विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरावती.−इंद्राची स्वर्गांतील नगरी. महाभारतांत ( वनपर्व अध्याय ४३ ) अर्जुन इंद्राच्या अमरावतीला ज्या वेळीं गेला त्या वेळचें वर्णन दिलें आहे. त्या ठिकाणीं सिद्ध व चारण यांची वस्ती होती व प्रत्येक ऋतूंत पुष्पें येणारे अनेक वृक्ष होते. तेथील नंदनवनांत अप्सरा विहार करीत होत्या व देवविमानें इच्छेनुरूप संचरत होतीं. “ज्यांनीं तपश्चर्या केलेली नाहीं अथवा अग्न्याधान केलेलें नाहीं त्यांस व संग्रामांत पराङ्मुख होणारे, यज्ञ अथवा व्रतें न करणारे, वेदश्रवणशून्य असलेले, तीर्थामध्यें स्नान करणारे, यज्ञ आणि दान यांचा अधिकार नसलेले आणि यज्ञाला विघात करणारे क्षुद्र लोक यांस या नगरीचें दर्शन कधींहि होत नाहीं” असें म्हटलें आहे. (महाभारत ३. ४३ ).
[ २ ] मद्रास इलाखा, गंतूर जिल्हा, सत्तनपल्ली तालुक्यांतील १६० ३४’ उत्तर अक्षांश व ८०० २२’ पूर्व रेखांश यांवर वसलेलें. सुमारें दोन हजार लोकस्तीचें खेडें.
या खेड्याच्या थोडें उत्तरेस धारणीकोट नांवाची पूर्वीं एक नगरी होती. ती बौद्ध आंध्र राजांची राजधानी होती, येथें बौद्धांचा एक प्रेक्षणीय ,स्तूप आहे त्यामुळें हें खेडें सर्वत्र प्रसिद्ध आहे. हा स्तूप पूर्वीं येथील स्थायिक राजाचे नोकर इमारतीसामान शोधीत असतां त्यांस सांपडला. त्या वेळीं ही एक मातीची टेंकडी होती. त्या नोकरांनीं या टेंकडीच्या मधोमध खणलें तेव्हां त्यांनां संगजिर्याच्या पेटींत एक मोती. व कांहीं अवशेष मिळाले. पुढें विशेष शोध करतां आंतील संगमरवरी काम सांपडलें; परंतु त्या खेडवळ लोकांनीं त्याचा वाटेल तसा उपयोग केला. कांहीं दगड देवळाच्या कामास लावले व कांहीं तलावाच्या कामास लावले. इ. स. १७९७ व १८०७ सालीं कॅ. मॅकेन्झी यानें दोन वेळां याची पहाणी केली. १८०७ सालीं त्यानें लिहिलेलें पुस्तक व त्या स्तूपाचे नकाशे हे इंडिया ऑफिसमध्यें ठेवून दिले आहेत. पुढें सन १८४० सालीं सर वाल्टर इलियटनें आणखी कांहीं भाग खणून कांहीं संगमरवरी दगडांचे नमुने मद्रासेस पाठविले. व पुढें कांहीं इंग्लंडमध्येंहि पाठविण्यांत आले. इ. स. १८८० सालीं सरकारनें सर्व भाग उघडा करण्याचा हुकूम केला. या स्तूपाची जरी पुष्कळ नासधूस झाली आहे, तरी हा सर्वांत उत्तम स्तूप आहे, अशी पुष्कळांची समजूत आहे. ब्रह्मी लिपींत पुष्कळ शिलालेख येथें आहेत. कांहींचें डॉ. बर्जेस यांनीं भाषांतर केलें आहे. मद्रास म्युझियममध्यें येथील बरेच नक्षीदार काम ठेवलें आहे.
