विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभ्रक − हें निरनिराळ्या खडकांत सांपडणारें खनिज द्रव्य पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणीं आढळतें. याच्या मुख्य चार जाती आहेत. (१) बायओटिट् (२) मस्कोविट् (३) प्लोगोपिट् (४) लेपिडोलिट् याचे फाडून पातळ पत्रे करितां येतात. व ते लवचीक परंतु ताठ असतात. याचे बहुदा समाद्विभुज चोकोनी (-हाँबोहेड्रल) स्फटिक आढळतात. सुईच्या बोथट अग्रानें अभ्रकाच्या स्फटिकावर जोरानें आघात केला असतां त्यावर सहा रेघांची ता–याच्या आकाराची भेग पडते. दोन रेघांमधील कोन साधारणपणें ६०° अंशांचा असतो. त्याच सुईनें जरा जास्त जोरानें दाबल्यास स्फटिकावर बारा रेघा उमटतात.
अभ्रकानें प्रकाशवक्रीभवन फार होत नाही. याचा वक्रीभवन गुणक (इंडेक्स ऑफ रिफ्रँक्शन) १.५८ ते १.६ असतो. परंतु द्विवक्रीभवन फार होतें. दृगक्षां (ऑप्टिकअॅक्सिस) मधील कोन कांहीं जातींत ५०°ते ७०° असतो व पहिल्या व तिस–या जातीत १०° असतो. दुस–या जातीचे अभ्रक रंगरहित व पारदर्शक असतात, व चवथ्या जातीचे काळे व अपारदर्शक असतात. याशिवाय पिंवळा, हिरवा, तांबडा व पिंगट, असेहि याचे स्फटिक सांपडतात. याचे वि. भु. २.७ ते ३.१ असतें. विद्युद्रोधक व उष्णतारोधक आहे व त्यामुळेंच त्याचा उपयोग यंत्रकलांत फार होतो. यांत बहुधा इतर पदार्थांचें मिश्रण असते. टूर्मलिन् व कुरूंद हे तर नेहमी यांत सांपडतात
याची रासायनिक घटना [ केमिकल कांपोझिशन] फार घोंटाळ्याची असते. हे स्फट्, सिंधु पालाश. यांची शैलितें आहेत. यांत उज्जवायूहि असतो व मग्न, लोह, क्रुभ व भार हे धातूहि यांत सांपडतात. उदाहरणार्थ वर दिलेल्या चार जातींची सूत्रें खाली दिलीं आहेत.
(१) मस्कोविट्….उ२ पा स्फ३ (शै अ ४)३.
(२) लेपिडोल्ट … पालि [ स्फ ( अ उ फ)२ ] स्फ (शै अ३)३
(३) बायओटिट् … ( उ पा)२ (म लो)२ (स्फ लो)२ (शै अ४)३
(४) प्लोगोपिट् … [ उ, पा, (मफ)]३ म३ स्फ (शे अ४)
हवा व पाणी यांच्या योगानें शैलितांमध्यें कांही फरक होऊन हे बनवलेले असतात. गाळाचे बनलेले जे खडक असतात त्यांत याचा चुरा सांपडतो. व ज्या दगडांवर विस्तवाची ठिंगणी पाडतां येते अशा खडकांत हे बहुधा आढळतात.
हिंदुस्थानांत बहुधां मस्कोविट अभ्रक सांपडतो.कानडा व सिंहलद्वोप यांत प्लोगोपिट अभ्रक सांपडतो. शिवाय अमेरिका, युनायटेडस्टेट्स ब्रेझिल येथेंहि अभ्रक आढळतो. हिंदुस्थानांत मुख्य खाणी १७ पैकी बंगालमध्यें ( हजारी बाग) १, मद्रासमध्यें (नेलोर) २ व बिहार ओरिसा प्रांतांमध्यें १४ आहेत. बंगालांतील अभ्रक तांबडा व मद्रासमधील हिरवा असतो. नेलोर येथें १० फूट X १५ फूट येवढे मोठाले अभ्रकाचे तुकडे सांपडले आहेत.
हिंदुस्थानांतील खाणीतून पुष्कळ अभ्रक काढण्यांत येतो. परंतु काढण्याची रीत जुनीच असल्यामुळें अभ्रकाची फार खराबी होते. त्याचे एकावर एक थर असतात. यामुळें प्रथम सरळ खाली व खूप खोल खणून नंतर आडवें खणल्यास नासाडी कमी होईल. खाणींतून काढल्यानंतर त्याचे कात्रीनें कापून चांगले तुकडे बाजूला काढतात व नंतर आकार व रंगरूप पाहून त्याचे निरनिराळे गठ्ठे बांधून पाठवितात कापून टाकलेला चुरा कुटून, त्याची पूड करून विकतात. अभ्रकाची किंमत साधारणपणें ६ रू. शेर असते. परंतु मोठ्या तुकड्याची किंमत ४० रू. पौंडापर्यंतहि येते.
