विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमझेर − [ जिल्हा] मध्य हिंदुस्थान-ग्वालेर संस्थानांतील एक जिल्हा. उ. अ. २२ ° ५’ ते २२° ५९ ’ व पू. रे. ७४° ४० ’ ते ७५ ° ४६’ यांच्या दरम्यान. क्षेत्रफळ १३०१ चौरस मैल, हा जिल्हा भिल्लांच्या प्रदेशांत वसलेला असून या भागांत जंगल फार आहे. लागवडीयोग्य जमीन फार कमी आहे. लोकसंख्या सुमारें एक लाख. या जिल्ह्यांत एकंदर ४६४ खेडी आहेत. यांत अमझेर व बाकानेर हे दोन परगणे आहेत. जमीन महसूल. १५१००० रूपये.
(गांव).− हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण असून समुद्रसपाटीपासून १८९० फूट उंचीवर आहे. उ. अ. २२°३४’ व पू. रे. ७५° ८’. धारच्या पश्चिमेस हें गांव १२ मैलावर असून लोकवस्ती सुमारें तीनहजार आहे. सोळाव्या शतकांत जोधपूरचा राजा मालदेव राठोड याचा पुत्र राजा रामसिंग यानें हा गांव वसविला असें म्हणतात. याचें पुढें लहानसे संस्थान होऊन अठराव्या शतकांत तें ग्वाल्हेरचें मांडलिक झालें. इ. स. १८५७ साली राजा बखतावरसिंग यानें बंड केल्यामुळें त्याचा इंदूर येथे शिरच्छेद करण्यांत आला व संस्थान शिंद्यांच्या हवाली केलें. हें मध्यहिंदुस्थानांत ग्वाल्हेर संस्थानांतील एक जिल्ह्याचें गांव आहे.