विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरेळी, प्रां त.- ( काठेवाड ) बडोदें संस्थानांतील एक प्रांत. क्षेत्रफळ १२४५ चौरसमैल. या प्रांताचे एकंदर १७ भाग आहेत; व संबंध प्रांत दोन मुख्य भागांत विभागला गेला आहे.
( १ ) ओखामंडल ( उखामंडल ) २२° ५’ ते २२° ३५’ उत्तर अ. व ६९° ५’ ते ६९° २०’ पूर्व रे. यांच्या दरम्यान आहे, उत्तरेस कच्छचें आखात; पश्चिमेस अरबी समुद्र; पूर्वेस आणि दक्षिणेस कच्छचे रण व पलीकडे नवानगर.
( २ ) यांत अमरेळी, धारी, खांभा, कोडिनार, दामनगर आणि शिआनगर हे तालुके. २०° ४५ ते २२° ४’ उत्तर अ. व ७०° ४२’ ते ७१° ५५’ पूर्व रे. यांचे दरम्यांन आहेत. कोडिनार शिवाय बाकीचे भाग एकमेकांलगत असून त्यांच्या उत्तरेस आणि पश्चिमेस जेतपूर आणि जुनागड आणि पूर्वेस आणि पश्चिमेस गोहेलवार कोडिनार तालुका, समुद्र व गीर टेंकड्या यांमध्यें असून दुसर्या दोन्ही बाजूंस जुनागड संस्थान ओखामंडल हा रेताड प्रदेश असून इतर प्रांत सपाट आहे. धारी तालुक्यांत कांहीं डोंगर आढळतात.
इ ति हा स.−गायकवाडांच्या काठेवाड मधील सत्तेची तीन सरदाराखालीं विभागणी करतां येते ती येणेंप्रमाणें.-( १ ) मुलुखगिरी, (२) ब्रिटिशसरकारच्या देखरेखीखालील येथील गायकवाडची सत्ता व ( ३ ) खालसामहालाखेरीज करून इतर भागांवरील ब्रिटिश सत्ता.
काठेवाडांत मुलुखगिरीला सुरूवात पेशव्यांचे सेनापति खंडेराव दाभाडे व दमाजी गायकवाड यांनीं केली. दुसर्या दमाजीनें ( १७३२ ) काठेवाडच्या बहुतेक भागांवर खंडणी बसविली. १८ व्या शतकाच्या अखेर पर्यंत गायकवाड व पेशवे यांचीं सैन्यें मिळून खंडणी वसूल करीत. परंतु १७९९ ते १८१४ पर्यंत फक्त गायकवाडचेंच सैन्य खंडणी जमवून पेशव्यांचा भाग त्यांनां देत असे. मुलुखगिरींत शिवराम गारदी व बाबाजी अप्पाजी हे फार प्रवीण असत. गायकवाड सरकारकडून जेव्हां खंडणी वसूल करण्यांचे काम बरोबर होईना तेव्हां ब्रिटिशांच्या मदतीनें त्यानें निरनिराळ्या स्थानिक सरदारांशीं खंडणीबद्दल कायमचे ठरावकरून काठेवाडांत या कामावर विठ्ठलराव देवाजी व एक दुय्यम अधिकारी नेमला. ही व्यवस्था १८२० पर्यंत चालली. परंतु मध्यंतरी पेशव्यांचा भाग त्यांनां बरोबर न मिळाल्यामुळें त्यांनीं काठेवाडांत वसुलीकरितां स्वतंत्र सैन्य पाठविण्यास सुरूवात केली. यामुळें काठेवाडांत दुहेरी सत्ता सुरू झाली व याच सुमारास दुष्काळामुळें लोक फार हवालदील झाल्यामुळें सर्व बाजूंनीं लोकांवर संकटें आलीं. परंतु १८१८ त पेशवाईचा शेवट होऊन १८२० त सयाजीराव गायकवाडाशीं ब्रिटिशांनीं केलेल्या तहाच्या अटीनीं काठेवाड वरील संकटें नाहींशीं झालीं. या तहांत गायकवाडानें ब्रिटिशांच्या हुकुमाशिवाय काठेवडांत सैन्य पाठवूं नये असें ठरलें. अशा रीतीनें हळूहळू गायकवाडची सत्ता काठेवाडांत कमी होत जाऊन ब्रिटिशांची सत्ता वाढली. १८१७ च्या तहानें ब्रिटिशांनीं ओखामंडळच्या वाघेर लोकांचा पराभव केल्यावर त्यांचा प्रदेश गायकवाडकडे आला. या लोकांनीं पुढें १८६७ पर्यंत मधून मधून त्रास देणें चालू ठेविलें होतें. १८६१ त खंडेराव गायकवाडनें महालांच्या राज्यव्यवस्थेंत बर्याच सुधारणा घडवून आणिल्या. फौजदारी व मुलकी अशीं दोन निरनिराळीं खातीं करून त्यांच्यावर स्वतंत्र अधिकारी नेमले. १८६३ त पहिलें पोष्ट ऑफीस सुरू करण्यांत आलें. खंडेरावाच्या कारकीर्दींच्या अखेरीस लोकांवर कांहीं पट्ट्या बसविण्यांत आल्या व मल्हाररावाच्या राज्यारोहणानिमित्त बसविलेला कर लोकांनां मुळींच पसंत पडला नाहीं. मल्हाररावाला गादीवरून काढून टाकल्यावर बडोद्याच्या राज्यकारभारांत जेव्हां सुधारणा करण्यांत आली तेव्हां महालच्या कारभारांतहि सुधारणा घडून आल्या. अमेरळी प्रांतांत शेंकडा ९६ लोक गुजराथी भाषा बोलतात.
येथील मुख्य पिकें ज्वारी, बाजरी, गहू, उडीद, मूग, मठ, हरभरा, तीळ, कापूस, ऊंस, तांदूळ, इ. गीर जातीच्या गाई व म्हशी प्रसिद्ध आहेत.
येथें व्यापार कमीच आहे. या प्रांतांत कोडिनार, द्वारका, व बेट हीं बंदरें आहेत. जमीनमहसूल ५.६ लाख होता पण १९०४-०५ सालीं दुष्काळामुळें फक्त ५७,००० रूपये वसूल झाले.
या प्रांतांत सहा गांवीं म्युनसिपालिट्या आहेत. त्यांचीं नांवें-अमरेळी, दामनगर, धारी, कोडिनार, द्वारका आणि बेट. अमरेळी तालुक्यांत शिक्षण सक्तीचें आहे.
ता लु का.- बडोदे संस्थानांत अमरेळी नांवाचा तालुका. २१० २०’ ते २१० ३७’ उत्तर अ. व ७१० २’ ते ७१० २१’ पूर्व रे. यांच्या दरम्यान. क्षेत्रफळ २२८ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें पंचावन हजार. या तालुक्यांत ५८ खेडीं आहेत. प्रदेश सपाट व सुपीक असून ज्वारी, बाजरी, गहू, कापूस वगैरे पिकें होतात.
गां व. − २१° ३६’ उत्तर अक्षांश. ७१° १५’ पूर्व रेखांश यांवर बडोदे शहाराच्या नैर्ऋत्येस १३९ मैलांवर असून भावनगर-पोरबंदर रेल्वेचें एक स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें अठरा हजार थेबी नांवाच्या नदीकांठीं हा गांव असून सभोंवती पडका तट आहे. येथें एक ‘जुना कोट’ आहे. त्याचा उपयोग हल्लीं तुरूंगाकडे करतात. अमरेळी प्रांताचें हें मुख्य ठिकाण असल्यामुळें येथें सर्व कचेर्या आहेत. इ. स. १९०५ सालीं येथें म्युनसिपालिटी स्थापन झाली. हातमागावर कापड काढण्याचा धंदा येथें भरभराटीस आला आहे. काठेवाडांतील कापसाच्या बाजाराचें हें एक महत्त्वाचे गांव आहे. बडोद्याच्या रेसिंडेटच्या हाताखालचा एक कामगार अमरेळी येथें असतो.
नागरनाथाच्या देवळांतील अंकितलेखावरून याचें प्राचीन नांव अमरवल्ली असावें असें वाटतें. १८ व्या शतकांत आधुनिक अमरेळीच्या पश्चिमेकडे व दक्षिणेकडे फक्त वस्ती असून तिला जुनी अमरेळी म्हणतात. अलीकडील वस्ती १७९३ त झाली. नवीन वस्ती वाढविल्याचें व पुष्कळ सुधारणा केल्याचें श्रेय काठेवाडचा सरसुभा विठ्ठलराव देवाजी ( १८१०-१५ ) याजकडे आहे. जुन्या किल्यांत बाबाजी अप्पाजीच्या वेळच्या ( १८०३-०७ ) बंदुका व गोळ्या आहेत.