्याचप्रमाणें, अभिषेक हा शब्द पवित्र तलाव, ओढा वगैरे ठिकाणीं कांहीं संस्काराच्या वेळी हिंदु लोक जे स्नान करितात त्यासहि योजतात.
सं स्का र क र्म.— महाभारत ( शांतिपर्व अध्याय ४०) रामायण, अग्निपुराण आणि मानसार यांतून अभिषेकासंबंधी माहिती आली आहे. वरील ग्रंथांत या विधींतील पौरोहित्याची अथवा तंत्राची बाजू फारशी वृद्धिंगत झालेली दिसत नसली तरी या ग्रंथाच्या रचनाकालीं वैदिक विधींत बराच फरक पडला होता हें चांगलें दिसून येतें. पौराणिक कालांतील अभिषेकविधीचें वैदिक विधीशी फारसें साम्य नाही.त्यांतील कार्यक्रमाची बरीचशी उभारणी उत्तरकालीन कल्पनांवर झालेली दिसते. ऐतरेय ब्राह्मणांतील संस्काराला मूलभूत ज्या कल्पना त्यांच्याशीं यांचा फार थोडा संबंध दृष्टीस पडतो. या तफावतीचीं कांहीं विशिष्ट कारणें साहजिकच असणार. उदाहरणार्थ, प्राचीन श्रौतिकर्माविषयी अनास्था किंवा क्षत्रिय विधीनां अपात्र अशा अधिपतींसाठीं नवीन संस्कार अंमलांत आणण्याची आवश्यकता वगैरे.
या संस्कारांतील सर्वसाधार गोष्टी खालील दिसतात :— विधीपूर्वीं ( म्हणजे आधल्या दिवशीं ) राजा स्नान वगैरेंनी शुद्ध होतो. आवश्यक गोष्टी म्हणजे (१) अभिषेकाच्या पूर्वी किंवा त्यावेळीं निरनिराळे राजमंत्री निवडणें (२) राज्ञी, गज, श्वेताश्व, श्वेतवृषभ, श्वेत छत्र, श्वेतचामर इत्यादि राजरत्नांची निवड ; [ ३ ] व्याघ्रचर्माच्छादित सूवर्णसिंहासन ; (४) निरनिराळे-उदाहरणार्थ, सप्तसमुद्राचें- पाणी, मध, दूध, दही, इत्यादि वस्तूंनी भरलेली एक किंवा अनेक सुवर्णपात्रें.
प्रत्यक्ष संस्काराच्या वेळीं राजा पत्नीसमवेत सिंहासनावर बसतो, व एकटा पुरोहितच नव्हे तर इतर ब्राह्मण, मंत्री, आप्त व प्रजाजन त्याला अभिषेक करितात. युधिष्ठिराला प्रथम कृष्णानें ( कदाचित् ऐतरेय ब्राह्मणांत सांगितलेल्या राजकृत या नात्यानें) अभिषेक केला असें महाभारतांत लिहिलें आहे. इंद्राचें स्तवन करून किंवा ऐंद्रमहाभिषेकाला अनुसरून हा विधि केला जातो. विधीनंतर राजा अहेर करतो व उपाध्यायांनां दक्षिणा अर्पण करतो. अग्निपुराण व मानसार यांत असें सांगितलें आहे कीं शहराभोंवतीं एक प्रदक्षिणा करून या विधीची समाप्ति करण्यांत येते. इतर आनंददायक प्रसंगांप्रमाणें या वेळींहि कैद्यांनां मुक्त करितात.
आतां यासंबंधीच्या वाङ्मयाकडे वळूं. फक्त एकच वैदिक ग्रंथ अशा राज्याभिषेकासंबधी नियम देतो व तो ग्रंथ म्हणजे ऐतरेय ब्राह्मण होय. त्यांत दोन स्वतंत्र अभिषेक दिले आहेत ; एक पुनरभिषेक ( ८.५-११) आणि दुसरा ऐंद्रमहाभिषेक (८.१२-२०). पहिला अभिषेक यज्ञानंतर करावयाचा असून त्याचा राज्याभिषेकाशी कांहीहि संबंध नाही.
