विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरदास ( १५०९-१५७४)−तिसरा शीख गुरू याचा जन्म १५०९ त व राज्याधिकार १५५२ त. दुसरा शीख गुरू अंगद उर्फ अंगडशहा यानें हि गुरू नानकाप्रमाणें आपल्या मुलांचा गादीवर हक्क न ठेवतां आपला विश्वासू शिष्य अमरदास याला आपल्यामागून गुरू नेमिलें. क्षमा आणि सहनशीलता धारण करण्याविषयी अमरदासाचा सर्वांनां उपदेश असे. त्यानें जातिभेद मोडण्याचा गुरू नानकाचा प्रयत्न पुढें चालविला. तो आपले सर्व शीख अनुयायी व आपल्याकडे येणारे पाहुणे यांना एकाच पंक्तीत बसवून जेवण्यास भाग पाडी. “ कोणालाहि आपल्या जातीचा अभिमान असूं नये, कारण जात्याभिमान हा अनेक पापांच्या मुळाशी असतो, ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण. प्रत्येक जण चातुर्वर्ण्याविषयी बडबड करीत असतो पण सर्वजण ब्रह्मबीजापासूनच उत्पन्न झालेले आहेत, अखिल विश्व एकाच मातीचे घडलेलें असून च्याच्या कुंभारानें पात्रांस निरनिराळे आकार दिले आहेत एवढेंच. ” अशी अमरवासाची शिकवण असे. त्याच्या वेळी शिखांमध्यें अशी एक प्रसिद्ध म्हण होती कीं, “ कोणी तुम्हाला वाईट रीतीनें वागविलें तर ते सहन करा; तुम्ही तीनदां अशा रीतीनें सहन केल्यास ईश्वर तुमचा पाठिराखा होईल आणि तुमच्या शत्रूंचा पाडाव करील ” अमरदासानें सतीची चालहि बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तो असें म्हणे की, प्रेताबरोबर आपणाला जाळून घेणा-या सतीच नव्हत. जी पतीचा वियोग झाल्याबरोबर त्याच्या दु:खानें मरण पावते तीच खरी सती. शिवाय ज्या आपल्या पतीचें स्मरण ठेवून समाधानवृत्तीनें राहतात व दानधर्मांत काळ घालवितात त्याहि सतीच होती. अमरदासानें कजरावळ नांवाचा किल्ला बांधला. त्याच्या मनांत स्वतंत्र राज्य स्थापन करावयाचें होतें. परंतु राज्यप्राप्तीच्या नादास लागल्यानें धर्म बुडतो असें वाटून त्याच्या पुष्कळ अनुयायांनीं त्यास सोडिलें आणि त गुरूनानकाचा नातू धर्मचंद्र याला भजूं लागले या नवीन शीख शाखेला उदासी व निर्मल अशी नांवे आहेत. हा इ. स. १५७४ त मृत्यु पावला.