विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरचंद्र − जिनेंद्रचरित्राचा कर्ता. जिनेंद्रचरित्राला ‘ पद्यानंदकाव्य ’ असेंहि म्हणतात. हा जिनदत्तसूरीतचा शिष्य होता. अमरचंद्राचा मित्र अरिसिंह यानें काव्यकल्पलता नांवाचा ग्रंथ अर्धाच लिहिला होता. तो अमरचंद्राने पूर्ण करून त्या साग्र ग्रंथावर टीका लिहिली. त्या पुस्तकाचें नांव कविशिक्षावृत्ति असें ठेविलें. शिवाय त्यानें छंदोरत्नावली, कलाकलाप, व बालभारत हीं पुस्तकें लिहिली.
“ अरिसिंह व अमरचंद्र सहाध्यायी होते. राजशेखरानें दिलेल्या हकीगतीवरून समजतें की ते वीसलदेवाच्या काळी असावेत. परंतु वीसलदेवाला पट्टनचें तख्त मिळण्यापूर्वी म्हणजे १३ व्या शतकाच्या सुमारें मध्यकाली ते प्रबंध चतुर्विशतीत रहात होते.” [ भाडारकर].