ऐंद्रमहाभिषेक म्हणण्याचें कारण इंद्राच्या राज्याभिषेकांतील विधी यांत अनुसरले आहेत. तेव्हां ज्या आचार्याला आपला राजा सर्वजेता व सार्वभौम असावा अशी इच्छा असेल त्यानें त्या महत्त्वाकांक्षी क्षत्रियाला या ऐंद्रमहाभिषेकानें अभिषेक करावा. महत्त्वाकांक्षी म्हणण्याचें कारण अभिषेकेच्छु क्षत्रियाची अशी इच्छा असावी लागते की:—
“ अहं सर्वा जितीर्जयेयमहं सवाँल्लोकान्विन्देयमहं सर्वेषांराज्ञां श्रैष्ठयमतिष्ठां परमतां गच्छेयं साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमहं समन्तपर्या. यीस्यां सार्वभौम: सार्वायुष आऽन्तादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराट् |” (ऐ. ब्रा. ८. १४).
अभिषेकसंस्काराची सामुग्री म्हणजे ( १ ) न्यग्रोध, उदुंबर, अश्वत्थ आणि प्लक्ष लांकडांची पात्रें ; ( २ ) प्रियंगु आणि यव धान्याच्या ओंब्या; ( ३ ) उदुंबराचा एक मंचक ( आसंदी ), एक चमस व त्याचीच एक फांदी ; (४) दही मध, तूप आणि उन्ह पडलें असतां पडलेल्या पर्जन्याचें उदक. आसंदी अभिमंत्रण केल्यावर राजा तीवर आरोहण करतो. आणि राजकर्ते त्याची मोठ्यानें द्वाही फिरवितात. नंतर पुरोहित ज्यांत वरूणाचा सम्राज् इत्यादि नांवांनी उल्लेख केला आहे असा मंत्र म्हणतो व राजाच्या मस्तकावर उदुंबंर शाखा आणि सुवर्ण पवित्र ठेऊन दघिप्रभृतीच्या योगानें त्याला मार्जन करितो. राजाकडून दक्षिणा मिळाल्यानंतर पुरोहित त्याला पिण्याकरितां सुरायुक्त पात्र देतो ; सुरा ही सोमरूप आहे असें तो सांगतो नंतर पुढील शांतिमंत्राचा पाठ ऋत्विज राजाकडून करवुन घेतो : “नानां हिवा देदहितं सदस्कृतं मा संसृक्षाथां परमे व्योमनि | सुरा त्वमसि शुष्मिणी सोमएष राजा मैंन हिंसष्टं स्वां योनिमाविशन्ताविति |”
( हा मंत्र ऐंद्रमहाभिषेंकांत नसून पुनरभिषेकांत आहे ).
अभिषेक विधीनंतर ऐतरेयब्राह्मणांत याप्रमाणें अभिषिक्त असलेल्या प्राचीन विख्यात् राजांची व अभिषेक करणा-या ऋत्विजांची यादी दिली आहे; ती अशी:—
राजा. | ऋत्विज. |
१. जनमेजय पारिक्षित | तुरकावषेय. |
२. शार्यात मानव. | च्यवन भार्गव. |
३. शातानीक सात्रजित. | सोमशुष्म वाजरत्नायन. |
४. आंबाष्ठय. | पर्वत व नारद. |
५.युधांश्रौष्टि औग्रसन्य. | पर्वत व नारद. |
६.विश्वकर्माभौवन. | कश्यप |
७.सुदास पैजवन. | वसिष्ट |
८.मरूत्त आविक्षित. | संवर्त आंगिरस. |
९.अंग. | उदमय आत्रेय. |
१० भरत दौष्षन्ति | दीर्घतमा मामतेय. |
खालील पुरूष राजे नसून केवळ अभिषेकज्ञानामुळें दिग्विजयी झाले:
११. दुर्मुख पांचाल. | उपदेशक | बृहदुक्थ. |
१२. अत्यराति जानंतपि. | उपदेशक | वासिष्ठ सात्यहव्य |
आतां राजसूयाकडे वळवण्यापूर्वी ऐतरेय ब्राह्मणांतील (८५—११) पुनरभिषेक संस्कारासंबंधी थोडा विचार करूं.