स्तू प व र्ण न.−मुख्य स्तूप संगमरवरी विटांनीं आच्छादिलेला असून त्याभोंवतीं दोन प्राकार ( कठडे ) आहेत. बाहेरचा जास्त प्राचीन असून त्याची उंची जमिनीपासून १३|१४ फूट आहे; आंतील प्राकार मागाहूनचा असावा असें दिसतें; तो ६ फूट उंचीचा आहे. स्तूपावरील विटा व दोनहि प्राकारांचे सर्व दगड ( जोतें व मुंडेरी धरून ) उठावदार नक्षीनें भरलेले होते. स्तूपाचा व्यास १३८ फूट, आंतल्या कठड्याचा परिघ ५२१ फूट व बाहेरील कठड्याचा परिघ ८०३ फूट होता. बाहेरच्या कठड्यावरील तांत्रिक आकृती बारा चौदा हजार असल्या पाहिजेत असा अंदाज आहे. आंतल्यावरील तर याहूनहि जास्त व अधिक सुंदर असाव्यात. बाहेरच्या कठड्याला उभे दगड असून ते तीन तीन आडव्या दगडांनीं जोडले आहेत. उभ्या दगडाखालीं जोतें असून वर २ ३|४ फूट उंचीची मुंडेरी आहे. उभ्या दगडांवर बाहेरच्या अंगाला मध्यभागीं एक सबंध वर्तुळ ( आकृति ) व त्याच्या दोन्ही कडांनां ( खालीं व वर ) एक एक अर्धवर्तुळ आहे; मध्यंतरीं कांहीं नक्षीकाम आहे. आडव्या दगडांवर अशाच तर्हेचीं पण निरनिराळ्या प्रकारचीं वर्तुळें असून मुंडेरीवर नागमोडीनें चाललेली एक मोठी माळ माणसांनीं उचलून धरलेली आहे. रिकाम्या जागेवर दुसरीं कांहीं चित्रें आहेत. व जोत्यावर गमतीदार प्राण्यांचीं व मुलांचीं चित्रें आहेत. आंतल्या बाजूंनांहि नक्षी आहे.
हे अमरावतीचे कठडे या प्रकारच्या शिल्प विभागांतील अत्युत्कृष्ट नमुने असून सध्यांच्या त्यांच्या अवनतावस्थेंत सुद्धां ते धर्म व कला यांच्या इतिहासांतील अमूल्य साधनें होत यांत संशय नाहीं. बाहेरचा कठडा दुसर्या शतकाच्या अखेरीस बसविला असावा, हें पुलुमायी ( इ. स. १३०-१७० ) आणि यज्ञश्री ( इ. स. १८४-२१३ ) या आंध्र राजांच्या कारकीर्दींतील अर्पणलेखांवरून उघड होतें. महान् बौद्धधर्मप्रवर्तक नागार्जुन यानें धनश्रीद्वीप किंवा धान्यकटक येथील महाचैत्याभोंवतीं एक भिंत बांधली असें जें तारानाथ लिहितो त्यावरून या स्तूपाचा काल ताडतां येतो. आंतील कठडा इ. स. ३०० च्या नंतरचा असावा. मुख्य स्तूपाच्या कांहीं प्राचीन शिल्पावशेषांवरून तो इ. स. पू. २०० या कालांतला असावासें दिसतें.
हिंदुस्थानांतील उठावदार नक्षीकाम अलेक्झांड्रिआ आणि आशियामायनर या दोन मुख्य उगमापासून अवतीर्ण झालेलें आहे असें व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो. कलेतिहासकाराला अमरावतीच्या शिल्पाचें एक विशेष महत्त्व हें आहे कीं या दोन उगमांनां जोडणारी ती एक सांखळी म्हणतां येईल. येथील पाषाणशिल्पांचा काल सांची आणि गंधार यांच्या मधील आहे असें धार्मिक व कलाविषयक दृष्टीनें म्हणतां येतें. पूर्वीं बुद्धमूर्ति कोरीत नसून फक्त कांहीं चिन्हांनीं त्याचें अस्तित्त्व दर्शवीत पण गंधारकलेनें बुद्धाला पुराणांतील प्रसंगानुसार वाटेल तसें रंगविलेलें चित्रांतून दृष्टीस पडतें अमरावतीच्या शिल्पांत सांची व भर्हुत यातील बुद्धचिन्हें व त्याचप्रमाणें गंधारकलेंतील बुद्धमूर्ती काढलेल्या आहेत. ग्रीक पोशाखांत एकटाच उभा राहिलेला किंवा बसलेला बुद्ध कठड्यांवर पुष्कळदा दृष्टीस पडतो. पण बुद्ध कांहीं करीत आहे असे प्रसंग अमरावतीस फारच थोडे आहेत.
सांची आणि अमरावतीचे कारागीर अनुकरणकारी किंवा ग्रीक कलाभ्यासक मुळींच नव्हते. ग्रीक जेथून ही कला शिकले तेथूनच ते शिकले पण हिंदुस्थानांतील वातावरणामध्यें ही भारतीय-आर्यकला स्वतंत्र व ग्रीकाहून निराळी बनली इतकेंच कायते. [ संदर्भ ग्रंथ.-इं. गॅ. हॅवेल-हँडबुक ऑफ इंडियन आर्ट; ए. रि. ए. ]