विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमनेर − मेलघाट तालुक्यांतील अमनेर परगण्याचें हें एकेवेळी मुख्य ठिकाण होतें. हल्लीं हें खेडेंगांव जवळ जवळ ओसाडच आहे. परंतु येथें एक जिल्पि अमनेर या नांवाचा छोटासा किल्ला आहे. अगदीं अलीकडे झालेल्या लढ्यांमुळें याला थोडेंसे महत्व आहे. गर्गा आणि तापी यांच्या संगमावर हें एक लहानसें उंचवट्याचें ठिकाण आहे. ही एक लहानशी वीटमातीची चौकोनी इमारत आहे. भिंतीला चार बुरूज असून आंत साधारण एक एकर जागा आहे. पश्चिमेकडील कोप–यांत एक मशीद आहे. आंत जाण्यास तापीनदीच्या डाव्यातीरावर वायव्येकडून एकच रस्ता आहे. मुख्य दरवाजा आणि तटाचा कांही भाग याचा इं. स. १८५८ सालीं नाश करण्यांत आला. आंत असलेल्या चारपांच तोफा याच वेळीं काढून नेण्यांत आल्या. १८५७ सालच्या बंडानंतर तात्याटोपें याच मार्गानें परत फिरला होता. आणि ज्यावेळी तंट्याभिल्ल आजूबाजूच्या प्रदेशास फार त्रास देत होता तेव्हां राजे कुमारसिंग यांस कांही पोलीस देऊन बंदोबस्त करण्याकरतां येथेंच ठेविलें होतें.
(२) तालुका मोसीं. घरें ३०९. लोकसंख्या १५५२. नागपूर जिल्ह्यांतील जलालखेड गावाच्या समोरच वर्धा नदीवर हें खेडेंगांव आहे. हल्ली यांस मुळींच महत्त्व नाही. परंतु पूर्वी हें ब-याच सहत्त्वाचें होतें. येथें पडकी देवळें, मशिदी वगैरे बरीच दिसतात, त्यांवरून पूर्वीच्या वैभवाची थोडीशी कल्पना येते. या ठिकाणी कलाबतु, जर, रेशीम वगैरेंचा मोठा व्यापार चालत असे.आणि जत्रेंत हत्ती, घोडे, मोती, वगैरेची देवघेव होत असे. या ठिकाणीं भोसले आणि निजाम यांची लढाई झाली होती. इ. स. १८२६ साली मोहरम आणि गणेशचतुर्थी एकाच दिवशी आली होती. त्यावेळीं येथील हिंदूमूसुलमानांचीच बराच तंटा झाला होता. हल्ली बहुतेक मुसुलमानांचीच वस्ती आहे.
येथें नदीतीरावर एक जुनें महादेवाचें देवालय आहे. हें एक फारच जागृत देवस्थान आहे असें म्हणतात. या देवळाजवळच एक तळें आहे. त्याची खोली किती आहे हें सांगतां येत नाही असें म्हणतात. नदीचें पाणी अगदी निर्मळ झालें म्हणजे त्यांत देऊळ दिसतें असें म्हणतात.या देवळासंबंधी एक आख्यायिका आहे ती अशी:− कोणीहि ब्राह्मणानें तेथें रात्री जाऊन स्वयंपाकाच्या भांड्यांविषयी प्रार्थना केली म्हणजे त्यास ती तेथें सकाळी मिळत. परंतु काम झाल्यावर ती भांडी नदीस समर्पण करायची असें होतें. एकदां एका लोभी ब्राह्मणानें ब-याच भांड्यांविषयी मागणी केली. त्यास तीं मिळालीं. परंतु त्यानें ती परत न करतां सर्व विकून टाकलीं. त्या वेळेपासून पुन्हां कधीहि अशी भांडी कोणास मिळाली नाहीत. येथें लालखान पठाणाची मकबरा दोनशें वर्षांची जुनी असून तीवर एक लेख आहे.