पु न र भि षे क : — हें नांवच असें दर्शवितें कीं, हा संस्कार ज्यावर करावयाचा ती व्यक्ति पूर्वींच अभिषिक्त असून, या संस्काराचा उद्देश त्याचें राजबलवर्धन करण्याचा असतो. या योगानें राजसत्तेला चालन मिळतें ( “ सूयते हवा अस्य क्षंत्र यो दीक्षते क्षत्रिय: सन ” ऐ. ब्रा.) आणि यागामुळें ज्या अनेक शक्ती राजामधून निघून गेलेल्या असतात त्या पुन्हां आणण्याकरितां निरनिराळ्या वस्तू या संस्कारांत योजतात (“ ब्रह्मक्षत्रेऊर्गन्नाद्यमपामोषधीनां रसो ब्रह्मर्क्चसमिरा पुष्टि: प्रजाति: ”) व या कारणाकरितांच “देवस्य त्वा सवितु: प्रसवे ” इत्यादि मंत्रांनीं सवित्याला आव्हान करण्यांत येतें. ऐंद्रमहाभिषेक व राजसूय यांतहि पुन्हां हा मंत्र म्हणतात.
यांतील विधी ऐंद्रमहाभिषेक विधीप्रमाणेंच बहुतेक असतात. अभिषेकाची साधनें म्हणजे: ( १ )व्याघ्रचर्मानें आच्छादिलेला एक उंदुबराचा मंचक; (२) उदुंबराचा एक चमस व शाखा; ( ३ ) दही, मध, तूप उन्ह पडलें असतां पडलेल्या पर्जन्याचें उदक, तृणांकुर, सुरा आणि दुर्वा हे पदार्थ मिळविलेलें अभिषेक द्रव्य. स्फ्य (तरवारीसारखें काष्ठनिर्मित यज्ञायुध) संज्ञक आयुधानें वेदी आंखून, आसंदी अर्धी वेदीमध्यें व अर्धी वेदीबाहेर ठेवतात. वेदीमागें बसून, उजवा गुडघा जमीनीला टेंकून (वीरासन घालून) राजा दोन्ही हातानें आसंदी धरितो व देवांनां तीवर आरूढ होण्याकरितां पाचारण करितो व नंतर आपण आधिपत्याकरिंतां, स्वराज्या. करितां, स्वामित्वाकरितां व दुस–या अनेक गोष्टीकरितां तीवर आरूढ होतो; मग ऋत्विज अभिषेकद्रव्यें अभिमंत्रित करून, व राजाच्या डोक्यावर उदुंबराची शाखा ठेऊन त्यांनी मार्जन करितो व नंतर त्याला सुरापात्र देतो. राजा त्यांतील सुरा पिऊन अवशिषट आपल्या मित्राला देतो. यापुढें राजा उदुंबरशाखेवर पाय ठेऊन आसंदीखालीं उतरतो व पर्वाभिमुख बसून ‘ नमो ब्रह्मणे ०’ हा मंत्र तीनदां म्हणतो. नंतर विजयाची इच्छा दर्शवून ऋत्विजाला दक्षिणा अर्पण करितो व उठून अग्नीमध्यें समिधा टाकतो. मग हातांत समिधा घेऊन ईशान्येस विजय व योगक्षेम यांची इच्छा धरून तीन पावलें टाकितो. सरतेशेवटीं राजा घरी जाऊन, गृह्याग्नीच्या मागें बसतो व ऋत्विज आज्यपात्रांतून आहुती देतो व राजाच्या कल्याणार्थ मंत्र म्हणतो.
