विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभिसार. − देश व लोक. हा डोंगरावळ प्रदेश काश्मीरच्या दक्षिणेस व पश्चिमेस लागून होता. हल्लीं काश्मीर संस्थानांत त्याचा अंतर्भाव होतो. बृहत्संहिता [ १४. २९; ३२. १९.], महाभारत ( ७.९३; ८.७३); विष्णुपुराण (२.३ इत्यादि पुराणग्रंथांतून अभिसारांचें उल्लेख आढळतात. भारतीय युद्धांत दुर्योधनाच्या तर्फेनें अर्जुनाशी हे लोक लढत होते. ग्रीक लोकांना ‘ अबिसारीचें राज्य ’ म्हणून हा प्रदेश माहीत होता ( प्रो. विल्सन−अॅरिआना अँटिका. पा. १९० मँकक्रिंडल-इन्वहेजन ऑफ इंडिया बाय अलेक्झांडर दि ग्रेट पा. ६९ टीप ३] ‘ दार्वाभिसार ’ असा संयुक्त शब्द बहुतेक ठिकाणी आढळत असल्यानें अभिसार व दार्व हे शेजारी शेजारी रहात असत असें दिसतें (लासेन−इंडिश आल्टरथुम्सकुंडे, पु. २, पान १३८ ; पु.२ परिशिष्ट पान ३९..४०; आशियाटिक रिसर्चेस, पु. १५, पान ११५ ). हिंदुस्थानांत शिरताना अलेक्झाडरनें जेव्हा अपार्टा शहर काबीज केलें तेव्हां तेथील लोक हायडॅसपीझ (झेलम) व अकेसिनीस (चिनाब..चंद्रभागा) या नद्यांमधील अभिसार देशांत आश्रयासाठी गेले (स्मिथ..अली..हिस्टरी ऑफ इंडिया पा. ५९ ) ; त्यावेळी तक्षिला व अभिसार यांमध्ये युद्ध चालू होतें. अलेक्झाडर तक्षिला येथें असतांना अभिसाराच्या राजाकडून, पोरसला अलेक्झाडरशी लढण्याच्या कामीं मदत करण्याची त्याची खरी इच्छा असूनहि (डायोडोरस,१७.८७) आपण शरण आल्याबद्दल अलेक्झाडरला निरोप आला होता. परत जातांना अलेक्झांडरने अभिसाराच्या राजाला आपला सुभेदार नेमून उरसाच्या राजाला त्याचा माडलिक केलें. ह्युएनत्संगाच्या वेळी काश्मीरच्या साम्राज्यपदा मध्यें जी काही संस्थानें होती त्यात राजपुरी किंवा राजौरी म्हणून एक होतें. तेंच प्राचीन अभिसार होय. असें व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो.