विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरकोश − हा अमरसिंहाचा कोशग्रंथ सध्यां उपलब्ध असणारा अतिशय प्राचीन असा कोश आहे. याचा कर्ता बुद्धानुयायी असूनहि ब्राह्मण व जैन लोकांनां तो अत्यंत आदरणीय झांलां आहे हें त्यांनीं या ग्रंथावर केलेल्या टीकांवरून दिसून येतें. सुभूतिचंद्रासारखे बौद्ध, आशाधर पंडित आणि नाचिराज यांच्यासारखे जैन व क्षीरस्वामी, मल्लीन्नाथ आणि अप्पयादीक्षित यासारख ब्राह्मण, अमरकोश-टीकाकार आहेत. यावरून प्रत्येक वर्गाच्या संस्कृत अभ्यासकांनां या कोशाचें किती महत्त्व वाटत असे हें दिसून येईल. चिनी व तिबेटी भाषांतर नुकतेंच संशोधिलें गेलें आहे. सहाव्या शतकांत उज्जनीच्या गुणाराटानें अमरकोशाचें चिनींत रूपांतर केलें असें म्हणतात. अमरकोशाच्या अनेक टीकांपैकी अति प्रसिद्ध टीका म्हणजे एक महेश्वराची व दुसरी भानुजी दीक्षितांची व्याख्यासुधा नांवाची टीका. पण हल्ली उपलब्ध असणारी सर्वांत जुनी व महत्त्वाची टीका क्षीरस्वामीची अमरकोशोद्घाटन ही होय. उपाध्याय, गौड व भोज हे क्षीरस्वामीच्या आधीचे टीकाकार होत; नंतरच्या टीकाकारांपैकी रामाश्रम, रायमुकुट, भरतमाल,नीलकंठं, भानुजी दीक्षित, रूद्रभट, नारायण चक्रवर्ति, मयुरेश पंडित, महादेवभट्ट वेदांती यांची नांवे सांगतां येतील अमरकोशाचा कांहीं भाग रोम येथें १७९८ मध्यें तामिळी लिपीत प्रसिद्ध झाला. १८०८ मध्यें श्रीरामपुर येथें संपूर्ण अमरकोश छापला गेला, त्याला कोलब्रुक साहेबांनीं इंग्रजी टीपा जोडल्या होत्या. पुढें १८३९ त याचें फ्रेंचमध्यें भाषांतर होऊन तें पॅरिस येथें प्रसिद्ध झालें.
अमरकोश तीन कांडांत लिहिला असून त्यांत जवळ जवळ १०,००० शब्द आहेत. पहिल्या कांडांत स्वर्वर्ग,व्योमदिग्वर्ग, कालवर्ग, धीवर्ग, शब्दादिवर्ग, नाट्यवर्ग, पातालभोगीवर्ग, नरकवर्ग व वारिवर्ग; दुस-यांत भूमिवर्ग, पुरवर्ग, शैलवर्ग, वनौषधिवर्ग, सिंहदिवर्ग, नृवर्ग, ब्रह्मवर्ग, क्षत्रिय वर्ग, वैश्यवर्ग, शुद्रवर्ग; व तिस-यांत विशेष्यनिघ्रवर्ग, संकीर्णवर्ग नानार्थवग, अव्ययवर्ग, लिंगसंग्रहवर्ग इतके वर्ग आहेत. अमरकोशाला त्रिकांड व नामलिंगानुशासन अशीहि नांवें आहेत.