रा ज सू य य ज्ञां ती ल अ भि षे क वि धि :− राजसूयाचा मोठा विधि सार्वभौमत्वाची इच्छा करणा-या क्षत्रिय राजाकरितां आहे. पहिला राजा जो वरूण त्याच्याशीं याचा संबंध जोडल्यामुळें याला वरूणसव असेंहि म्हणतात. पुनरभिषेकाप्रमाणेंच हा विधी पूर्वीं अभिषिक्त असलेल्या राजाकरितांच असे. दोहोंत मोठा फरक म्हणजे अभिषेक हें राज्यांतील एक अवश्य कृत्य असून त्यांत पौरोहित्य येत असे, तर राजसूय हा कांहीं हेतूनें केलेला एक ऐच्छिक धर्मविधि असून यांत अभिषेक हा संस्कार येई. हा यज्ञ केल्याबद्दल राजांनां मोठा अभिमान वाटे व ते वाजपेय, अश्वमेध इत्यादिकांबरोबर याचाहि गौरवानें उल्लेख करीत, हें संस्कृत अंकितलेखांवरून दिसून येतें.
राजसूय यज्ञांत मुख्य सात यागदिन असतात ते म्हणजे पवित्र किंवा अभ्यारोहणीय, अभिषेचनीय, दशपेय, केशवपनीय, व्युष्टि, द्विरात्र व क्षत्रधृति होत. कोणी दशपेय किंवा क्षत्रधृति यापुढें आणखी एक आठवा सौत्रामणी नांवाचा याग जोडतात. पवित्र नामक प्रथम याग फाल्गुनांत सूरू होऊन एक वर्षभर चाले. ही आग्रयणेष्टि पावसाळ्यांत होई असें मानवमत होतें. केशवपनीयांत राजाचे केंस कापीत, कारण अभिषेचनीयानंतर वर्षभर त्याची श्मश्रू होत नसे. या यागांत फक्त अभिषेचनीय व दशपेय कायते आपणाला मजेचे वाटतील असे आहेत. दुस–या वर्षाच्या फाल्गुनांत पहिल्या दिवसापासून कांही प्रास्ताविक विधींनां सुरुवात होते. ते विधी म्हणजे शुनासीरीय, पञ्चवातीय, इंद्रतुरीय, अपामार्गहोम, त्रिषंयुक्त, रत्नहवीषि हे होत. यांपैकीं शेवटचे व अतिशय महत्त्वाचे असे राजरत्नांच्या घरीं एकसारखे १२ दिवस करावयाचे याग होत. अभिषेचनीय चैत्रप्रतिपदेला सुरू होऊन पांच दिवसांत संपतो. आठ देवसुहवीषि संपल्यानंतर अध्वर्यु यजमानाच उजवा हात धरून, सवितृ, अग्नि, बहस्पति, सोम, इंद्र, वरूण इत्यादिकांनां उल्लेखून मंत्र म्हणतो. नंतर १७ अभिषेकद्रव्यांपैकी १३ निरनिराळ्या प्रकारची उदकें व मध, दूध, तूप व गोउल्ब्य (प्रसवणाया गाईच्या गर्भाभोंवतालचें पाणी), ही चार वेगवेगळ्या उदुंबरपात्रांत ठेवलेली असतात ती एका पात्रांत करून व दुसरी चार (पलाश, उदुंबर, न्यग्रोध व अश्वत्थ लांकडाची पात्रे) घेऊन ही सर्व एका वेदीपुढें ठेवतात. दुस–या दिवशीं त्या चार पात्रांत अभिषेकद्रव्य ओतून त्यांपुढे व्याघ्रचर्म पसरण्यांत येतें. राजा समारंभाचा पोषाख करून