विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरगोल − (मुंबई) धारवाड जिल्हा. धारवाड−हुबळी रस्त्यावरील हुबळीच्या वायव्येस ५ मैलांवरील खेंडे. लोकसंख्या सुमारें दोन हजार. गांवांत शंकरलिंगाचें देऊळ साधारण मोडकळीस आलेल्या स्थितीत आहे. हें देऊळ बांधण्याविषयीच्या दोन आख्यायिका आहेत. जखनाचार्यानें हें देऊळ बांधलें असून हा पूर्वी क्षत्रिय राजा होता व ब्रह्महत्येमुळें झालेल्या पापक्षालनार्थ यानें देवळें बांधली अशी एक आख्याइका आहे; त्याचप्रमाणें विश्वकर्म्याचा कोणी पांचाल जातीचा एक शिष्य होता, त्यानें आपलें कसब दाखविण्याकरतां जी देवळें बांधली त्यांतील हें एक आहे अशी दुसरी आख्यायिका आहे. जवळच बनशंकरी देवीचें देऊळ आहे. शंकरलिंगदेवळाच्या समोर एक शिलालेख आहे. शिला फुटल्यामुळें व लेख पुसट झाल्यामुळें तो वाचतां येत नाहीं. हें रेल्वेंचें स्टेशन आहे.