विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमराबाद −हैदराबाद संस्थानांतील महबूबनगर जिल्ह्यांतील एक तालुका. याचें क्षेत्रफळ ७२७ चौरस मैल व लोकसंख्या ( यांतील जहागिरी धरून ) १९११ सालीं २०,८८० होतीं. या तालुक्यांत ४६ गांवें आहेत, त्यांपैकीं ९ जहागिरी गांवें आहेत. अमराबाद गांव ( लो. सं. २,२६७ ) हें तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. जमीनवसुली [१९०१ सालची] २५००० रूपये होती. एका पठारावर हा तालुका वसला असल्यामुळें त्यांत मोठें जंगल आहे व सभोंवतालचा प्रदेश फार डोंगराळ आहे. १९०५ सालीं या तालुक्याची मर्यादा वाढविण्यांत आली; हल्लीं यांत ६७ खालसा गांवें येतात ( इं गॅ. १९०८ ). या मुलुखासंबंधानें पेशवे व निजाम यांमध्यें वांधा होता. सन १७९५ जुलै मध्यें गोविंद कृष्ण मु|| भागानगर यानें रावसाहेब पेशवे यांस पत्र लिहिलें कीं, अराद अल्लीखान यांजकडे अमराबाद व इतर चौदा लक्षांचे ( मुलूख ) सांगून जमीयतस्वार अडीच हजार व पायदळ दोन हजार घेऊन मोहरम होतांच हजर व्हावें, असा करार केला. (रा. खं. ५-५५-५७ ).