हातांत धनुष्यबाण घेतो. अरिष्टें टाळण्याकरितां जवळच असणा-या क्लीब पुरूषाच्या तोंडांत एक तांब्याचा तुकडा घालतो. नंतर चारी दिशांकडे पावलें टाकून व ऊधर्वदिशाहि पायाखाली घालून ( सार्वभौमत्व दर्शविण्यासाठीं) व्याघ्रचर्मावर ठेवलेला शिश्याचा तुकडा पायानें उडवितो व चर्मावर आरोहण करितो. त्याच्या पायाखाली सोनें ठेवितात व तसेंच त्याच्या डोक्यावर १०० किंवा ९ भोंकें असलेलें सोनें ठेवितात; नंतर पूर्वेकडे तोंड करून राजा हात वर करितो व अध्वर्यु एक नातेवाईक (भाऊ), एक क्षत्रियस्नेही आणि एक वैश्य असे चौघे अभिषेकपात्रांतील उदकानें सिंचन करितात. या ठिकाणीं त्याला शुन: शेपाची कथा सांगतात असें कांहीचें म्हणणें आहे. नंतर राजा अभिषेक द्रव्य आपल्या अंगाला चोळतो व व्याघ्रचर्मावर तीन पावलें टाकतो ( विष्णूच्या त्रिविक्रमाचें घोतक म्हणून). अवशिष्ट अभिषेकाचें पाणी पलाशचमसांत ओतून तें आपल्या प्रिय मुलाला अर्पण करितो. तें त्याच्या कडून घेऊन अध्वर्यु अग्नींत ओततो. यानंतर ( १ ) गोहरण;ह्म. राजाच्या एका नातेवाईकाची एक गाय ( शंभर गायींपैकी ) हरण करण्यांत आल्यावर राजा रथारूढ होऊन चाल करून जातो व शेवटीं यज्ञगृहीं परत येऊन डुकराच्या कातडयाचा जोडा पायांत घालून रथाखालीं उतरतो; ( २ ) खदिरमंचकारोहण; ( ३ ) राजाला पांच फांसे देऊन अध्वर्यु त्याला काठ्यांनीं मारतो, उद्देश हा की त्याच्यांतील पापें निघून जावीत; मग त्याला ब्रह्मन्, सवितृ, इंद्र आणि रूद्र यां नांवांनीं संबोधितात; ( ४ ) राजा, त्याचा भाऊ, सू किंवा स्थपति, ग्रामणी आणि एक नातेवाईक यांच्यामधील फांशाचा खेळ, (५) इतर किरकोळ गोष्टी. चैत्रांतील सप्तमीला दशपेय समारंभ होतो; त्यांत राजासकट १०० लोक, दहाजणांची एक पंगत करून दहा पेल्यांनी सुरापान करितात. यांत प्रत्येकाची वंशपरीक्षा घेण्यांत येई; म्हणजे प्रत्येकाला आपल्या दहा सोमपी पूर्वजांची नांवे सांगता आली पाहिजेत. पुढें एक वर्षानें केशवपनीय वगैरे याग येतात.
राजसूय यज्ञाचा विधि शतपथब्राह्मण, कात्यायनश्रौतसूत्र आश्वलायन श्रौतसूत्र वगैरेंतून आढळतो. त्यांतील कांही भाग प्राचीन असावा. उदुंबरवृक्ष व उन्हांत पडलेल्या पावसाचे पाणी, या संस्कारानें राजसामर्थ्य वृद्धिंगत होतें ही कल्पना, व शुन:शेपाच्या कथेंतील नरमेधाचा अवशेष या गोष्टी मानवतेहासाच्या दृष्टीनें महत्त्वाच्या आहेत.
