विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमडापूर − तालूका चिखली, जिल्हा बुलाढणा. खामगांव रस्त्यावर चिखलीच्या पश्चिमेस १४ मैलांवर हें एक भरभराटीचें खेडेंगांव असून याची लोकसंख्या सुमारे तीन चार हजार आहे. येथें उर्दू आणि मराठी शाळा असून आठवड्याचा बाजार दर बुधवारी भरतो. गांवाच्या दक्षिणेस जवळच एका टेकडीवर एक अर्वाचीन पण सुंदर भवानीचें देवालय आहे. मूर्ति फार विशाल होती ती हल्ली फुटून पडली आहे. त्या देवळांत एक संस्कृत लेख असून तो बार्शीटाकळीच्या लेखाप्रमाणेंच महत्त्वाचा आहे. तो शके ११३३ [इ.स. १२११] मधील असून “ श्रीमत्प्रतापवर्ति सिंवणदेव ” म्हणजे देवगिरीच्या प्रख्यात सिंघण यादवाच्या वेळेचा आहे. पदुमनशेटी नांवाच्या सावकारानें हें देऊळ बांधलें असा उल्लेख आहे. हल्लीचें देऊळ पेशव्यांचा अमडापूर येथील कमावीसदार खंडोबल्लाळ यानें बांधलें असून त्या देवीस “ बल्लाळी देवी ” असेंहि म्हणतात. लेखांत अमडापूरचें नांव “ अन्वरापूर ” असें दिलें आहे. [या. म. काळेव-हाडचा इतिहास.]
देवळाजवळच दोन भव्य व उंच मूर्तीचे तुकडे आहेत. त्यांवरून त्या मूर्तीं निदान ५० फूट उंच असाव्या असें वाटतें. येथें सांपडणा-या अवशेषांवरून, हेमाडपंती त–हेचें येथें पूर्वी एक देवालय असावें असें वाटतें; व येथें त्या प्रकारची दंतकथाहि प्रचलित आहे.
येथें लोकलबोर्ड शाळा, पी. डब्ल्यू. डी. बंगला, तपासणी अधिका-याकरतां एक बंगला, सबरजिष्ट्रारची कचेरी, पोलीस कचेरी, वगैरे आहेत( बलढाणा डिस्ट्रिक्ट गॅ. १९१०).