हिंदुस्थानांत प्रतिवर्षी अभ्रक किती निघतो व त्याची किंमत काय असते, या विषयीं जी माहिती प्रसिद्ध होते ती विशवसनीय नसते. कारण ही माहिती निर्गत मालावरून दिलेली असते. निर्गत मालाशिवाय जो माल येथें राहतो त्याचे आंकडे प्रसिद्ध होत नाहींत.
१८९७−९८ पासून १९०२−०३ पर्यंत दरवर्षी सरासरी १९१७३ हंड्रेडवेट माल हिंदुस्थानाबाहेर जात असे व त्याची किंमत सुमारें ७७६१३ पौंड येत असे. याच वर्षांत बंगालमधून १२२८२ हंड्रेडवेट, (किंमत ५२२७२ पौंड) ; व मद्रासमधून ६८७२ हंड्रेडवेट, (किंमत २५२४१ पौंड), माल बाहेर गेला. या मालापैकी बराच माल युनायटेडकिंगडममध्यें व थोडाबहुत युनायटेडस्टेटसमध्यें गेला. १९०१ मार्चपासून १९०७ मार्चपर्यंत गेलेला माल येणें प्रमाणें:−
सन | वजन ( हंड्रेडवेट) | किंमत ( रूपये) |
१९०१-०२ | १६२९८ | १०५०५११ |
१९०२-०३ | २०४१२ | १३१३९०९ |
१९०३-०४ | २१५४८ | १२९४४५३ |
१९०४-०५ | १९५७५ | १४६८९८६ |
१९०५-०६ | ३१५५४ | २३९४४१३ |
१९०६-०७ | ५१४२६ | ३८२४९८८ |
सन १९१७ त सुमारें ¾ कोट रूपये किंमतीची अभ्रक हिंदुस्थानांतून बाहेर गेला त्याचें वजन सुमारें २००० टन होतें.
उ प यो ग. − हा पारदर्शक, उष्णतारोधक व विद्युद्रोधक आहे म्हणून कंदील, चुले (स्टोव्हज) यांत कांचांऐवजी उपयोग करितात. भट्यांतून पाहण्याकरितां जी भोकें ठेवितात त्यांवर अभ्रक बसवितात. प्राचीनकाळी खिडक्यांची तावदानें याचींच करीत असत व याचा उपयोग देवघरें सुशोभित करण्याकरीतां करीत. भिंतीला चिकटविण्याचे कागद व नाटकी सामान रंगविण्याकरितां अभ्रकाच्या भुकटीचा उपयोग करितात. रंग, रंगित कागद, ओंगण वगैरेकरितांहि अभ्रकाच्या भुकटीचा उपयोग करितात. कंदिलाच्या बाजूस लावण्याकरितां, छाया चित्रकलेचे चित्रपट ( फिल्मस ) ठेवण्याकरितां, चित्रांवर कांचप्रमाणें लावण्याकरिता, पदार्थ विज्ञानशास्त्रांतील यंत्रावर बारीक आरसे लावण्याकरीतां व वाफेच्या नळ्यावंर बांधण्याकरितां अभ्रकाचा उपयोग करितात.
हल्ली याचा उपयोग विजेच्या कारखान्यांत फार होतो. विद्युदुत्पादक यंत्राचे (डायनामो) संरक्षक (आर्मेचर) याचेंच करतात. इतर ठिकाणी याच्या भुकटीच्या लाखेंत भिजवून केलेल्या कागदाचा उपयोग करितात. याच देशी औषधांत व खंतात उपयोग होतो. अभ्रकभस्म हें अत्यंत मेहनतीनें तयार करून मोठ्या असाध्य अशा क्षयासारख्या रोगांवर देतात.
[ सं द र्भ ग्रं थ.− ए. ब्रि. (मायका); थॅकरेज डिरेक्टरी ऑफ इंडिया १९१९. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया १९०२,३४ फायनॅन्शियल अँड कमर्शिअल स्टॅटिस्टिक्स ऑफ दि गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया. सेनगुप्त-आयुर्वेदिक सिस्टिम ऑफ मेडिसिन. वॅट-दि कमर्शिअल प्रॅाडक्टस ऑफ इंडिया.]