वाजपेयाचा उल्लेख अथर्ववेदांत (९.७,७) व ऐतरेय. ब्राह्मणांत ( २.४१,१.) असून, वेदांच्या सूत्रवाङ्मयांत तर तो विस्तारानें वर्णिला आहे. या यज्ञांत अभिषेकाचें एक स्वरूप दृष्टीस पडतें. आतां सुरूवातीला एक प्रश्न पडतो कीं, वाजपेय कशाकरितां करीत असत ? आश्वलायन श्रौत-सूत्र ( ९, ९) जो आधिपत्यकामी असेल त्यानें हा करावा असें सांगतें, उलट, शांखायन अन्नाद्यानें (पुष्कळ अन्नाची इच्छा असणा–यानें ) हा करावा, कारण वाजपेय म्हणजे “अन्न व पेय ” होय असें ह्मणतो, लाट्यायनांत “ यं ब्राह्मणा राजानश्व पुरस्कुवरिन् स वाजपेयेन यजेत | असें सांगून, वाजपेययाजीनें अवाजपेयाला उत्थापन देणें अभिवादन करणें वगैरे गोष्टी करावयाच्या नाहीत असा निर्बंध घातला आहे. शुल्क यजुर्वेदाच्या सूत्रांत जो वाजपेय याग करितो तो प्रजापतीला जिंकतो म्हणजे सर्व गोष्टी जिंकतो, असें विधान केलें आहे. आश्वलायनाप्रमाणें पाहतां (९.९,) हा फक्त राजांकरितां व ब्राह्मणाकरितां आहे; शांखायनाच्या मतें ( १६.१७,१-४ ) फक्त तीन उच्च वर्णांनीं हा करावा; व यानंतर ब्राह्मणानें बृहस्पतिसव करावा. यापूर्वी व नंतर बृहस्पतिसव करावा असें लाट्यायन सांगतो (८.११,१२) , तर कात्यायन ( १४.१,१ ) फक्त क्षत्रियानें व वैश्यानें हा करावा व या यागापूर्वी व नंतर बृहस्पतिसव झाला पाहिजे असें म्हणतो शतपथब्राह्मणाच्या मतें ( ५,१,१ ), इंद्र आणि बृहस्पति यांच्यापासून हा याग उत्पन्न झाला; या दोंघांनी सवित्याची मदत घेऊन प्रजापति जिंकला. या विधीचा दर्जाहि निरनिराळा गणिला आहे, राजांकरितां जो राजसूय किंवा पुरोहिताकरितां बृहस्पतिसव करावयाचा त्या पूर्वी वाजपेय करावा असें आश्वलायन सांगतो (९, ९, १९); पण इकडे शुल्क यजुर्वेद वाजपेयानंतर राजसूय करूं नये असें निश्चितपणें म्हणतो व त्याला कारण असें दाखवितो कीं, राजसूयानें राजा अभिषिक्त होतो तर वाजपेयानें सम्राट् अभिषेकिला जातो. तेव्हां राजसूय कमी दर्जाचा आहे.
एगलिंग व हिलेब्रँट यांच्या मतें या वादाचा वाजवी निकाल म्हणजे, मूळ वाजपेय सर्व दर्जाच्या लोकांनां सामान्य असा होता. राजसूय बृहस्पतिसव, स्थपतिसव, ग्रामणीसव इत्यादि निराळे विशिष्ट विधी अनेक होते, केवळ वाजपेयाच्या स्वरूपावरून पाहतां, तो एक लोकप्रिय विजयोत्सव असावा असें दिसतें.
या विधीतील विशेष प्रमुख गोष्टी म्हणजे ( १ ) आजि = एक शर्यतीचा खेळ ( २ ) रोह = यूपारोहण व ( ३ ) संख्येची पुनरावृत्ति.
वाजपेय पावसाळ्यांत ( शरत्काली ) करितात. प्रथम दीक्षा, सोमक्रय वगैरे प्रकार होतात. १७ सामाचे व १७ सुरेचे चमस तयार ठेवतात; अध्वर्यूला दान करावयाच्या यादींत १७०० गायी १७ दासी १७ हत्ती व इतर जिन्नस असतात. शेवटच्या दिवशीं दुपारीं माध्यन्दिनसवनांत यज्ञक्षेत्रांत शर्यतीचा रथ फिरवितात. त्याला चार घोडे जोडलेले असतात; त्यांच्याकरितां मुद्दाम निराळें अन्न तयार केलेलें असतें. बाहेर दुसरे सोळा रथ तयार ठेवलेले असतात त्यावेळी १७ दुंदुभी वाजवितात; जागा (शर्यतीचें मैदान) १७ बाणांनी मर्यादित केलेलें असते व एक औंदुबराची शाखा अवसानभूमींत ( लक्ष्य म्हणून) पुरतात. नंतर शर्यत सुरू होऊन यजमान विजयी होतो; व सर्व घोड्यांनां खाऊं घातल्यानंतर रथ व घोडे अध्वर्यूंनां अर्पण करण्यांत येतात. कांही हवी दिल्यानंतर यजमानपत्नीला बोलविण्यांत येतें; तिनें विशेष प्रकारचें वस्त्र (कौश) परिधान केलेलें असतें; यज्ञयूपाला एक शिडी लाविलेली असते; तीवर यजमान “ जाये, चल आपण स्वर्गारोहण करूं ” असें पत्नीला म्हणून डोकें यूपाच्या वर जाईपर्यंत चढतो. तेथें पोंचल्यावर सर्व दिशांकडे पाहतो व त्यानंतर तो पृथिवीला वंदन करितो व खाली उतरतो. जमिनीवर पाय ठेवतांना सुवर्णावर किंवा अजचर्मावर पाय ठेवतो. दुसरा पुरोहित उदुंबराच्या केलेल्या आसंदीवर अजचर्म पसरतो व यजमानाचा दंड धरून त्याला “ हें तुझें राज्य ” असें म्हणून त्यावर बसवितो. उदुंबरचमसांत दूध व पाणी मिसळून त्याच्या आहुती देतात. आहुती देणा–याला राहिलेल्या हविर्द्रव्यानें प्रोक्षण करण्यांत येतें व त्रिवार “हा पुरूष सम्राट् आहे ” असें जाहीर करितात; यानंतर १७ विजयमंत्र ( उज्जीति ) म्हणण्यांत येतात.
[ सं द र्भ ग्रं थ]−अभिषेक ऐतरेय-ब्राह्मण (८.५ पुढील); महाभारत सभापर्व अध्याय ३३-४५; शांतिपर्व अ. ४०; रामायण, अयोध्याकांड सर्ग १-१५, युद्धकांड सर्ग. ११२; अग्निपुराण अध्याय २०९ ; नीतिमयूख इत्यादि.
राजसूय :- वाससनेयी संहिता (९,३५;१०.३४), काठक सं (१५,१-१३); मैत्रायणी सं (२.६,१-१३; ४.३,१-४;१०); तैत्तिरीय सं. (१.८,१-२१); शतपथ ब्राह्मण (५,२,२-५;५); तैत्तिरीय ब्रा. (१.६,१-८;१०); तांड्य ब्रा. (१८.८-११); आश्वलायन श्रौतसूत्र (९.३, व पुढें ) शांखायन (१५.१२-२७;१०.१८); लाट्यायन (९.१-३); कात्यायन (१५.१-१०); आपस्तंब (१८); वैतानसूत्र ( ३६.१-१३); कौशिकसूत्र (१७) इत्यादि.
वाजपेय :— वाज. सं. ( ९.१-३४ ); काठक सं. ( १३. १४; १४. १० ); मैत्रायणी सं. (१.११,१-१०); तैत्तिरीय सं. ( १. ७, ७-१२ ); शतपथ ब्रा. ( ५. १, १-२,२ ); तैत्तिरीय ब्रा. (१.३,२-९); तांड्य ब्राह्मण ( १८,६-७ ); आश्वलायन श्रौ.सू. ( ९-९); शांखायन (१५.१;१६.१७); लाट्यायन श्रौ.सू. ( ८.११ व १२; ५.१२,८-२५ ); कात्त्यायन श्रौत. सू. ( १४.१ व पुढें); आपस्तंब श्रौ.सू. १८.१-७);वैतानसूत्र (२७) इत्यादि.]